ताज्या घडामोडी

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा*

नांदेड प्रतिनिधी:

अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला 26 जुलै 1999 मधील कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना एन.सी.सी. विभागाच्या विद्यार्थ्यांनी कारगील युद्धावर आधारित पोस्टर सादर करून वीर जवानांना एक अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. कारगिल युद्धातील वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण भारतात आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे साजरा केला जातो, जिथे भारताचे पंतप्रधान दरवर्षी इंडिया गेटवर अमर जवान ज्योती येथे सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. भारतीय सशस्त्र दलांच्या योगदानाच्या स्मरणार्थ देशभरात कार्यक्रमही आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात ५२ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. नांदेड चे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव यांच्या आदेशावरून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. दत्ता बडुरे व इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. संदीप काळे यांची उपस्थिति होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. दत्ता बडूरे यांनी कारगिल युद्धात आपल्या सैनिकांनी प्राणाची बाजी लावून भारत मातेचे रक्षण केले ही बाब संबंध भारतीयांसाठी गौरवाची व प्रेरणादायी आहे असे नमूद केले. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थ्यांनी भावी जीवनात राष्ट्रहिताचे कार्य करावे असे नमूद केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधीर शिवणीकर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देत प्रत्यक्ष युद्ध भूमीला भेट देण्याची संधी मिळाली आणि जीवन धन्य झाले असे सांगून अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मान्यवरांच्या हस्ते नवीन भरती झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी प्रा. डॉ. पंकज यादव यांच्या सह महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व राष्ट्रीय छात्र सेनेचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन संख्याशास्त्र विभाग प्रमुख तथा एन.सी.सी. विभागाचे अधिकारी लेफ्टनंट प्रा. डॉ. किशोर इंगळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संदीप काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.सी.सी. छात्र पंकज झाडे, नारायण खंदारे, कांगुलकर, रंजना यादव, स्वाती मोरे आदींनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.