ताज्या घडामोडी

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा.डॉ. संगीता गणपतराव घुगे तर उदघाटकपदी प्रा.डॉ.गजानन सानप यांची निवड

*
नांदेड : दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी अहिल्यानगर येथील गंगा लॉन्स वर वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड येथील सुप्रसिद्ध कवयित्री तथा समीक्षक प्रा.डॉ.सौ.संगीता गणपतराव घुगे तर उदघाटकपदी छत्रपतीसंभाजीनगर येथील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ.गजाननराव सानप यांची निवड झाली असून निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी आज रोजी या निवडीची घोषणा एका पत्रांन्वये केलीय.
डॉ.संगीता घुगे यांनी यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे १९९८ पासून अध्यापनाचे कार्य केले असून सध्या त्या शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर जि. नांदेड येथे कार्यरत आहेत.समीक्षा आणि संशोधनात त्यांचे कार्य अधोरेखित व्हावे या उंचीचे आहे. शिवाय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव विविध संस्था संघटनांनी वेळोवेळी केलाय. नव्वदोत्त्तर कवयित्री म्हणूनही त्या ख्यातकीर्त आहेत. तर उदघाटक डॉ.गजानन सानप हे सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील दहा वर्षांपासून पदवीधर गटातून सिनेट सदस्य म्हणून त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान त्यांनी दिलेय. शिवाय विद्यापीठ विकास मंच महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणूनही त्यांचे कार्य स्पृहणीय आहे. शिवाय विद्यापीठात स्वायत्त संस्था गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन संस्थेचे ते संस्थापक आहेत.
सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची आजवरची वाटचाल अभिनंदनीय असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अठरापेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आस्था या सामाजिक संस्थेचे व स्वामी समर्थ अनाथ आश्रमाचे संस्थापक संचालक असून विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.
संमेलनाध्यक्ष व उदघाटकांच्या निवडीचे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत प्रबोधनकार श्री.गणेशजी खाडे यांचेसह नाशिक येथे संपन्न झालेल्या वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे यांनी अभिनंदन केले. स्वागताध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राजकुमार अघाव, सह-स्वागताध्यक्ष रेणुका वराडे, सह-स्वागताध्यक्ष घनश्याम बोडके, मल्हारी खेडकर हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.