खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा
झटू सर्वभावे,करू स्वर्ग गावा
कळो हे वळो,देह कार्यी घडू दे
घडू दे प्रभो! एवढे हे घडू दे
रा. तुकडोजी महाराज
रा. तुकडोजीच्या ग्राम गीतेत ग्रंथ पठणापूर्वी आरंभीच म्हणावयाची ही प्रार्थना दिलेली आहे.तत्कालीन ग्रामे हे अनेक समस्यांचे माहेर घर होते. हे महाराजांनी गावोगावी भेटी देऊन अनुभवले होते.म्हणून ग्रामगीता वाचल्यानंतर त्यांनी गावातील कोणत्याही अंगाकडे दुर्लक्ष केलेले नाही असे दिसते.त्यांनी भोळ्या कल्पनांना,अंधश्रध्दा,सामाजिक जडत्व, यांस कोठेच वाव दिलेले नाही. या बाबींवर तर ते ग्रामगीतेतून उलट बरसले.त्यांनी या बाबतचे वाभाडे तर काढलेच पण यावरून आपले ग्राम कसे असावेत? आणि आपण काय करायला पाहिजे? यावर उपाय सुचवितांनी त्यांनी ग्रामसेवा ही,मनोभावे, निष्काम,निस्वार्थी भावनेने , चळवळीच्या स्वरूपात झटून करावी. जन्माला आलेला हा देह या कामी पडून गावे स्वर्गाचे रूप बनविले पाहिजे.असे होण्यासाठी ते वरील उद्धृक्त पंक्तीत प्रभूला प्रार्थना करतात.यावरून त्यांची गावां विषयीची तळमळ /कळकळ दिसून येते.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे महाराजांच्या काळात इंग्रजांचे राज्य होते. तेव्हा भारतात स्वातंत्र्यांच्या युध्दाचे वारे सुरू होते. त्याबाबतही लोकांत,”चेत रहा है भारत दुखसे,आग बुझाना मुश्कील है,उठा तिरंगा बढाये छाती,अब बहिलाना मुश्किल है !” ते असे ओजस्वी आवाहन जनतेला करतात.या अशा अनेक
देशाभिमानी पंक्तीतून देशाला चेतवन्याचे/चैतन्य देण्याचे कार्य ते सतत करतात.तुकडोजी हे एका जागी बसून प्रवचन देणारे बुवा नव्हते तर ते देशप्रेमाने ओथंबलेले खऱ्या अर्थाचे सळसळत्या रक्ताचे राष्ट्रसंत होते. याउलट आज आपण काय पाहतो. देशात देशप्रेमींचीच दुर्दशा झालेली आहे.नेते,अधिकारी, व्यापारी,पोलीस खाते,ह्या वर्गात तर ‘देशप्रेम ओठात, स्वार्थ पोटात’ असे दिसून येते.गंमत अशी कि, या व्यवस्थेतून पोलिस व लष्कर खाते सुध्दा सुटलेले नाही.ही देशाची शोकांतिका आहे.भ्रष्टाचाराने,अनीतेने, देश पोखरून गेलेला आहे. आजच्या घडीला फार काही बोटावर मोजण्याइतके लोकांत देशप्रेम शिल्लक आहे.ही परिस्थिती या भारत देशासाठी घातक आहे. आज चीन, पाकिस्तान हे सिमेजवळचे परंपरागत शत्रू बनले आहेत. त्यांची नीती भारताला खिळखिळी करण्याची आहे.त्यांची वारंवार युध्दाची भाषा व कुरापती करणे सदोदित सुरू असते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंताने तेव्हा दिलेली ,जाग उठो बालवीरो!अब तुम्हारी बारी है या राष्ट्रभक्तीच्या मंत्राची आजही नव्या पिढीला गरज आहे. हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
आपल्या देशात अंधश्रध्दा,अनिष्ट रूढी,हुंडाबळी या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. त्यांच्या काळातही होत्या व आजही आहेत.उद्याही राहणार. ही काळ्या दगडावरची रेष आहे.पण महाराजांचे मन सदैव तळमळत असल्याने आतातरी या देशातील खेडूतांनी आपले जीवन अंतर्बाह्य बदलले पाहिजे.या विचाराने ते झपाटलेले दिसतात.म्हणून “ग्रामगीता” चा जन्म झालेला दिसतो.यातील विचार हे ग्रामजीवनाच्या/माणसाच्या सुखी संसाराचे स्वप्न आहेत.म्हणून ती पूजनीय आहे.आजच्या पिढीने तिचा जप करून त्याप्रमाणे वागले पाहिजे.तेव्हाच तुकड्याला अपेक्षित असलेल्या माणसाची निर्मिती होईल. अशा माणसाची या देशाला आजची परिस्थिती पाहता नितांत गरज आहे.
