महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, संत परंपरा ही एक जगातील सर्वात मोठे ज्ञानाचे अधिष्ठान असलेली भक्ती प्रधान परंपरा आहे. या संप्रदायात सर्व जाती धर्माचे लोक संतांच्या भक्ती, प्रेम व तत्त्वज्ञानामुळे भजन करताना, गाताना , नाचताना एकत्र असतात, जेवताना पंगतीत सोबत बसतात, सोबत झोपतात. हातामध्ये टाळ, मृदुंग व खांद्यावर भगवी पताका घेऊन आनंदाने वारी केली जाते.इथे कोणीही लहान नाही किंवा मोठा नाही.ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य,शूद्र असा भेदभाव नाही. इथे आलेला प्रत्येक जण हा पंढरीच्या सावळ्या परब्रम्ह श्री पांडुरंगाचा निस्सिम भक्त. पांडुरंगाचे अखंड नाम कीर्तन,चिंतन व दर्शन हा प्रत्येकाच्या मनातील ध्यास. जगातील ही एकमेकाद्वितीय परंपरा आहे. माऊली या आत्मिक हाकेने एकमेकांना बोलून एकमेकांच्या पाया पडून दर्शन घेणारा हा सोहळा दैवदुर्लभ असा आहे.या थोर परंपरेचा पाया संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी रचला आहे तर या वारकऱ्यांच्या मांदियाळीत कळस होण्याचा मान जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना मिळालेला आहे . जवळ जवळ 400 वर्षापासून हा कळस स्वयंभू अशा ज्ञान, भक्ती तेजाने गाथा रूपाने तळपत आहे. वारकरी संप्रदायात तुकाराम महाराज यांचे कार्य अतुलनीय असे आहे. भक्ती,प्रेम व ज्ञानाची ही गंगा ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज इत्यादींपासून वाहत येऊन तुकोबारायांच्या काळात हि गंगा समुद्र बनली.
तुकाराम महाराज यांचे जीवन हे वारकरी संप्रदायातील भक्ती, ज्ञान व वैराग्य याचा त्रिवेणी संगम होय.तुकोबांच्या भक्ती मध्ये लहान बालकाप्रमाणे निरागसता दिसते.
” *जेथे जातो तेथे तू माझा सांगाती l चालविसी हाथी धरूनिया ll”*
या अभंगांमध्ये त्याची प्रचिती येते.जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग हे प्रत्येक मनुष्याला आपल्या आयुष्यातील घटनाच आहेत, अनुभव आहेत असे वाटतात. त्यामुळे त्यांची वाणी त्यांचे शब्द सर्वांना आपलेसे करतात. तुकाराम महाराजांचे कार्य हे स्वयंप्रेरित व अमोल असे आहे.माणसाच्या जीवनातील आलेल्या वेगवेगळ्या अनुभवाच्या जोरावरच तुकाराम महाराजांचे अभंग निर्माण झालेले आहेत. अभंग म्हटलं की तो फक्त तुकोबा महाराजांचा. अभंग म्हणजे कधींही न भंगणारे. तुकाराम महाराजांचे अभंगा एवढी लोकप्रियता इतर कोणाच्याही अभंगांना मिळालेली नाही. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे त्यांची भाव कविता होय. अंधश्रद्धेवर तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून अतिशय परखड असे ताशेरे ओढलेले आहेत.
‘ *नवसे कन्या पुत्र होती,तरी का करणे लागे पती’*
असं ते लिहितात. समाजातील वाईट परंपरा,अनिष्ट रूढी, अपप्रवृत्ती याचा तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून खरपूस समाचार घेतलेला आहे.तुकाराम महाराजांनी कधीही कुणाचीही निंदा केलेली नाही व कुणाची निंदा ऐकलेली सुद्धा नाही.
‘ *कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे l* प्रपंच व परमार्थ याची उत्तम सांगड तुकाराम महाराजांनी घातलेली आहे. तुकाराम महाराजांची ‘ गाथा ‘हा पंचम वेद होय.पहिली चार वेद वाचण्याचा अधिकार सर्वसामान्य लोकांना नव्हता. परंतु, तुकाराम महाराजांच्या या गाथारुपी पाचव्या वेदाचा अधिकार सर्वांना आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तन प्रवचनात शुष्क वेदांत नव्हता तर भक्ती आणि प्रेमाची उधळण होती. ज्ञान,भक्ती, वैराग्य याच बरोबर परोपकारवर्ती तुकाराम महाराजांच्या आचरणातून दिसते. परमार्थातील अतिशय गुह्य असे ज्ञान महाराजांच्या अभंगातून दिसते.
तुकाराम महाराजांच्या जीवनात ज्ञान व भक्तीचा अलौकिक असा संगम दिसून येतो. प्रपंच व परमार्थ याचा उत्तम समन्वय तुकाराम महाराजांनी घातलेला दिसतो. संसार करून परमार्थ करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचे स्पष्ट होते. ते अतिशय निर्भीड कवी होते. परमेश्वर सर्वत्र आहे तो जनसामान्यामध्ये आहे, तो आपल्या कर्मामध्ये आहे असं त्यांचं मत होतं.तुकाराम महाराजांना वर्ण व्यवस्था मान्य नव्हती.
फक्त आणि फक्त विठ्ठलभक्ती. तीहि केवळ अंत:करणात व वाणीतच नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक कृतीतूनही दिसत असे. हेच संत तुकाराम महाराजांचे जीवन होते.
