भारतीय राजकारणाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी होऊन गेली की,ज्यांनी केवळ राजकीय किंवा प्रशासकीय क्षेत्रातच नव्हे, तर समाजाच्या मानसिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक जडणघडणीतही अमीट ठसा उमटवला आहे. कै. डॉ. शंकरराव भाऊराव चव्हाण हे अशाच दुर्मिळ लोकनेत्यांपैकी एक. त्यांची दिनांक 14 जुलै रोजी जयंती आहे. डॉ शंकरराव जी चव्हाण यांनी विकासाकडे केवळ भौतिक दृष्टिकोनातून न पाहता त्यामागे आध्यात्मिक मूल्यांची अधिष्ठानभूमी आणि वैज्ञानिक नियोजनाची काटेकोर चौकट उभी केली.
डॉ शंकरराव जी चव्हाण यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाल्यामुळे त्यांना ग्रामीण जीवनातील वास्तव, दुष्काळाचे चटके, पाण्याची टंचाई आणि शेतीची अस्थिरता यांचा प्रत्यक्ष अनुभव होता. या अनुभवांनी त्यांच्यात पाण्याविषयी एक वेगळेच संवेदनशील भान निर्माण केले. पाणी हा केवळ नैसर्गिक संसाधन नसून तो जीवन, संस्कृती आणि समाजव्यवस्थेचा आधार आहे, हे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे ओळखले.
त्यांच्या दृष्टिकोनात वैज्ञानिकता ही अत्यंत महत्त्वाची होती. धरणे, कालवे, जलसंधारण प्रकल्प यांचे नियोजन करताना ते प्रकल्पाचा भूगोल, जलप्रवाह, पर्जन्यमान, मृदा रचना आणि शेतीच्या गरजा यांचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेत असत. जायकवाडी, विष्णुपुरी, पूर्णा, मांजरा यांसारख्या प्रकल्पांच्या उभारणीत ही वैज्ञानिक दृष्टी स्पष्टपणे दिसते. त्यांनी जलव्यवस्थापनाला शास्त्रीय शिस्त दिली आणि मराठवाड्यासारख्या अवर्षणग्रस्त प्रदेशाला नवजीवन दिले.
मुख्यमंत्री असताना एका सिंचन प्रकल्पाच्या बैठकीत त्यांनी कालव्याचा उतार, पाण्याचा प्रवाह आणि जलसाठ्याची क्षमता याबाबत इतके अचूक प्रश्न विचारले होते की,त्या ठिकाणी उपस्थित सर्वच अभियंते काही वेळ उत्तर देऊ शकले नाहीत. बैठकीनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विनोदाने म्हटले होते, “आज आम्हाला मुख्यमंत्री नव्हे, मुख्य अभियंता भेटले.” एवढे ते अभ्यासू होते.
त्यांच्या सोबतच्या बैठकीपूर्वी अभियंते सर्व आकडे, खर्च, पाणीसाठा, लाभक्षेत्र आणि तांत्रिक तपशील अनेकदा तपासत असत. कारण शंकरराव जी चव्हाण कोणत्याही मुद्द्यावर सखोल प्रश्न विचारतील, याची त्यांना खात्री वाटत असे.
पाणी व्यवस्थापनावरील त्यांचा दृष्टिकोन हा आधुनिक “हायड्रोलॉजिकल सायन्स”शी सुसंगत होता. पाण्याचे साठवण, वितरण, उपयोग आणि पुनर्वापर या सर्व बाबींवर त्यांनी भर दिला. त्यांच्या मते, पाणी नियोजनाशिवाय विकास हा अपूर्ण आहे. त्यामुळे त्यांनी सिंचन क्षेत्रात दीर्घकालीन दृष्टी ठेवून धोरणे आखली. या धोरणांमुळे महाराष्ट्रातील कृषी उत्पादन वाढले आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक स्थिर झाली.
परंतु,डॉ शंकरराव जी चव्हाण यांच्या कार्याचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची आध्यात्मिक वृत्ती. ते जरी कडक प्रशासक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले नेते होते, तरी त्यांच्या जीवनात भारतीय आध्यात्मिक परंपरेचा खोल प्रभाव होता. संत परंपरेतील “सर्वभूत हित” ही संकल्पना त्यांनी आपल्या कार्यात अंगीकारली होती. पैठणसारख्या संतभूमीत जन्म झाल्यामुळे संत एकनाथ, वारकरी परंपरा आणि भक्तीसंस्कृती यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या दृष्टीने राजकारण हे सत्तेचे साधन नसून “लोकसेवा हीच ईश्वरसेवा” या तत्त्वाचे प्रत्यक्ष आचरण होते.