राष्ट्रसंताने स्त्री, पुरूष हे संसारातील रथाचे दोन समान चाके असल्याचे म्हटले.पुरूषाइतकीच स्त्री सुध्दा तेवढीच महत्त्वाची आहे.मात्र लग्न संबंधाच्या वेळी वर, वरपिता,वरमाय ‘हुंड्याची’ अट घालतात. अशामुळे सुंदर, गुणवान,शिक्षित मुली सुद्धा या वाईट चालीरीतीने अविवाहित राहतात.या रूढीला महाराजांनी हे ‘समाजाचे ‘महापाप” असल्याचे संबोधले.अशा समाजविघातक रूढीला त्यांनी कडाडून विरोध केला. तसेच वैवाहिक जीवन कसे असावे व कसे असू नये. याचे सुंदर विवेचन ही महाराजांनी ग्रामगीतेत केले. दोघांच्याही संमतीने , एकमेकांना समजून,जाणून घेवून नंतरच लग्न करावे.असे महाराजांना अपेक्षीत होते.१०० वर्षापूर्वीचे हे विचार आजही तंतोतंत लागू होतात. आजही समाजात हुंड्यासाठी जाळल्या जाणाऱ्या भगिनी आहेत.याबाबत शिक्षितांचीच हाव वाढलेली आहे.कुणाचीही भगिनी , नातेवाईक असो आज स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष झाले पण स्त्रियांसोबत तंदूरी प्रकरणासारखे गुन्हे घडतच आहेत.हे गुन्हे वाचवायाचे असतील तर या संतांचे विचार अंगात आणने अती आवश्यक आहे.आतातरी नव कांक्षी वरांनी मी जर हुंडा घेतला,मी जर नववधूंशी राक्षसासारखा वागलो तर उद्या आपल्याही बहीण आहे,माझ्या नात्यातील स्त्री ही कुणाची तरी बायको होणार आहे.तिच्याशी हुंड्यासारखा छळणारा दुर्व्यवहार झाला तर कसे वाटेल? यांचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे.याचा विचार राष्ट्र संताने केलेला आहे. तसेच याबाबत भविष्यात वैवाहिक जीवनावर होणारे वाईट दुष्परिणाम हे सुध्दा विशद केलेले आहे.त्यांचे हे विचार आजही समाजात लागू होतात. सर्वांनीच याचा बोध घ्यावा. उत्कृष्ठ समाज व्यवस्था निर्माणसाठी, हे अत्यंत आवश्यक आहे.
या राष्ट्र संताने ग्राम उध्दाराची मशाल ग्रामस्थांच्या हाती वाणीने नव्हे तर कृतीने दिली.त्यासाठी त्यांनी मानवधर्माचा शंख फुंकला. गावागावात श्रीगुरूदेव सेवा मंडळे स्थापन केली.आपल्या तेजस्वी विचाराच्या प्रचारकाची धुरा या मंडळावर सोपवली. या माध्यमातून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी साठी उद्योगवर्ग,तरुणांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी व्यायाम वर्ग,महिलोन्नती
वर्ग,रामधून,व्यसननिर्मुलन,स्वच्छता सप्ताह,श्रमदान,कुस्ती स्पर्धा,यात्राशुध्दी,गोवंश रक्षण,विवाहसुधार,सहभोजन,भजन
स्पर्धा इत्यादी अनेक उपक्रमाची त्यांनी प्रभावी लाट उत्पन्न केली.त्यांच्या काळात ही प्रचार लाट प्रभावी होती.या उपक्रमांची ज्योत सतत तेवत ठेवण्याची जबाबदारी पुढील पिढीवर होती. पण काळ बदलला. शहरी लोकांवर भौतिक सुखाने जादू केली. लोक स्वार्थी बनले.एकमेकांना लुटू लागले.माणूस माणसाला विसरला. हे शहरी लोन हळूहळू खेड्यापर्यंत झिरपले.शहरी लोकांप्रमाणे तेही वागू लागले. आज खेडेसुध्दा बिघडले. असे दु:खाने म्हणायची पाळी येते.आज गुटका,खर्रा,दारू,रंडीबाजी,जुव्वा ,अश्लील नाटके,लुटमार याची उन्मतता खेड्यावर दिसत आहे.अशीच भयावह स्थिती वाढत राहिली तर गावे नरक होण्यास वेळ लागणार नाही. पर्यायाने हा भारतदेश नरकवाशी होण्यास वेळ लागणार नाही.आज बहुजण समाजच या दुष्कृत्याला/दुराचाराला जास्त बळी पडत चालला आहे.असे खेदाने म्हणावे लागते. यात सरकारचे धोरणे पण तितकेच कारणीभूत आहेत. यात शंका नाही.मात्र संतांनी गावलोकांसाठी आपली वाणी,लेखणी,करणी,नेहमीच समर्पित केलेली आहे.यात राष्ट्रसंत तुकडोजी पण अग्रणी होते.त्यांनी “ग्रामगीता”सारखा सूर्यग्रंथ गावे प्रकाशित करण्यासाठी दिला. विशेष म्हणजे यात बहुजण समाजासाठी मंत्र व तंत्र त्यात आहे.खरोखरच भगवान श्रीकृष्णाने जशी अर्जुनाला गीता ऐकवून त्याचा विषाद नाहीसा केला आणि त्यास धर्मयुध्दास प्रवृत्त केले. त्याप्रमाणे त्यांच्या ग्रामगीतेत महाराजांनी समाजाच्या उत्थानासाठी सर्व काही बारीक सारीक मार्गदर्शन करून ठेवलेले आहे.
आज अधोगतीस गेलेल्या खेडयांनी या ग्रामगीतेचे वाचन व आचरण केल्यास ते वैभवशाली नक्कीच होतील यात शंका नाही.एवढी शक्ती या तुकडोजींच्या विचारात आहे. मात्र मी सुरवातीलाच उद्धुक्त केलेल्या पंक्तीप्रमाणे आपण सर्वांनी गावात जावून तुकडोजींचे पाईक बनले पाहिजे. तेथे निष्काम सेवा दिली पाहिजे.आपला देह तुकड्यासारखा झिजविला पाहिजे.हीच खरी देशसेवा होय. आणि हीच काळाची गरज होय.
जय गुरुदेव
-डॉ.चंद्रकांत लेनगुरे,गडचिरोली
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.