मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम राहणे; हाच आरोग्याचा पाया.: प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

–
नांदेड:(दि.१८ नोव्हेंबर २०२२)
यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या वतीने आयोजित माता सुरक्षित तर देश सुरक्षित या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मुलींसाठी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी दि.१७ नोव्हेंबर रोजी आयोजित आरोग्य शिबिर संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, आरोग्य म्हणजे मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक संतुलन राखणे होय. मन आणि मेंदू यांचे संतुलन असेल तरच बौद्धिक दृष्टिकोनातून विकास साधता येतो आणि शारीरिक आरोग्य सुद्धा चांगले राहते. यासाठी मुलींनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे स्पष्ट केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी, माता आणि बालकांच्या सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी ही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असून निश्चितपणे त्यामध्ये महिलांचा वाटा अधिक असतो; कारण निसर्गतःच ती जबाबदारी स्त्रियांवर आहे. कुपोषण, माता आणि बालमृत्यू यांचे प्रमाण कमी करायचे असेल तर आरोग्याचे शिक्षण असणे अत्यावश्यक असून दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना महात्मा गांधींनी सुद्धा स्वतःच्या बाळाच्या आणि पत्नीच्या सुरक्षिततेसाठी बाल संगोपनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते, म्हणून ही जबाबदारी कुटुंबाची असून शारीरिक मानसिक बौद्धिक दृष्टिकोनातून निरोगी असणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम भुरके, डॉ.गजानन मुंगीलवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले, वरून निरोगी दिसणाऱ्या अनेकांमध्ये रक्ताची कमतरता, लोहाची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता, वाढणाऱ्या वजनाचा त्रास, सिकलसेल कॅन्सर असे वेगवेगळे आजार निदर्शनास येतात म्हणून नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याकडे विद्यार्थ्यांनी अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक नवनवीन आजार वाढत आहेत; म्हणून निरोगी राहण्यासाठी सतत जागरूक राहिले पाहिजे; असाही संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाला नांदेड महानगरपालिकेतील शिवाजीनगर युनिट चे सौ.फुलारी एस.आर., मीना चव्हाण, संजय कळसे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम आयोजनामध्ये डॉ.मिरा फड, डॉ.मंगल कदम, डॉ.अंजली जाधव, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ.जगताप यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मीरा फड यांनी तर प्रास्ताविक डॉ. अंजली जाधव यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबंधक संदीप पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले, कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
याप्रसंगी डॉ.अजय गव्हाणे, डॉ.स्वामी व्ही.जी.,डॉ.संगीता शिंदे(ढेंगळे), डॉ.शबाना दुर्रानी, कल्पना सावळे , श्रीमती मांजरमकर,सौ.भालके,अनुराधा मती, सौ.मनीषा बाचोटीकर, सौ.काकडे, डॉ.सीमा शिन्दे,डॉ.फरहान काझी इत्यादींची उपस्थिती होती. शिबिरात १७५ मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
–
———————————————