ताज्या घडामोडी

गुणवत्तेचे कॅटेलिस्ट : डॉ नंदकिशोर करडे

नांदेड: प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र संकुलाचे विभागप्रमुख आदरणीय डॉ नंदकिशोर करडे सर यांना नुकताच शिक्षक दिनानिमित्त दि 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल सरांच्या कार्य कर्तत्वबद्दल माहिती देणारा हा लेख……

एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे उदाहरण म्हणजे आदरणीय डॉ नंदकिशोर करडे सर. कोणाबद्दल कधीही द्वेष नाही, कुणालाही कमी लेखायच नाही, सतत काम करत राहायचं, विद्यार्थ्याना शिकवायला मिळणं हा दैवी आशीर्वाद मानायचा, कधीही मोठेपणाची किंवा स्तुतीची अपेक्षा नाही,फक्त सर्वांबद्दल पॉझिटिव्ह विचार करणे व सर्वांना ज्ञान देत चालत राहणे हा सरांचा स्थायीभाव. माझी व करडे सरांची ओळख 25 वर्षा पूर्वी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झाली.सर नुकतेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते.

सरांनी अमरावती विद्यापीठातून बी एस सी रसायनशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळवलेले होते.त्या काळात सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विदयार्थी, प्राध्यापकांची संख्या मोजकीच होती.करडे सर मात्र सेट ,नेट व गेट या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेले होते. अभ्यासाची प्रचंड आवड व काहीतरी नवीन करायचा ध्यास या प्रेरणेतून सर कार्य करत होते.मी सरांच्या स्वभावामुळे व त्यांच्या प्रेमळ वागण्यामुळे त्यांच्याकडे आकर्षिला गेलो.त्या काळात सरांनी आम्हाला सेट,नेट परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले तसेच संशोधन प्रकल्प लिहिण्याकरता सुद्धा अतिशय महत्त्वाच असे मार्गदर्शन केले.त्यानंतर माझे व सरांचे मैत्रीमध्ये रूपांतर झाले.अनेक अडचणी असूनही त्याचा बाऊ न करता त्यातून मार्ग शोधत सर संशोधनाचे कार्य करत राहिले. याच काळात सरांना विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार त्याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडून संशोधन प्रकल्प मिळाले. सरांची संशोधनात असलेली आवड व सातत्य यामुळे सरांचे त्या काळात टेट्राहायड्रॉन लेटर्स, सिंथेटिक कम्युनिकेशन,लेटर्स इन ऑरगॅनिक केमिस्ट्री, अर्किवॉक, जर्नल ऑफ केमिकल रिसर्च यासारख्या उच्च श्रेणीच्या संशोधन पत्रिका मधून संशोधन कार्य प्रसिद्ध झाले. या काळात सरांना बराच त्रासही झाला परंतु सरांनी त्याकडे लक्ष दिले नाही व सतत आपले कार्य चालूच ठेवले.सरांच संशोधन क्षेत्रातील कार्य सातत्याने बहरत राहिले.1998 पासुन 2009 पर्यंत सरांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आपले कार्य केले.या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.

अनेक माणसं जोडली.सरांच्या शिकवणीमुळे विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनले. विद्यार्थ्यांमध्ये सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला.त्यानंतर सर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात प्राध्यापक पदी रुजू झाले.येथून सरांच्या कार्य कर्तत्वाला एक नवी झळाळी मिळाली.करडे सरांनी जास्त उर्जेने व मेहनतीने आपले संशोधन कार्य सुरू ठेवले .यानंतर सरांना अनेक संशोधन प्रकल्प मिळाले.

आत्तापर्यंत सरांनी आठ संशोधन प्रकल्प पुर्ण केले असून अतिउच्च श्रेणीच्या संशोधन पत्रिकेतून 50 च्या वर आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमधून आपले शोध कार्य प्रसिद्ध केले. सरांच्या मार्गदर्शनामुळे शेकडो विद्यार्थी सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण झाले.बारा विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पती (पी.एचडी)ही अतिउच्च पदवी प्राप्त केली.आजही पाच विदयार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे कार्य करत आहेत.हे करत असताना सरांनी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या प्राधिकरणावर आपला वेगळा ठसा उमटवला.विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिट्यांवर अध्यक्ष,सदस्य आशा पदांवर यशस्वीरीत्या कार्य केले. हे काम करताना सरांनी कुणाचेही मन दुखावले नाही. याचीच फलश्रुती म्हणून सरांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख पदी नियुक्ती झाली. या काळात सरांनी रसायनशास्त्र विभागाच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले.