‘ *पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’*
या वचनावरून पंढरपूरचे व त्या सावळ्या परब्रह्म पांडुरंगाचे त्यांच्या जीवनातील स्थान लक्षात येते. पांडुरंग हेच त्यांचे आराध्य दैवत होते. पंढरपूरच्या पांडुरंगाचे सुंदर रूपाचे वर्णन केलेले व भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मुखातून गायलेले
‘ *सुंदरते ध्यान उभे विटेवरी l कर कटावरी ठेवोनीया ll तुळसी हार गळा कासे पितांबर l आवडे निरंतर तेची रूप ll मकर कुंडले तळपती श्रवणी l कंठी कौस्तुभमणी विराजित ll तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख l पाहीन श्रीमुख आवडीने ll*
हा अभंग ऐकताना मन आणि आत्मा त्या विश्वात्मकाच्या रूपामध्ये तल्लीन होऊन जातो. ते सावळे रूप आपल्या डोळ्यासमोर साक्षात विटेवर उभे दिसते.विशेष म्हणजे या अभंगामध्ये कुठेही श्री पांडुरंगाचे नाव उच्चारलेले नाही. हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा महिमा आहे. तुकाराम महाराजांच्या मते जिवंतपणी आई वडिलांना सांभाळने महत्त्वाचे आहे. मृत्यूनंतर कोणतेही जीवन नाही. लोक व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करतात, तेरवी करतात, केस कापतात, नैवेद्य दाखवितात आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची वाट पाहतात, हा मूर्खपणा आहे. आपले मृत वाडवडील काय कावळे होते काय.
*भुके नाही अन्न। मेल्यावरी पिंडदान।। हे तो चाळवाचाळवी। केले आपणची जेवी।।*
तुकाराम महाराज गर्भश्रीमंत होते. त्यांच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता. त्याप्रसंगी त्यांनी संपूर्ण धान्याचे भांडार मोकळे केले व गोरगरिबांना धनधान्याचे मोफत वाटप केले.गोरगरिबांना मदत करणे, हाच खरा धर्म आहे असे ते म्हणत.
*जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ll तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा ll*
भेदाभेद,अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता याविरुद्ध त्यांनी अभंगातून आवाज उठविला .तुकाराम महाराजांच्या मते कोणत्याही विषयाचे मर्यादित सेवन करणे याला ते वैराग्य मानत व कोणत्याही विषयाची मर्यादा उल्लंघन करणे याला ते भोग मानत .ज्ञान,भक्ती, वैराग्य याचं बरोबर होती हे तुकाराम महाराजांच्या ठाई ठाई होते. तुकाराम महाराजांचे कीर्तन तुकाराम महाराजांचे प्रवचन म्हणजे शुष्क वेदांत किंवा निव्वळ तत्वज्ञान नव्हते तर ती भक्ती प्रेमाची उधळण होती. रूढी परंपरे विरुद्ध बंड हे आजच्या काळातही बऱ्याच वेळेला अवघड वाटते ते काम तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी प्रत्यक्ष जीवनामध्ये आणले आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील जडणघडणीमध्ये तुकाराम महाराजांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात तुकाराम महाराजांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तुकाराम महाराजांचा गाथेचा अभ्यास फक्त वारकरी किंवा ईश्वर भक्तच नाही तर अनेक प्राध्यापक साहित्यिक अभ्यासक विचारवंत त्याचबरोबर सामान्य लोकही करतात त्यांच्या अभंगावरील एका एका ओळीवर लोक पीएचडी करताना दिसतात त्यांच्या अभंगांची लोकप्रियता वरचेवर वाढतच झालेली दिसते .
संत तुकाराम महाराजांनी पाच हजार पेक्षा जास्त अभंग लिहिले. त्यांची भाषा अतिशय साधी ,सोपी व सर्वांना समजणारी समजणारी अशी भावपूर्ण होती. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि ढोंगीपणा यांचा कडाडून विरोध केला.संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे संत मानले जातात.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू येथे 1608 साली मोरे घराण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांच्या घरामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा असल्यामुळे त्यांना भक्ती आणि अध्यात्माची आवड होती. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आणि अडचणी सुद्धा आल्या.तरीही त्यांनी कधीही देवावरील श्रद्धा सोडली नाही.वैयक्तिक आयुष्यात तुकाराम महाराजांना अनेक दुःख सहन करावी लागली. वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांची आई वडील वारले.त्यांचा मोठा भाऊ विरक्ती मुळे संसार सोडून निघून गेला. त्याच काळात दुष्काळाचा त्यांना भयंकर सामना करावा लागला. अशाही परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची परम भक्ती कधीही कमी होऊ दिली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यातील प्रत्यक्ष ईश्वर भक्तीने व नाम कीर्तन संकीर्तन आणि घालविला. वयाच्या 42 व्या वर्षी फाल्गुन वद्य द्वितीया 1649 रोजी होळीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपले जीवन यात्रा संपवली. *आम्ही जातो आमच्या गावा lआमचा राम राम घ्यावा ll* असा शेवटचा अभंग त्यांनी सांगितला. तुकाराम महाराज ब्रह्मलीन झालेला दिवस आजही तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. श्रीक्षेत्र देहू येथे या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक येतात व एखाद्या उत्सवाप्रमाणे या दिवशी भजन व कीर्तनाच्या गजरामध्ये मोठ्या भक्ती भावाने हा दिवस साजरा केला जातो. 🙏🙏
*डॉ विजय नागोराव भोसले* ,
रसायनशास्त्र विभाग,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.
मो नं 9403067252.
