अण्णाभाऊ साठे यांनी शोषितांचा आवाज साहित्यातून मांडला- प्रा. राहुल पुंडगे

–
उदगीर प्रतिनिधी:- अण्णाभाऊ साठे एक थोर समाज सुधारक, परिवर्तनवादी साहित्यिक होते. त्यांनी कथा, कादंबरी, स्फुटलेखन पोवाडे, शाहिरी आदी साहित्याच्या माध्यमातून समाज जागृती करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अत्यंत गरीबी आणि हालाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही.फक्त दीड दिवस शाळा शिकुन जगात अण्णाभाऊ यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली आहे. त्यांचे लेखन हे येथील उपेक्षित, दलीत, कष्टकरी, कामगार यांचे प्रतिनिधित्व करणारे होते. त्यामुळे अण्णाभाऊचे साहित्यिक लेखन हे शोषितांचे व समाजातील तळागळातील लोकाचा आवाज आहे असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांनी केले.
येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्फत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रा. राहुल पुंडगे बोलत होते. यावेळी स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयांचे प्राध्यापक संजय हट्टे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अमर तांदळे, संगणकशास्त्र विभागाचे प्रभारी प्रा. राशेद दायमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. राहुल पुंडगे असे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्यावर छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, छ.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विचाराचा प्रभाव होता. त्यांनी विपुल साहित्य लेखन केले आहे. आजच्या तरुणाईनी अण्णाभाऊ यांचे वास्तववादी साहित्य वाचले पाहिजे त्यांचे विचार अंगीकृत केले पाहिजे. असे ही ते म्हणाले.
यावेळी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अमर तांदळे यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी समाजात जाणीव जागृती केली. त्यांनी शिवजयंती, गणेश उत्सव साजरे करण्याची सुरुवात केली.इंग्रज सरकार विरुद्ध बंड पुकारले यासाठी त्यांना सहा वर्ष कारावासाची शिक्षा देखील झाली. असे ते म्हणाले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सचिन तोगरीकर, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा.नम्रता कुलकर्णी, प्रा. रोहिणी वाघमारे, प्रा. पूजा माने, प्रा. अंजली रविकुमार, प्रा. पटेल सय्यदा,
अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, काजल सांगवे, बायडी वाघमारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.पूजा माने तर आभार प्रा. नम्रता कुलकर्णी यांनी मानले.