https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

करारी व कर्तबगार: व्ही.पी.ठाकूर -डॉ.अजय गव्हाणे

करारी व कर्तबगार: व्ही.पी.ठाकूर
-डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड

साधारणतः असे म्हटले जाते की, सर्व सोंग आणता येतात; पैशाचं सोंग आणता येत नाही. हे सर्व अर्थाने खरे आहे की, पैशाचा उच्चार झाला की संबंध, भावना, नाती व विचार लगेच बदलतात. त्यामुळेच साम्यवादाचे जनक कार्ल मार्क्सने सर्वच घटकांच्या व प्रेरणेच्या मुळाशी अर्थ म्हणजेच पैसा असतो, असे म्हटले आहे.
या ठिकाणी उपरोल्लेख करण्याचे कारण आहे की, यशवंत महाविद्यालयातील लेखापाल श्री.व्ही.पी. ठाकूर एप्रिल महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. लेखापाल या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेल्या पदावर कार्यरत असताना देखील त्यांनी कर्तव्यामध्ये कोणतीही कसूर न करता इतरांबरोबरचे संबंध देखील सुमधुर ठेवले; यातच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य दडलेले आहे.
एक करारी व कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कोणतीही संस्था, महाविद्यालय, शाळा यांच्या पारदर्शक, लोकहितदक्ष व्यवहाराच्या मुळाशी संस्थेचे माननीय पदाधिकारी, प्राचार्य, प्रबंधक हे घटक असतातच तसेच कर्मचाऱ्यांचाही फार मोठा सहभाग या यशस्वीतेच्या मुळाशी दडलेला असतो. व्ही.पी.ठाकूर हे अशा यशरुपी वटवृक्षाचे एक घटक आहेत. व्ही.पी.ठाकूर हे उच्च विद्याविभूषित असून १९९१ मध्ये त्यांनी यशवंत महाविद्यालयातून एम.कॉम. पदवी धारण केली आहे, लगेच ते १९९२ पासून कनिष्ठ लिपिक पदावर यशवंत महाविद्यालयात रुजू झाले. तदनंतर त्यांच्या उत्कृष्ट सेवेचा परिपाक म्हणून वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक आणि आज ते लेखापाल म्हणून सेवानिवृत्त होत आहेत.
कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्येही गुणवत्ता व समाजजीवनाविषयी अपार भावनिक सौख्य असते. याचे उत्तम उदाहरण व्ही.पी.ठाकूर आहेत. त्यांनी १९८५ मध्ये एनसीसीमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे तसेच आर्मी अटॅचमेंट शिबिरात रौप्य पदक पटकावले आहे.त्यांना महाराष्ट्र डायरेक्टरेटतर्फे एनसीसीतील विशेष प्राविण्यासाठी शिष्यवृत्ती देखील प्राप्त झाली आहे. यशवंत महाविद्यालयात कार्यरत असताना सुट्टी, सणवार किंवा कार्यालयीन वेळेची सीमारेषा ओलांडणारा हा कर्मचारी दिसण्यास व वागण्यात कठोर असला तरी मनाने स्वच्छ, पारदर्शी व नितळ आहे. सत्य बोलणे, खऱ्याची कास धरणे आणि जे आहे त्यावर ज्या त्या वेळेस भावना व्यक्त करणे; त्यामुळेच वरकरणी इतरांना कठोरता वाटत असली तरी दीर्घकालीन व कायम मैत्री व नातेसंबंधासाठी उपरोक्त स्वभाव लाभदायक असतो, हा जवळपास सर्वच ज्येष्ठांचा अनुभव आहे.
हा स्वभाव धारण करणारे व्ही.पी. ठाकूर यांचे वक्तव्य, व्यवहार आरशाप्रमाणे स्वच्छ व पारदर्शक आहे. एकूण ३४ वर्षे यशवंत महाविद्यालयात सेवा प्रदान करणारे व्ही.पी. ठाकूर स्वतःच्या जीवनातील वाटचाल व यश भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण आणि श्रद्धेय कै.सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या चरणी अर्पण करतात. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण आणि माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांच्या विषयी सहृदय कृतज्ञता व्यक्त करतात.
माजी प्राचार्य स्व. एन. सी. वरदाचार्यलू यांनी महाराष्ट्रात अत्यंत उत्कृष्ट व नामांकित असलेल्या श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीत सेवेची संधी दिल्याबद्दल आदरयुक्त आभारभाव व्यक्त करतात तसेच कार्यप्रवणतेसाठी संस्थेचे सचिव माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, सहसचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष ॲड. उदयराव निंबाळकर यांची प्रेरणा असल्याचे नमूद करतात. कार्यसंस्कृतीमय प्राचार्य आणि संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ.बी.एस.ढेंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल ते कृतार्थ भाव व्यक्त करतात. माजी कुलगुरू तसेच तत्कालीन प्राचार्य डॉ. एन. व्ही.कल्याणकर, डॉ.ए.एन.जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे या प्रशासकांच्या कार्यशैलीबद्दल ते प्रभावी आहेत. विशेषतः प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे जे महाराष्ट्रातील शिक्षणतज्ञ, संशोधक आणि हाडाचे प्रोफेसर आहेत तसेच उत्कृष्ट प्रशासनाची त्यांची हातोटी, नियम आणि कायद्याच्या आकृतीबंधामध्ये राहून कार्य करण्याच्या पद्धतीमुळे ते त्यांच्या कार्यशैलीची मन भरून स्तुती करतात. या प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याचा आनंद अवर्णनीय असल्याची नोंद ते घेतात.
सेवानिवृत्ती हा प्रत्येक शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या जीवनातील अपरिहार्य भाग आहे. मात्र कृतार्थ भाव मनात ठेवून सेवा व पदाला सलाम करणे, प्रत्येकाच्या जीवनात येईलच असे नाही. व्ही.पी. ठाकूर अशा कर्मचाऱ्यांपैकी आहेत, ज्यांनी सेवेच्या प्रत्येक पदावर प्रत्येक क्षणी केवळ कर्तव्य न बजावता आनंदाने जबाबदारी पार पाडली आणि समाधानाची स्मृती मनात ठेवून जीवनाच्या वाटचालीतील प्रत्येक टप्प्यावरील प्रत्येक माणसाबद्दल धन्यता व्यक्त करत आहेत. ही धन्यता आज त्यांच्या मनातील नोकरी, कर्तव्य व सेवेविषयी अभिभाव व्यक्त करते.
श्री.व्ही.पी.ठाकूर यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी जावो; ही सदिच्छा!
-प्रा.डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704