करडे सर हे फक्त महाराष्ट्रच नाही तर मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांच्या सेट,नेट परीक्षेच्या परीक्षक पदी पदी कार्यरत आहेत.सरांनी महाराष्ट्र नव्हे तर भारतातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तसेच वेगवेगळ्या महाविद्यालय व विद्यापीठात आपले संशोधन कार्य प्रस्तुत केले. रसायनशास्त्र विषयातील जर्नल ऑफ ऑरगॅनिक केमिस्ट्री, सिनलेट, सिंथेसिस अँड युरोपियन जर्नल ऑफ ऑरगॅनिक केमिस्ट्री, टेट्राहायड्रॉन लेटर्स, सिनलेट, बायो ऑरगॅनिक अँड मेडिसिनल केमिस्ट्री रिसर्च आदी सारख्या अनेक संशोधन पत्रिकेचे समीक्षक म्हणून सुद्गा कार्य केले. भारत सरकारच्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी असलेल्या एनपीटीएलच्या परीक्षेमध्ये सुद्धा सरांनी रोप्य पदक व सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे.सर आजही अतिशय आत्मीयतेने मुलांसाठी ज्ञानदानाचे पवित्र असे कार्य सातत्याने करत आहेत.

आपल्या विद्यार्थ्यांबद्दल अतिशय प्रेम, विश्र्वास,आत्मीयता व तो यशस्वी झाल्यावर त्यांना होणारा आनंद मी सरांच्या डोळ्यात खूप वेळेला पाहिलेला आहे.मुलांनी मेहनत केली पाहिजे यासाठी सर स्वतःलाही त्रास करून घेतात. सरांनी कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही किंवा त्यामागे धावले नाहीत,फक्त आणि फक्त त्यांच्या मेहनतीमुळे व सातत्यामुळे सरांना सर्व गोष्टी आपोआप मिळत गेल्या. महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या प्रशासकीय सेवेतील महत्वाच्या परीक्षांचे परीक्षक पदापर्यंत सरांनी काम केले आहे.कुठलाही अहंभाव न बाळगता अतिशय साधेपणाने व सहजतेने त्यांनी हे कार्य केले आहे.हे कार्य करताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही,माझा तुझा ,या जातीचा त्या जातीचा असा कधीही भेदभाव केलेला नाही किंवा या गोष्टीचा कधी उच्चारही सुद्धा काढलेला नाही. याचीच फलश्रुती म्हणून की काय सरांना आज विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. खरंतर सरांना हा पुरस्कार खूप वर्षांपूर्वी मिळायला हवा होता. माझ्या मते हा त्या पुरस्काराचाच सन्मान आहे.

वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा सर खूप सुखी व समाधानी आहेत.आपल्या आई-वडिलांबद्दल व भावांबद्दल सरांना खूप प्रेम व अभिमान आहे. असं म्हटलं जातं की,माणसाच यशस्वी आयुष्य म्हणजे निरोगी शरीर स्वास्थ्य व चांगली संतती.

सरांच्या पत्नी सौ वैशाली करडे मॅडम ह्या बी एस एन एल मध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत होत्या.नुकतीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.त्या सुद्धा एक उत्कृष्ट लेखिका व वक्त्या आहेत.सरांना त्यांचा प्रचंड अभिमान आहे. माझी पत्नी माझ्यापेक्षा अतिशय हुशार असून ती ऑलराऊंडर आहे हे सर अतिशय सहजतेने व अभिमानाने सांगतात.यासाठी मनाचा खूप मोठेपणा लागतो. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे सरांचा मुलगा चि. मल्हार हा आय आय टी गांधीनगर सारख्या अतिउच्च शिक्षण संस्थेत ज्ञान घेत आहे.मल्हार ने हे दैदीप्यमान यश मिळवून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून आपल्या आई वडिलांच्या मान व सन्मान वाढवलेला आहे.माझे व सरांचे नाते विद्यार्थी ते मित्रापर्यंत निर्माण झालेले आहे.त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो.अगदी सरांच्या लग्नापासून ते आजपर्यंतच्या आयुष्याचा बऱ्याच अंशी साक्षीदार आहे.माझ्यासारख्या कित्येकांना करडे सरांचा अभिमान आहे.या पुढेहि करडे सर उत्तरोत्तर आपले आयुष्य यशस्वी होत जाओ व सरांची महाराष्ट्रातील एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती होवो हि सदिच्छा आणि सरांना निरोगी , आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच त्या जगतविधात्या पांडूरंग चरणी प्रार्थना….!

प्रा डॉ विजय नागोराव भोसले, भ्रमणध्वनी:9403067252
रसायनशास्त्र विभाग,
यशवंत महाविद्यालय नांदेड.👏👍🙏💐

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.