एम सी आर
Uncategorized

मराठवाड्यात विकासाची मोठी सुप्तशक्ती” – ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

नांदेड: प्रतिनिधी
“मराठवाड्याच्या विकासास डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दिलेल्या योगदानामुळे मराठवाड्याची स्थिती भीषण होण्यापासून वाचली. सिंचनाशिवाय मराठवाड्यातील शेतीच्या विकासाची शक्यता नव्हती, हे ते जाणून होते. त्यांच्या संकल्पनेतूनच जायकवाडी, विष्णुपुरी हे प्रकल्प पूर्ण झाले. मराठवाड्याकडे सुपीक जमीन, उपलब्ध जलसंपदा, कुशल मनुष्यबळ, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाची मोठी क्षमता आहे. कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान आणि वारसा पर्यटन यांची प्रभावी सांगड घातल्यास मराठवाडा हा महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो”, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा सिंचन प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) माधव भंडारी यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ‘डॉ. शंकरराव चव्हाण अध्ययन केंद्रा’च्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘मराठवाडा : काल, आज व उद्या’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण, डॉ. प्रशांत पेशकार आणि नारायण चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या व्याख्यानात माधव भंडारी यांनी मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहासाचा वेध घेत भविष्यातील विकासाच्या संधींवर सखोल विवेचन केले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील त्यांच्या नेतृत्वासोबतच सामाजिक समतेसाठीच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.
माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे जायकवाडी आणि विष्णुपुरीसारखे महत्त्वाचे सिंचन प्रकल्प साकार झाले आणि मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा असून तेर आणि भोगवर्धन ही प्राचीन व्यापारी केंद्रे ग्रीस व रोमपर्यंत व्यापार करत होती. कापूस, वस्त्रनिर्मिती, काच वस्तू, मणी, रंगद्रव्ये तसेच कृषी प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मराठवाड्यातील बारवांसारख्या पारंपरिक जलव्यवस्थापन पद्धतींचा उल्लेख करत त्यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. यादव राजवटीत मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या विकासाला मोठी चालना मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
रोजगाराच्या शोधात मराठवाड्यातील युवक मोठ्या शहरांकडे स्थलांतर करत असले तरी आगामी दशकात सुशिक्षित युवक पुन्हा शेतीकडे वळतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शेतीला प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेशी जोडण्याची गरज अधोरेखित केली. केळी, कापूस, कडधान्ये, तेलबिया यांसारख्या पिकांवर आधारित उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत बोलताना त्यांनी रेणुकामाता, अंबाजोगाई, तुळजाभवानी, औंढा नागनाथ, देवगिरी किल्ला तसेच मराठवाड्यातील ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि सांस्कृतिक वारसा यांचे प्रभावी संवर्धन व विपणन केल्यास हा प्रदेश देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरू शकतो, असे मत व्यक्त केले.
व्याख्यानाचा समारोप करताना त्यांनी, “इतिहास विसरून चालत नाही. इतिहास, जलसंपदा, शेती, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांच्या बळावर मराठवाड्याचा उज्ज्वल भविष्यकाळ घडविता येईल,” असा आशावाद व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले, “जोपर्यंत मराठवाड्यात पाणी वाहत राहील, तोपर्यंत या प्रदेशाला डॉ. शंकरराव चव्हाण यांची आठवण होत राहील. विष्णुपुरी धरण आणि जायकवाडीसारखे सिंचन प्रकल्प हे त्यांच्या दूरदृष्टीचे जिवंत स्मारक असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटचालीतील मैलाचे दगड आहेत.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी छायाचित्रकार विजय होकर्णे निर्मित डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जीवनकार्यावरील ‘गोदाकाठचा महान कर्मयोगी’ माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ आणि डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी प्रमुख वक्ते माधव भंडारी यांचा परिचय करून दिला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा देत त्यांच्या विकासदृष्टीचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. शंकरराव चव्हाण अध्ययन केंद्राचे समन्वयक प्रा. दिलीप चव्हाण यांनी केले. यावेळी विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, संशोधक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————

Share

Related posts

अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांचा समृद्ध वारसा पुढे चालू ठेवणारे खंबीर नेतृत्व : सचिन भाऊ साठे..

Chief Editor

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 मार्च रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलन

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

नितीन गायकवाड यांची अमरावती विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

Chief Editor

मांडवीयाञेत शंकर पटामुळे शेतकऱ्यांच्या. चेहऱ्यावर आनंद उत्साह.

Chief Editor

UPSC च्या तयारीसाठी स्पष्ट ध्येय, सातत्य आणि व्यावहारिक दृष्टिकोन आवश्यक – अश्नि कानकटे

Chief Editor

Leave a Comment