एम सी आर
Uncategorized

जलसंधारणाचे अतुलनीय कार्य श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी केले -प्रा.इंद्रजीत भालेराव

नांदेड:(दि. १६ जुलै २०२६)
शेती, सिंचन हे श्रद्धेय कै.डॉ. शंकररावजी चव्हाण यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. त्यांनी हयातभर शेती आणि सिंचनासाठी कार्य केले. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात असताना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बिगर पाण्याची शेती म्हणजे जुगार आहे. शेतकऱ्याचे जीवनमान पाण्याशिवाय समृद्ध होऊ शकत नाही. यासाठी आठमाही पाणी धोरण राबवले. शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या हयातीत केल्या म्हणून आजचा मराठवाडा सुजलाम सुफलाम झाला आहे. हे श्रेय केवळ डॉ. शंकररावांचेच आहे, असे उद्गार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केले.
यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित शेती, सिंचन आणि मराठी साहित्य विषयीवरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
प्रारंभी परिषदेचे उद्घाटन आ. अँड. कु. श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते झाले. उद्घाटकीय भाषणात त्यांनी, नानांनी आपल्या उभ्या आयुष्यात साडेतीन हजार लहान मोठे धरण बांधले. हे त्यांचे कार्य आम्हा नांदेडकरांसाठी व राज्यासाठी भूषणावह आहे. त्यांच्या संस्कारातूनच आम्ही वाढलो आहोत, असे गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय समारोपात श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव माजी मंत्री श्री. डी.पी.सावंत म्हणाले की, डॉ.शंकररावजी चव्हाण यांचे जीवन एक दीपस्तंभ आहे. त्यांनी केलेले संस्कार नैतिकतेचे मानदंड आहेत. श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या परिषदेसारखे अनेक कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू समाजासमोर आणावेत, असे आवाहन त्यांनी केले.
बीजभाषक माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे यांनी, डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी वंचित, उपेक्षित शेतकऱ्यांसाठी कार्य केले. हेडमास्तर ही उपाधी शिस्तबद्ध व कठोर प्रशासनामुळे त्यांना मिळाली. व्हिजन असलेले नेतृत्व म्हणून महाराष्ट्र व देश सदैव त्यांना स्मरणात ठेवील, असे विचार व्यक्त केले.
विचारमंचावर कार्यकारिणी सदस्य श्री. पांडुरंगराव पावडे, माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात माजी प्र-कुलगुरू व उपक्रमशील प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, कै.डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या पाणीविषयक दूरदृष्टीमुळे तहानलेला संपूर्ण महाराष्ट्र तृप्त झाला. हैदराबाद मुक्तिसंग्राम, कापूस एकाधिकारी योजना, रोजगार हमी योजना, कुटुंब नियोजन तसेच धगधगत्या पंजाबसारखा प्रश्न त्यांनी सोडवला. संपूर्ण महाराष्ट्रात सिंचनाचे स्त्रोत उभे केले, अशी भूमिका मांडली.
सूत्रसंचालन डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले तर आभार मराठी विभागप्रमुख डॉ. संजय जगताप यांनी मानले.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. अजय गव्हाणे, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.अजय मुठे, डॉ.रत्नमाला म्हस्के, डॉ. प्रवीण तामसेकर, डॉ. साईनाथ शाहू, डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, संदीप पाटील, गजानन पाटील, कालिदास बिरादार, अभय थेटे, जगन्नाथ महामुने, राजू अडबलवार आदींनी सहकार्य केले.
यावेळी यशवंत महाविद्यालयाचा यशोदीप वार्षिकांक आणि डॉ.मदन अंभोरे लिखित ‘आधुनिक विज्ञानाचा रोमांचक इतिहास’ या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.बालाजी कोम्पलवार, डॉ.व्यंकटी पावडे, डॉ.दत्ता मेहत्रे, कु.गोदावरी कानशुकले, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Share

Related posts

विद्यार्थ्यांमध्ये क्षमताधिष्ठित कौशल्य विकसित करत रोजगाराची संधी देणारे अभ्यासक्रम अभ्यास मंडळानी तयार करणे काळाची गरज. – डॉ.डी.एन.मोरे.

Chief Editor

यशवंत ‘द्वारे शोधचक्र पोर्टलवर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

BH सिरीज वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा; अन्यथा विशेष तपासणी मोहिमेत कारवाई. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

Chief Editor

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांसाठी २१ ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स:आरोग्य सल्लागार- मीरा धूळगुंडे

Chief Editor

विद्यार्थ्यांच्या समस्यांवर कुलगुरूंचा थेट संवादातून सकारात्मक प्रतिसाद

Chief Editor

Leave a Comment