https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

विश्वाला युद्ध नको; तथागत बुद्ध हवे

विसाव्या शतकास समाजशास्त्रज्ञांनी तणावाचे शतक म्हणून संबोधले. २१व्या शतकास एकटेपणाचे शतक म्हणून निर्देशीत केल्या जात आहे. आधुनिक युगातील माणूस हा एकटा पडत चालला आहे. जगभरातील लोकांशी विज्ञान तंत्रज्ञानाच्या उपकरणांनी क्षणार्थात संपर्क साधणारा हा माणूस शेजारील व्यक्तीची, बाजूला बसलेल्या माणसाची ओळख विसरला. या एकटेपणातून, गळाकापू स्पर्धेतून व चुकीच्या जीवन मार्गामुळे आधुनिक काळात सर्वात महत्वाची समस्या मनावरील ताण-तणाव ही बनली आहे. ताण-तणावाचे व्यवस्थापन म्हणून एक शाखाही विकसित झाली आहे. मात्र ताण तणावाचे निर्मूलन होऊच शकत नाही, या निर्णयाप्रत आजचा माणूस जवळपास आलेला आहे. हे होण्याचे मुख्य कारण म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ तथागत बुध्दाच्या तत्वज्ञानाचा त्याला विसर पडत आहे. किंबहुना या तत्वज्ञानाला त्याने केवळ उच्चारापुरतेच सिमीत केलेले आहे.
तथागत बुद्ध हे काही केवळ मानसशास्त्रज्ञ नाहीत तर त्यांना समाजशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, अर्थतज्ञ, तत्वज्ञ अशा असंख्य विशेषांनी गौरवित करता येईल. मात्र प्रस्तुत लेखात केवळ मानसशास्त्राखाशी संबंधित तथागत बुध्दाच्या गाथांचा उहापोह करण्यात आला आहे.
तथागत बुध्दाच्या विचारांचा, वर्तनाचा मूळ गाभा ‘मानवी मन हे सर्व क्रियांचे मूळ आहे’ हा आहे. आधुनिक काळात या तत्वाचा स्वीकार सर्वच विज्ञाननिष्ठ, बुध्दीनिष्ठ, तर्कनिष्ठ विचारवंतांनी केलेला आहे, पंडित नेहरूंचा विचारही युद्ध अगोदर मनात घडत असते, नंतर ते जमिनीवर मूर्त रूप घेत असते. या तत्वज्ञानाची पुष्टी करणारा आहे. आजच्या काळात आपण वापरत असलेल्या अनेक म्हणीही, मन चंगा तो कठौती में गंगा, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, शरीर सुदृढ; तर मन सुदृढ याच तत्वज्ञानाच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या आहेत. मात्र या म्हणीपेक्षाही अत्यंत सुक्ष्म स्तरावर तथागतांनी विचार केलेला आहे.
तथागत बुध्दाने व्यक्त केलेले पुढील धम्मपद मानवी मन व जीवनाचा संपूर्ण सार व यथार्थता पटवून देते. जो दोषयुक्त मनाने बोलतो व कर्म करतो, दुःख त्याचे अनुसरण असे करते ज्याप्रमाणे बैलाच्या पाठीमागे गाडीची चाके फिरत असतात. जो सुखयुक्त मनाने बोलतो व कर्म करतो, सुख त्याचे अनुसरण असे करते; ज्याप्रमाणे माणसाच्या बरोबर त्याची सावली भ्रमण करत असते.
तथागताच्या या धम्मपदामध्ये माणसास सुख व दुःख कशाने प्राप्त होईल, याचे शास्त्रीय विवेचन केलेले आहे. तथागत सुख व दुःखाची जबाबदारी इतर कोणत्याही घटकांना न टाकता व्यक्तीवर, त्याच्या मनावर व व्यवहारावर ती जबाबदारी टाकतात. म्हणूनच तथागत बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आधारच, स्वतःच स्वतःचा प्रकाश हो (अतः दिप भव) हा आहे.
हे जर लक्षात ठेवले तर खूपच मनःस्ताप कमी होऊ शकतो. तथागत बुध्दाचे पुढील धम्मपद अशांतता, निराशा, असूया, शत्रुत्व, शोषण यांच्या मुळाशी मानवी मन कसे आहे, ते विश्लेषित करते, वैराने वैर कधी शांत होत नाही, अवैरानेच वैर शांत होते, हाच विश्वाचा चिरंतर नियम आहे.
