महाराष्ट्र

पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शासनाच्या विरोधात भव्य महाआक्रोश मोर्चा

पुणे,प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय असा भव्य महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण राज्यभरातून पाच हजार शिक्षकेतर कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. 

महामंडळाचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, राज्य अध्यक्ष अनिल माने, राज्य कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यातुन माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी या राज्यव्यापी महाआक्रोश मोर्चा मध्ये सामील झाले होते.

शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग येथे या मोर्चाचा समारोप झाला. याप्रसंगी  पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर शिक्षणसंस्था चालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, विविध शिक्षक संघटना,  महाराष्ट्र राज्य लिपिक हक्क परिषदेचे पदाधिकारी देखील या शिक्षकेतरांच्या महाआक्रोश मोर्चास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर व अध्यक्ष अनिल माने यांनी शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने शिक्षकेतरांच्या समस्या व त्या सोडवण्यासाठी महामंडळ करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. हा मोर्चा केवळ इशारा मोर्चा आहे, शासनाने त्याची दखल घेऊन शिक्षकेतरांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत अन्यथा येणाऱ्या काळात नाईलाजास्तव इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांवरती बहिष्कार घालावा लागेल. त्यानंतर कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने आम्हा शिक्षकेतरांना बेमुदत आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला.

शासनाच्या व शिक्षण आयुक्त यांच्या वतीने राज्याचे शिक्षण सहसंचालक हरुण अत्तार  व आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी याप्रसंगी शिक्षकेतर महामंडळाचे निवेदन स्वीकारले.

या संपूर्ण शिस्तबध्द मोर्चाचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विनोद गोरे, कार्याध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, देवेंद्र पारखे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले होते. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्न कोतुळकर यांनी संपूर्ण राज्यभरातून आलेल्या शिक्षकेतर बंधू – भगिनींचे, आलेल्या सर्व संघटना प्रतिनिधींचे आभार मानले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.