नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत आयोजित सेंटर झोन बॉक्सिंग व तायक्वांदो स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी विविध वजन गटांत सुवर्णपदकांची कमाई करत महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
सेंटर झोन बॉक्सिंग स्पर्धेत ओमकार मारतळे याने ५५ ते ६० किलो वजन गटात सुवर्णपदक, जय उचडे याने ६० ते ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक, तर देवा पुयड याने ६५ ते ७० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तसेच तायक्वांदो क्रीडा प्रकारात जय उचडे याने ६० ते ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून आपल्या उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे ओमकार मारतळे, जय उचडे आणि देवा पुयड या खेळाडूंची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेच्या कॅम्पसाठी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. शेखर घुंगरवार यांनी विजयी खेळाडूंचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करून महाविद्यालयाचे व विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी खेळाडूंना दिल्या. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालय सदैव सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.
क्रीडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, चिकाटी, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते. नियमित सरावामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक क्षमता वाढण्यासही मदत होते. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात विविध शैक्षणिक, रोजगार व क्रीडा क्षेत्रातील संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडेकडेही गांभीर्याने पाहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विष्णू राठोड, कार्यालयीन अधीक्षक रामराव राठोड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. साहेबराव मोरे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. डॉ. साहेबराव मोरे, प्रा. डॉ. राहुल सरोदे, प्रा. डॉ. महेश जाधव, प्रा. डॉ. शेख बुशरा मॅडम, प्रा. कपिल इंगोले आदी उपस्थित होते.
वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून विजयी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