त्यांच्या आध्यात्मिकतेचे वैशिष्ट्य म्हणजे ती कर्मकांडप्रधान नव्हती, तर व्यवहारिक आणि मानवतावादी होती. त्यांनी अंधश्रद्धा नाकारली, परंतु श्रद्धा आणि मूल्यसंस्कार यांना कधीही कमी लेखले नाही. ते सर्व धर्मांचा आदर राखत,त्यांनी समाजात एकात्मतेचा संदेश दिला.
डॉ शंकरराव जी चव्हाण यांच्या अध्यात्मिक वृत्तीचाही त्यांच्या सार्वजनिक जीवनावर सकारात्मक प्रभाव होता.पंढरपूरचा श्री पांडुरंग , शिर्डीचे साईबाबा आणि पुट्टपर्थीचे सत्यसाईबाबा यांच्याविषयी त्यांना विशेष श्रद्धा होती. कीर्तन, प्रवचन, शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत यांत त्यांना रस होता. सर्व धर्मांप्रती आदर राखत असताना अंधश्रद्धेविरोधी भूमिका घेण्याचे धैर्यही त्यांनी दाखवले.त्यांच्याच कार्यकाळात त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरातही सभामंडपाचे भूमिपूजन केले.श्री क्षेत्र देहू आळंदी विकास समितीचे तसेच इंद्रायणी काठी घाट बांधकामासाठी ते स्वतः ह भ प धुंडा महाराज देगलूरकर, ह भ प किसन महाराज साखरे, श्री उद्धव बापू आपेगावकर, श्री बाळासाहेब भारदे, श्री विश्वनाथ कराड आदी संत मंडळींना सोबत घेऊन ते देहू, आळंदी येथे गेले व त्यांनी घाट बांधकामाच्या सूचना केल्या. त्यांना अध्यात्माची प्रचंड आवड होती. नांदेड येथे न भूतों भविष्यती असा श्री ज्ञानेश्वरी पारायण व सत्संग सोहळा त्यांनी आयोजित केला होता .यामध्ये महाराष्ट्रातील त्याकाळचे अनेक नामवंत कीर्तनकार ,प्रवचनकार तसेच विद्वान लोक आले होते. यावेळी ह भ प श्री बाबा महाराज सातारकर, श्री किसन महाराज साखरे, डॉ यु म पठाण आदींसारखी त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी उपस्थित होती. त्यांच्यामुळेच नांदेडला पुट्टपूर्ती येथील श्री सत्य साईबाबा यांचा सुद्धा दर्शन व प्रवचनाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला, तसेच स्वाध्याय परिवाराचे प्रणेते श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांचा एक भव्य दिव्य कार्यक्रम झाला होता. साहित्य व संगीताच्या बद्दल असलेल्या आवडीमुळे नांदेडला अनेक संगीताचे कार्यक्रम झाले होते. त्यांनीच नांदेडला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुद्धा घडवून आणले. शिक्षण, संगीत, नाटक, अध्यात्म तसेच विज्ञान यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात “वैज्ञानिक बुद्धी” आणि “आध्यात्मिक हृदय” यांचा सुंदर संगम दिसतो.
श्री शंकरराव जी चव्हाण यांचा आध्यात्मिक दृष्टिकोन त्यांच्या विकासकामांमध्येही प्रतिबिंबित होतो. त्यांच्या मते, खरा विकास म्हणजे केवळ रस्ते, धरणे किंवा इमारती नव्हेत, तर माणसाच्या जीवनात शांतता, स्थैर्य आणि समाधान निर्माण करणे. त्यामुळे त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक संस्था उभारणीला विशेष प्राधान्य दिले. नांदेडसारख्या भागात त्यांनी शैक्षणिक संस्था,शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन करून “ज्ञानाधिष्ठित समाज” घडविण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या कार्यात विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय अत्यंत स्पष्ट दिसतो. विज्ञानाने त्यांनी संसाधनांचे व्यवस्थापन केले, तर अध्यात्माने त्या संसाधनांचा उपयोग मानवकल्याणासाठी केला. विज्ञानाने त्यांनी नियोजनाची शिस्त दिली, तर अध्यात्माने त्या नियोजनाला नैतिक अधिष्ठान दिले. त्यामुळे त्यांचे नेतृत्व हे केवळ तांत्रिक नव्हते, तर मूल्याधारित होते.त्यांच्या कार्यशैलीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णयप्रक्रियेत त्यांनी भावनांपेक्षा तथ्यांना महत्त्व दिले. हे वैज्ञानिक दृष्टीकोनाचे लक्षण आहे. परंतु त्याच वेळी त्या निर्णयांमागे समाजहिताची, मानवकल्याणाची आणि नैतिकतेची भूमिका होती, जी त्यांच्या आध्यात्मिक विचारसरणीतून आली होती. त्यामुळे त्यांचे निर्णय हे कठोर असूनही मानवी संवेदनांनी परिपूर्ण असत.
