कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर
नांदेड प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विकासाला गती देणारे विविध महत्त्वपूर्ण प्रस्ताव चर्चेनंतर अधिसभेच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे विद्यापीठ परिसरात भव्य स्मारक उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्तावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक दि.१२ सप्टेंबर, २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी व्यासपीठावर कुलगुरु डॉ.मनोहर चासकर, प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. बी. एस. सुरवसे, डॉ. माधव गव्हाणे, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंढे, नरेंद्र चव्हाण, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांची प्रमुख उपस्थित होते. वंदे मातरम् गीताने बैठकीस प्रारंभ झाला.
बैठकीच्या प्रारंभी अधिसभेवर नव्याने नियुक्त झालेल्या सदस्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यामध्ये आमदार बाबुराव कदम कोळहळीकर, प्राचार्य डॉ. अवधूत शिंदे, प्राचार्य डॉ. बालाजी ढाकणे आणि नगरसेविका कोमाताई आळसे यांचा समावेश होता.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या प्रस्ताविकानंतर विद्यापीठाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. काही महात्ताच्या दुरुस्तीसह विद्यापीठाच्या सन २०२५-२६ च्या लेखा अंकेक्षनास मंजुरी देण्यात आली.
अधिसभा सदस्य डॉ. अशोक मोटे यांनी विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे विद्यापीठ परिसरात स्मारक उभारण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. या स्मारकामध्ये डॉ. वाघमारे यांचा पुतळा, संग्रहालय, वाचनालय तसेच त्यांच्या कार्याची माहिती देणारे विविध उपक्रम असावेत, अशी भूमिका मांडण्यात आली. या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना सर्वाधिकार देण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करून स्मारक उभारणीची कार्यवाही करण्यात यावी, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
अधिसभा सदस्य डॉ. अविनाश शिंदे यांनी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्य व प्राध्यापकांची भरती करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला. डॉ. विजय भोपाळे यांनी अधिसभेत मंजूर होणाऱ्या ठरावांची माहिती संबंधित घटकांना मिळावी तसेच आवश्यक मंजुरीनंतर अधिसभेचे इतिवृत्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला. दोन्ही प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
डॉ. महेश मगर यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र विश्रांती कक्षाची व्यवस्था करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला. तोही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. धनराज जोशी यांनी सर्व प्राधिकरणांची आवश्यक प्रक्रिया वेळेत सुरू करून १ सप्टेंबर, २०२७ पूर्वी गठित करण्याबाबत प्रस्ताव मांडला. या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.
डॉ. दीपक बचेवार यांनी सिंह सभागृहातील खुर्च्या लवकरात लवकर बदलण्यात याव्यात, असा प्रस्ताव मांडला. त्यास मंजुरी देण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षकांसाठी एआय, नवीन तंत्रज्ञान आणि बदलत्या अध्यापन पद्धतींबाबत विद्यापीठ स्तरावर नियमित प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे, असा प्रस्ताव डॉ. अशोक ट्रिपलसे यांनी मांडला. या प्रस्तावालाही अधिसभेने सर्वानुमते मंजुरी दिली.
याशिवाय डॉ. दीपक मोरताळे, डॉ. संजय वाघमारे, डॉ. अशोक गुजराती, डॉ. वर्षा डोडिया, ॲड. सिद्धेश्वर कासनाळे, डॉ. विनोद माने, मुरलीधर जायभाय, डॉ. महेश बेंबडे, शिवाजी चांदणे, डॉ. विष्णू पवार, रंगनाथ शेळके, डॉ. दिलीपकुमार बोईनवाड आणि डॉ. रामेश्वर पवार यांनी विद्यापीठाच्या विकासासंदर्भात विविध प्रस्ताव मांडले. या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून त्यापैकी काही प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
बैठकीच्या शेवटी विद्यापीठाच्या संगणकशास्त्र संकुलातील विद्यार्थ्यांनी संगणक ॲप्लिकेशनचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमाचे अधिसभा सदस्यांनी कौतुक केले. विविध विकासात्मक विषयांवर सकारात्मक आणि सखोल चर्चा झाल्याने अधिसभेची बैठक विद्यापीठाच्या आगामी विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. शेवटी राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.
——————-
