-
वैद्यकीय शिक्षणातील शुल्कवाढीविरोधात आंदोलनाचा निर्धार; पेपरफुटी, शासकीय वसतिगृहांचे ऑडिट व जिल्हा परिषद शाळांच्या प्रश्नांवर प्रस्ताव पारित
नांदेड :प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची प्रदेश कार्यकारिणी बैठक नांदेड येथे दिनांक १२ व १३ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीस खानदेश व मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमधून प्रदेश कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये राज्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हिताच्या व समाजातील विविध विषयांवर महत्त्वपूर्ण प्रस्ताव पारित करण्यात आले असून, आगामी काळात या विषयांवर आंदोलन व रचनात्मक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील विविध स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि परीक्षेच्या विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम होत आहे. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई, परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, प्रश्नपत्रिका निर्मितीपासून वितरणापर्यंत सुरक्षित यंत्रणा आणि दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करणारा प्रस्ताव बैठकीत पारित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकारांविरोधात अभाविप प्रभावीपणे आवाज उठवणार आहे.
सध्या अभाविपचे सदस्यता अभियान राज्यभर सुरू असून, आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अभाविपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. येत्या १० ऑक्टोबरपर्यंत १ लाख विद्यार्थ्यांना अभाविपशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने युवती संमेलनांच्या माध्यमातून विद्यार्थिनी व युवतींमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सामाजिक सहभाग आणि राष्ट्रनिर्माणाची भावना विकसित करण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षणातील वाढते शुल्क, विविध संस्थांमधील शुल्कातील मोठी तफावत आणि शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाविरोधात अभाविप आगामी काळात आंदोलन उभारणार असून शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून न राहता सर्वांना समान व गुणवत्तापूर्ण संधी उपलब्ध करून देणारे असावे, अशी अभाविपची भूमिका आहे.
यासोबतच शासकीय वसतिगृहांचे सर्वंकष ऑडिट करून तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, भोजन, निवास, स्वच्छता, सुरक्षा तसेच इतर मूलभूत सुविधांची वस्तुनिष्ठ तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधांची दुरवस्था, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी तसेच राज्यातील इतर महत्त्वपूर्ण शैक्षणिक प्रश्नांवरही अभाविप सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
अभाविप प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा करून न थांबता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, परवडणारे आणि पारदर्शक शिक्षण मिळावे यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष करत आलो आहोत. पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणून पेपरफुटीला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणातील वाढते शुल्क, शिक्षणाचे बाजारीकरण, शासकीय वसतिगृहांमधील सुविधांचा अभाव आणि जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था हे विषय विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असून या सर्व प्रश्नांवर अभाविप आगामी काळात आंदोलन उभे करेल. महिला सक्षमीकरणासाठी युवती संमेलनांच्या माध्यमातून विद्यार्थिनी व युवतींमध्ये नेतृत्व विकसित करण्याचे कामही अधिक व्यापक केले जाईल. १० ऑक्टोबरपर्यंत १ लाख विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडण्याच्या उद्दिष्टासह छात्रशक्तीला संघटित करून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि राष्ट्रनिर्माणासाठी अभाविप सातत्याने प्रयत्नशील असेल.”