जलसंपदा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी “जल हे जीवन आहे” या तत्त्वाला प्रत्यक्ष स्वरूप दिले. परंतु हे करताना त्यांनी जलव्यवस्थापनाला शास्त्रीय पद्धतीने विकसित केले. पर्जन्य पाणी साठवण, कालव्यांचे जाळे, सिंचन वितरण प्रणाली आणि पाण्याच्या न्याय्य वाटपाची संकल्पना त्यांनी प्रभावीपणे राबवली. त्यामुळे शेतीला स्थैर्य मिळाले आणि ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडली.
दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री, ग्रह मंत्री यासारखी मोठमोठी खाते सांभाळून देखील त्यांनी कधीही अहंकार केला नाही. त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा प्रभाव त्यांच्या साधेपणातही दिसून येतो. उच्च पदावर असूनही त्यांनी कधीही अहंकार बाळगला नाही. त्यांचे वर्तन संयमी, मितभाषी आणि कर्तव्यनिष्ठ होते. सत्ता ही सेवा आहे, हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले. हीच त्यांची खरी आध्यात्मिक साधना होती.
डॉ. शंकरराव चव्हाण जी यांचे व्यक्तिमत्त्व हे “आधुनिक भारताच्या विकासदृष्टीचे आध्यात्मिक वैज्ञानिक” असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी विज्ञानाच्या आधारावर विकासाची दिशा ठरवली आणि अध्यात्माच्या आधारावर त्या विकासाला मानवतावादी अर्थ दिला. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ राजकीय किंवा प्रशासकीय न राहता ते एक सामाजिक तत्त्वज्ञान बनले.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारप्रसंगी काढलेले गौरवोद्गार आजही स्मरणात राहतात. त्यांनी म्हटले होते, “शंकररावांचे परिश्रम, प्रयत्न, प्रामाणिकपणा, शिकाऊ वृत्ती आणि प्रशासन कौशल्य वाखाणण्याजोगे आहे; परंतु त्यांचे निष्कलंक चारित्र्य हे सर्वांत मोठे आहे.” या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा सार दडलेला आहे.आजच्या पिढीने डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जीवनाकडे केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर विकासद्रष्टे प्रशासक, जलसंस्कृतीचे जनक, शिक्षणप्रेमी समाजसुधारक आणि मूल्यनिष्ठ लोकनेते म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यांनी दिलेला विकासाचा वारसा, प्रामाणिकपणाचा आदर्श आणि लोकसेवेचा संदेश पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.
आजच्या काळात जेव्हा विकास आणि पर्यावरण, विज्ञान आणि मूल्ये, प्रगती आणि संस्कृती यांच्यात संतुलन साधण्याची गरज भासते, तेव्हा श्री शंकरराव जी चव्हाण यांचे विचार अधिकच समर्पक ठरतात. त्यांनी दाखवलेला मार्ग हा शाश्वत विकासाचा आहे,जिथे विज्ञान आहे पण संवेदना हरवत नाही, आणि अध्यात्म आहे पण अंधश्रद्धा नाही.
अशा या दूरदृष्टीच्या, मूल्यनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या लोकनेत्याचे योगदान हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनातून हेच शिकायला मिळते की खरा विकास तोच, जो विज्ञानाच्या प्रकाशात आणि आध्यात्मिक मूल्यांच्या आधारावर घडतो.
नांदेड, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या या थोर लोकनेत्याच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!🙏🙏
प्रा. डॉ. विजय नागोराव भोसले,
रसायनशास्त्र विभाग,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.
मो क्र 9403067252
