https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
महाराष्ट्र

गडचिरोली शहरातील वनजमिनीवर ले-आऊट पाडून परस्पर विक्री

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वनविभागाच्या  ५ एकर जागेवर लेआऊट तयार करून कोट्यवधी रुपयांत नोटरी करून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली वनपरिक्षेत्रअंतर्गत उजेडात आला आहे. यामुळे शहरात खळबळ माजली असून याप्रकरणी ४ आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींची नावे जाहीर करण्यास वनविभागाकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केल्या जात आहे.

शहराच्या आयटीआय ते गोकुळनगर बायपास मार्गावरील सर्वे क्रमांक २१ च्या जागेवर लेआऊट तयार करून जागेची विक्री केल्या जात आहे. ही जागा वनविभागाची असल्याचे उघड झाल्यानंतरही विक्री सुरूच होती. तब्बल ८ महिन्यांच्या दप्तर दिरंगाईनंतर संबंधित ४ आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यांची नावे जाहीर करण्यास वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविल्याने वन विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी गुन्हा दाखल झाला असल्यास नावे जाहीर करण्यास काहीही हरकत नाही, असे स्पष्ट केले. परंतु वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

नावे गोपनीय ठेवण्याचे कारण काय ?

एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास त्यांची नावे माध्यमांना देण्यास काहीही हरकत नाही. असे वरिष्ठ अधिकारी सांगत असल्यावरही त्याखालील अधिकारी व चौकशी अधिकारी आरोपींची नावे जाहीर करण्यास तयार नाही. यावरून वनविभागातील अधिकाऱ्यांमध्ये कारवाईवरून एकमत नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे. सोबतच इतक्या दिवसांपासून वनविभागाच्या भूखंडाची सर्रास विक्री होत असताना संबंधित अधिकारी झोपा काढत होते काय, असा प्रश्न देखील फसवणूक झालेल्या काही नागरिकांनी  उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात वन विभागातील अधिकारी आणि भूखंड माफिया यांचे साटेलोटे तर नाही ना,अशी चर्चा शहरात आहे.

विक्री होत असलेली जमीन वन विभागाची असल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित लोकांना जमिनीसंदर्भात कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यांनी तीनवेळा नोटीस दिल्यानंतर कागदपत्रे सादर केली. मात्र, यात ते सदर जागेचे मालक असल्याचे सिध्द होत नसल्याने त्यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु तोपर्यंत अनेकांना त्या लेआऊटमधील भूखंडाची विक्री करण्यात आली होती. अजूनही भूखंडांची विक्री सुरू असल्याचे कळते. यात ४ आरोपींवर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर भूखंडाजवळ वनविभागातर्फे बोर्ड लावण्यात आले मात्र सदर बोर्ड हे प्लॅस्टिक बॅनर चा असल्यामुळे वेगाने हवा आलीतरी देखील सदर बोर्ड पडून जाईल. तरी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी संबधित गैरप्रकाराकडे लक्ष देऊन कारवाई करावे अशी मागणी होत आहे. 

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704