क्रीडा व मनोरंजनसंपादकीय
जननायकाच्या आक्रोशाचे क्रांतीनाट्य धरती आबा बिरसा मुंडा
भारत भूमी ही विविध जाती -धर्मांनी ,संप्रदाय, संस्कृतीने नटलेली संपन्न भूमी आहे. या भूमीवर अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन येथील समाजाला जागृत करण्याचे कार्य केलेले आहे .प्रामुख्याने जंगलात,दऱ्याखोऱ्यात, कड्या कपारीत मुख्य प्रवाहापासून दूर परंतु निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आदिवासी समाज हाच इथला मूळ निवासी समाज आहे.
या अनुसूचित जमातीमधील स्वाभिमान जागृत करीत स्वधर्म, स्वभाषा, संस्कृतीचा जागर करणारा बिरसा मुंडा या क्रांतिकारकत्वाचे योगदान इतिहासात अत्यंत दखलपात्र असतानाही म्हणावे तशी दखल इतिहासकारांनी घेतली नाही. त्याचे कार्य समोर आलेले नाही. ही खंत, ही उणीव दूर करण्यासाठी ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्लारपुरे यांनी आदिवासी समाजातील क्रांतिकारक नेतृत्व ज्याने अल्पावधीत ब्रिटिशांसारख्या बलाढ्य सत्तेपुढे न झुकता न डगमगता लढवय्याची भूमिका घेऊन उपलब्ध बळावरच निकराची झुंज दिली. अशा दुर्लक्षित परंतु ऐतिहासिक दृष्ट्या मोलाचे योगदान देणाऱ्या बिरसा मुंडा सारख्या क्रांतिकारकात्वाचे कार्य सर्वांसमोर नाट्याच्या माध्यमातून यावे, याकरिता ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्लारपुरे यांनी धरतीआबा क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा या क्रांती नाटयाचे लेखन केलेले आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी चुडाराम बल्हारपुरे लिखित ,अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित धरतीअबा बिरसा मुंडा हे विचारप्रवृत्त नाटकाचा राष्ट्रीय जनजाती गौरव दिन व बिरसा मुंडा यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर येथील महात्मा गांधी चौकात उत्स्फूर्त प्रतिसादात प्रयोग झाला .बिरसा मुंडा यांचे बालपण, परिस्थिती, वातावरण, जडणघडण , ऐतिहासिक कार्य ,वैचारिक क्रांतीचे ३ अंकात लेखन नाटककाराने प्रत्ययकारीपणें केले आहे.
बिरसा मुंडा यांचे बकाल वास्तव्य, दारिद्र्य ,परिस्थितीशी झुंज देत कौटुंबिक वाताहातीचे जगणे किंबहुना ब्रिटिशांनी जबरदस्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावयास लावून त्या धर्माच्या अनुपालनाची केलेली सक्ती ,आदिवासी विरोधी ब्रिटिश कायदे या सर्व बाबी प्रेक्षकांसमोर मांडण्यात नाटककार, कलावंत व दिग्दर्शक यशस्वी झाले. जंगल आणि जमिनीसाठीचा बिरसा मुंडा यांचा अस्तित्व लढा व संघर्ष सर्वश्रुत आहे.
बिरसा मुंडा यांचे क्रांतिकारकत्व, सहकाऱ्यांनी केलेले योगदान, मुंडा समाजाला जागृत करण्याकरिता त्यांनी केलेला संघटनकौशल्याचा व युक्तिवाद कौशल्याचा वापर या अनुषंगाने नाटकातील केलेली मांडणी सरस व परिणामकारक ठरली. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा जीवन संघर्ष व कार्य निश्चितच प्रेरणादायी स्वरूपाचे असल्याचा संदेश देण्यात यशस्वी ठरले.
बिरसाचा जन्म ,बालपण, ख्रिश्चन धर्म प्रसाराचा धिकार, संघटन, जंगल व जमिनीकरिता आंदोलन, ब्रिटिशांशी संघर्ष, नातेवाईकाकडून फसवणूक , तुरुंगवास, शिक्षा तुरुंगातच हैजा ने आजारी असल्याचा बेबनाव करण्यात येऊन विष देउन मारण्यात आले असे विविध प्रसंग पाहताना प्रत्यक्ष इतिहास डोळ्यासमोर उभा होतो.बिरसा या व्यक्तिमत्वातील बासरीवादक,अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणारा क्रांतिकारक,नेतृत्व, धर्म संस्थापक, चमत्कारी व्यक्तिमत्व, वैद्य समाजसेवक व संघर्षशील हे वेगवेगळे पैलू नाटकातून मांडण्यात आले आहेत. रेला रेला रे रेला, घे मशाल घे क्रांतीची मशाल घे नव्या क्रांतीची पहाट झाली मशाल घे, जन्माला आला शेर जंगलाचा सव्वाशेर थयथय नाचाया रानाच्या छाताडावर , उलगुलान घे उलगुलान, मूडद्याला दागिन्याची गरज हाय काय माय विकून पोट भरलं तर बिघडलं काय माय, येरे बिरसा परतुनी ये पुन्हा अशा आशय वाहक गीतातून नाट्य उलगडत पुढे जाते व प्रेक्षकांच्या मनाची ठाव घेते. संगीताच्या साथीमुळे हे नाटक प्रेक्षकांच्या स्मरणात राहते.