सामाजीक

दिवंगत लोककलावंत दादा पारधी यांना राष्ट्रसंत साहित्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

चंद्रपूर,प्रतिनिधी :-
झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध लोककलावंत तथा ज्येष्ठ समाजसेवी दादा अंताराम पारधी यांचे वृद्धापकाळाने मालडोंगरी (ता. ब्रम्हपुरी) येथे निधन झाले. त्यांना राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि झाडीबोली साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी पद्धतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . या श्रद्धांजली सभेत एड. राजेंद्र जेनेकर( राजुरा), श्रीकांत धोटे (टाकळी- चना), प्रा .डॉ. श्रावण बाणासुरे (बल्लारपूर), ऊर्जानगर शाखेचे विलास उगे, देवराव कोंडेकर, झाडीपट्टीचे नाट्य कलावंत अंबादास कामडी (देसाईगंज), झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे, सहसचिव संजीव बोरकर, पांडुरंग विरूटकर, मनोहर पासपुते (मानोली), नामदेव पिज्दूरकर (मुल), कवयित्री अर्जूमन शेख (बल्लारपूर), अनिल चौधरी ( रामपूर), यवनाश्व गेडकर (बुटीबोरी), भाऊराव पत्रे, प्रा. नामदेव मोरे आदींनी आपल्या शोक संवेदना श्रद्धांजली स्वरूपात अर्पण केल्यात तसेच दादा पारधी यांच्यासोबत घालवलेल्या अनेक आठवणी सांगितल्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना राजेंद्र जेनेकर यांनी केली तर तंत्रनियोजन प्रा. बानासुरे यांनी सांभाळले.

८ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने मालडोंगरी (ता. ब्रम्हपुरी) येथे दादा पारधी यांचे निधन झाले. लोककलावंत म्हणून त्यांनी आपल्या आयुष्याचे सुमारे ३५ वर्षे जनप्रबोधनाच्या कार्यात घालविले. नकला, खडी गंमत ,दंडार, नाटकांच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनातून लोकप्रबोधन प्रभावीपणे केलेले आहे.

त्यांनी शासनाच्या साक्षरता अभियान, लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम, आधुनिक शेती, निसर्गोपचार, श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी च्या कार्यांतही त्यांनी योगदान दिले आहे. कर्मयोगी संत श्री तुकारामदादा गीताचार्य यांचा पावन सहवास त्यांना लाभला आहे. ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे कार्यकारीणी सदस्य होते. अनेक राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात ते आपली उत्स्फूर्त सेवा देत असत. स्थानिक शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी घुग्घुस येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात विशेष निष्काम सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच गेल्या महिन्यात त्यांना गडचिरोली झाडी बोली साहित्य मंडळाचे वतीने उत्कृष्ट झाडीपट्टी लोककलावंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या सेवाकार्याचे आम्हाला सदैव स्मरण होत राहील, अशी श्रद्धांजली ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी याप्रसंगी अर्पण केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.