ताज्या घडामोडी

कराटेचा बादशाह ते आदर्श ध्यानसाधक : एम. रवीकुमार

माझ्या माहितीप्रमाणे 1980 चे ते दशक. 1984 च्या सुमाराला शिक्षणासाठी नांदेडला माझे येणे झाले. यशवंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. आताचे सामाजिक कार्यकर्ते साप्ताहिक प्रत्यंतर चे संपादक दीपक कसबे हे माझे वर्गमित्र. सुरुवातीला त्यांच्याच घरी मी राहायला होतो. साहजिकच आम्ही रात्रंदिवस सोबत असायचे. दीपक कसबे यांना व्यायाम आणि कराटेचा छंद. तेव्हा एम रविकुमार सर नांदेडच्या स्टेडियम परिसरामध्ये कराटेचे क्लासेस चालवायचे. दीपक कसबे यांनी कधी त्या क्लासला प्रवेश घेतला हे माहिती नाही. परंतु अधून मधून त्याच्यासोबत त्यांच्या क्लास कडे जाणे व्हायचे. तेव्हा सरांच्या क्लासचा खूपच बोलबाला होता. सरांच्या क्लास जवळून फिरकायची कोणाची हिंमत व्हायची नाही. सर क्लासमध्ये येण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचा कराटेचा वारमाप सुरू व्हायचा. रवी कुमार सर आकर्षक अशा एजडी गाडीवर यायचे. त्यांची क्लासला येण्याची एंट्रीच विद्यार्थ्यांच्या त्याचबरोबर पाहणाऱ्यांच्या काळजात धडकी भरवायची. सरांची भारी उंची, रंग काळा, डोळ्यांना लावलेला
काळ्याकुट्ट काचेचा चष्मा… अंगावर कराटेचा पोशाख पांढरा शुभ्र. असे हे व्यक्तिमत्व नांदेड शहरातील सर्वांचेच आकर्षण होते. ‘हे रवी कुमार सर आहेत’असे अनेक जण रस्त्यावरून चालताना आपल्या सोबतच्याना सरांकडे बोट करत दाखवत असत. त्या काळात मी सरांना दुरूनच ओळखत असलो तरी त्यांची प्रत्यक्ष कधी भेट देण्याचा योग आला नाही. ते आपल्या विद्यार्थ्यांना पोटात फाईट मारतात असे ऐकून असल्यामुळे त्यांच्याविषयी तशी एक भीतीच मनामध्ये असायची. नंतरच्या काळात आमचे वरिष्ठ स्नेही के. एच. वने यांनी एक कराटे संस्था स्थापन केली. ‘पूज्य भदंत चंद्रमणी’असे त्या संस्थेचे नाव होते. आजही ती संस्था अस्तित्वात आहेच. साधारणपणे 90 च्या सुमाराला के. एच. वने सरांनी चैतन्यनगर परिसरात कराटेचे क्लासेस काढले. ते त्या संस्थेचे अध्यक्ष आणि कराटे जमत नसताना सुद्धा मला त्या संस्थेचे सचिवपद देण्यात आले. आम्ही दररोज वने सरांच्या क्लासला उपस्थित राहायचो. वने सरांच्या मार्गदर्शनात आजचे पत्रकार श्याम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मनोज कुमार वाघमारे असे चार दोन मुले अतिशय चुणूकदार होते. वने सर त्यांच्या फाईट लावत असत. जबरदस्त कराटेच्या फाईट आणि कौशल्यामुळे श्याम कांबळे आणि मनोज कुमार वाघमारे यांचे आम्ही कौतुक करायचो. अनेक स्पर्धांमध्ये रवी कुमार सर आणि वने सरांच्या विद्यार्थ्यांच्या फाईट व्हायच्या. तो दौरच काही और होता. नंतरच्या काळात मी पत्रकारीतेकडे वळलो. काही वर्षानंतर रवी कुमार सर आणि माझी ओळख झाली. काही वर्ष कराटे क्षेत्रामध्ये सर पुन्हा सक्रिय होते. पुढे अचानक सरांनी आपल्या आयुष्याचा मार्गच वेगळा केला. सर विपश्यना ध्यानधारणा याकडे वळले. त्या क्षेत्रात इतके पुढे गेले की त्यांनी आपल्या कराटे प्रशिक्षण व्यवसायाचा जणू काही काडीमोड केला. सर स्वतः म्हणून महिन्याच्या विपस्सना वर्गाला बसायचे. ध्यान मार्गात त्यांनी खूप अंतर पार केले आहे हे त्यांच्याशी संवादामधून लक्षात यायचे. सरांसोबत अनेक वेळा त्या संदर्भात तासंतास माझे बोलणे व्हायचे. कधी कधी तर आठवण झाल्यास मला सुद्धा सर फोन करत. मला आठवण झाल्यानंतर कधी फोन केला तर सर शिबिरावरून नुकताच आलोय परत जायचे आहे, असा त्यांचा जो निश्चित कार्यक्रम आहे, ते सांगायचे. सरांशी जवळून गप्पा होत असल्याने त्यांच्याविषयीची अनामिक भीती मनातून दूर गेलेली होतीच. मी हसत हसतच सरांना अनेक वेळा ‘वंदामी’ म्हणायचो. मागच्या चार दोन वर्षात सरांचा फोन नव्हता. मलाही करणे झाले नाही. आणि आज या समाज माध्यमावर सरांचे निर्वाण झाल्याचे वृत्त धडकले. समाजमनावर छाप टाकणारा, आपल्या आयुष्याला प्रज्ञा, शील, करूणेच्या महाकारूणीक मार्गावर वळवणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत याची प्रकर्षाने अंतरिक जाणीव होत आहे. त्यांच्या चिरंतन आठवणी आणि उदात्त जीवन कार्याला विनम्र अभिवादन! डॉ.विकास कदम प्राचार्य गुर गोविंदसिंग पत्रकारिता महाविद्यालय नांदेड

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.