https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कविता-‘ महाश्वेता’ या मालिकेतील ‘ भय इथले संपत नाही’ या कवितेचे रसग्रहण

लतादिदींनी गायलेल्या कवी ग्रेस यांच्या कवितेचे रसग्रहण

भय इथले संपत नाही
मज तुझीआठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते ..१

*रसग्रहण*
यात एका प्रतिभावंत कवीने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी साधलेला संवाद आहे.हृदयात भय फक्त मृत्यूचेच आहे असे नाही.जेथे जेथे तो जोडल्या गेलेला आहे, जिथून त्याला आनंद मिळतो त्या सर्वांपासून तुटण्याचं भय त्याला आहे.कवीला एकटेपणाची जाणीव होते आणि भय वाटायला लागते.कवी आपल्या सखीशी इतका एकरूप झाला आहे की संध्याकाळच्या कातरवेळी सैरभैर झालेल्या मनाला आधार मिळावा म्हणून ते तिने शिकवलेलं गाणं गात आहेत.आपल्या जोडीदाराची आठवण काढून कवी आभासात रममाण होतो.यात सखीशी असलेले अनुबंध आणि न संपणा-या भयाला हुलकावणी देण्याची किमया त्याने साधली आहे.

ते झरे चंद्रसजणांचे
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया ..२

*रसग्रहण*
जगाच्या व्यापामध्ये कितीही आधार शोधले तरी स्वत:लाच स्वत:च्या कर्तृत्वाने तोंड द्यावे लागते.झरे कधी आटतात, कधी मोठा पूर सुध्दा येतो.चंद्र कलेकलेने वाढत जातो तसाच कलेकलेने क्षीण सुध्दा होतो.कवीच्या सखीचा मृत्यू झालेला आहे,तिच्या दु:खात कवी
जिवंतपणी मेल्यातच जमा आहे.आता ही धरती म्हणजे मायाच जणू.आयुष्यात झाडांच्या सावलीत आपण बसतो,कधी झाडाखाली निजतो.आयुष्य संपल्यावर पुन्हा नव्याने जन्म घेणे हा सृष्टीचा नियम आहे.झरे आणि चंद्र कवीला आपल्या सखीची आठवण करून देतात.तू जशी राख होऊन झाडाच्या तळाशी विखुरलीस,तसाच मी पण लयास जाईन हेच जणू कवीने सुचवलंय.

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू
अंगी राघव शेला..३

*रसग्रहण*
जर आयुष्य वनवास असेल तर,तिचा तो मंद बोल राघवाच्या शेल्यासारखा आहे.प्रियकर प्रेयसीच्या जीवनातील आनंद म्हणजे एकमेकांसाठी उच्चारलेले काळजीचे शब्द.कवी म्हणतो की,माझ्या वाटेला आलेला एकटेपणाचा वनवास ह्या शेल्याला पांघरूण सुसह्य होईल कदाचित.

स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे..४

*रसग्रहण*
कवी म्हणतो,जरी मी तुझ्या आठवणीत समाधानी आहे,तरी माझे गात्र न् गात्र तुझ्यासाठी झुरते आहे.तुझ्या शीतल आठवणी सोबत असल्या तरी तुझी कमतरता सतत जाणवते आहे.अग्नीत भस्म होऊ पाहणारी इंद्रिये कसले दु:ख गात असतील? तू दिलेल्या अनंत आठवणींचे चांदणे कधीच संपणार नाही.

कवी ग्रेस यांची ही कविता ज्याला जितकी उलगडेल,तितकाच त्याला कवितेचा आनंद घेता येईल.प्रत्येक ओळीत भावनेची गुंफण आहे.ज्या कवितेच्या वाचणाने मेंदूच्या जाणीवा जाग्या होतात त्याचा अर्थ आपण आपणच लावायचा असतो.कुणाला ही कविता प्रेयसीसाठी लिहिलेली वाटते तर कुणाला ईश्वराच्या जवळ नेणारी वाटते.
**************************
लैलेशा भुरे
नागपुर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704