तथागत बुध्दाने आपल्या विचारांतून मानवी मन सुसंस्कारीत करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. बुध्द तत्वज्ञानाची उभारणी त्रिशरण, चार आर्यसत्य, पंचशील, आर्यअष्टांगिक मार्ग यावर आधारित आहे. त्याचा संबंध पूर्णपणे मानवी मनाशी आहे. त्रिशरणात बुद्धाला, धम्माला व संघाला शरण गेले पाहिजे, हा संदेश आहे. चार आर्यसत्य पुढील प्रमाणे सांगता येतील (१) जीवनात दुःख आहे (२) त्या दुःखाची कारणे आहेत (३) ते दुःख दूर होऊ शकते (४) दुःख दूर होण्याचा मार्ग अष्टांगिक मार्ग आहे. हा अष्टांगिक मार्ग मानवी मन, बुध्दी, विचार, शरीर या सर्वांचा विचार करून तथागतांनी दिलेला आहे. (१) सम्यक दृष्टी (२) सम्यक संकल्प (३) सम्यक वचन (४) सम्यक कर्मांत (५) सम्यक आजिव (६) सम्यक व्यायाम (७) सम्यक स्मृती (८) सम्यक समाधी
पंचशिलाचे वर्णन पुढील प्रमाणे करता येईल, जीव हिंसेपासून, चोरी करण्यापासून, कामवासनेच्या अनाचारापासून, खोटे बोलण्यापासून तसेच मद्य आणि इतर सर्व मादक वस्तुंच्या सेवनांपासून अलिप्त राहण्याचा मार्ग म्हणजेच पंचशिलाचे आचरण होय. ज्याचा मानवी मनावर पूर्णपणे प्रभाव पडत असतो आणि मानवी वर्तन त्या आधारेच घडत असते. पेराल तेच उगवेल, हा विचार तथागत बुध्दाने दिला. ज्याचा संबंध पंचशिलाशी आहे.
तथागत बुध्दाच्या महापरिनिर्वाणाला २५०० वर्षापेक्षा जास्त काळ झालेला असल्यामुळे बुध्द तत्वज्ञानामध्ये बऱ्याच काल्पनिक, अवैज्ञानिक बाबींचा शिरकाव झालेला आहे. यासंदर्भात बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द वचनाच्या संदर्भात दिलेल्या कसोटया अत्यंत महत्वपूर्ण आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, केवळ त्याच बुध्द तत्वज्ञानाचा स्वीकार करावा (१) जे बुद्धीनिष्ठ, तर्कनिष्ठ व सुसंगत असेल, आणि (२) जे मनुष्याच्या कल्याणाला पोषक असेल.
तथागत बुध्द मानवी जीवनातील सर्व समस्यांचे मूळ मानवी मनाला मानतात, याचा दाखला डॉ. भदंत आनंद कौसल्यायनचे मत देवून करता येईल. ते म्हणतात, कार्ल मार्क्स लाभाच्या मूळावर घाव घालू पाहतो. तथागत बुध्द मार्क्सपेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन लोभाच्या मुळावर घाव घालू पाहतात. मार्क्स लाभाच्या विरुद्ध आहे. तथागत बुध्द लाभाच्या मूळात जो लोभ आहे त्या लोभाच्याच विरुध्द आहेत. लोभ हा मानवी मनाचा फार मोठा विकार असून त्यामुळे तथागताच्या भाषेत दुःख आणि मार्क्सच्या भाषेत पिळवणूक निर्माण होत असते.
जगात कोण आपल्याला काय बोलेल, यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र त्या स्तुती-शापांचा स्वीकार करणे – न करणे हे पूर्णपणे आपल्याच हातात असते.
तथागत बुध्दाच्या विश्वव्यापी चिंतनाचा सार व केंद्र मानवी मन आहे. पुढील धम्मसार गाथा ते स्पष्ट करते, कोणतेही पाप कर्म न करणे, सदैव कुशल कार्य करणे, पुण्यकर्म करणे, स्वचित्ताची शुध्दी करणे, हेच बुद्धाचे शासन आहे.
-प्रा.डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभाग प्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.
भ्रमणध्वनी:८३२९२५६६३६

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704