एम सी आर
Uncategorized

उद्योजक व ध्यानसाधनेचे मिश्रण: सुरेश धूत (लेखक:डॉ. अजय गव्हाणे)

काही माणसं श्रमातून, कष्टातून, प्रयत्नातून स्वतःचे यशस्वी उद्योजकीय व आर्थिक क्षेत्र निर्माण केल्यानंतरही जमिनीशी नाळ ठेवून असतात. एखाद्या क्षेत्रात असामान्य कार्य व भरभराटी प्राप्त केल्यानंतरही सामान्यत्व जोपासून जीवन व्यतीत करतात. अशा वेळी ‘जीवन त्यांना कळले हो’ ही काव्यपंक्ती स्मरणात येते.
आपल्या भवतालची परिस्थिती अनुकूल, योग्य असताना मानवी जीवनातील शाश्वत तत्व व सत्य उरात जपून ठेवणारी माणसं विरळ असतात. अशा व्यक्तिमत्त्वांपैकी तुलसी पेंट्स, तुलसी कम्फर्ट व तुलसी सिनर्जीचे ओनर श्री.सुरेश धूत यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
‘तुलसी ‘ या आर्थिक उद्योगक्षेत्राची नांदेडकर आणि मराठवाड्याला चांगली ओळख आणि जाण आहे. ‘कोणत्याही कामाची चांगली सुरुवात ही ते कार्य अर्धे पूर्ण झाल्यागत जमा असते’, या म्हणीप्रमाणे इतरांच्या सहकार्याने, भागीदाराने व सामूहिक प्रयत्नांनी तुलसी व्यवसाय त्यांनी सुरू केला. रोपटे लावले. आज रोपट्याचे वटवृक्ष झालेले आहे. महाराष्ट्राबाहेर राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात इ. राज्यातही या व्यवसायाच्या शाखा घट्ट रोवून आहेत.
चिकाटी, जिद्द, सकारात्मकता, प्रयत्नांची पराकाष्ठा हा सुरेश धूत यांचा स्थायीभाव. त्यामुळेच ही गगनभरारी घेणे त्यांना शक्य झाले. ही भरारी घेत असताना यशाची नशा डोक्यात न भिनू देणे, ही अवघड बाबही त्यांनी साध्य केली. कोणत्याही वादात न पडता ‘मी आणि माझे ध्येय’ हे ब्रीद मनात ठेवून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्या ठायी आहे. आपल्या वाटचालीमध्ये त्यांनी कधीही स्पीडब्रेकर निर्माण केले नाही.
अहंकार, गर्विष्ठपणा, मीपणा त्यांच्या आसपासही फिरकत नाही. अन्यथा थोडाशा यशाने हरभऱ्याच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कमतरता आज नाही. थोड्याफार प्राप्तीने चाल व बोलण्याची ढब कशी बदलते, हे आपण पाहतो; मात्र यशाचे असामान्यत्व प्राप्त करूनही सामान्यत्व जोपासणारे सुरेश धूत हे नामानिराळे व्यक्तिमत्व.
महत्वपूर्ण नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे, मानवी मन हे सदैव अतृप्त असते. हे त्रिकालाबाधित सत्य जीवनात रुजवून ध्यान, अध्यात्माकडे वळणारे सुरेश धूत विशेष भावतात. ओशो रजनीश यांनी २१ व्या शतकातील मानवासाठी ध्यानधारणेला पर्याय नाही, असे आपल्या असंख्य प्रवचनात सांगितले आहे. हा ध्यानधारणेचा मार्ग सुरेश धूत स्वीकारतात आणि देशभरातील ध्यानशिबिरात न चुकता नित्य सहभागी होतात. आपले स्वतःचे मन, चेतना, दृष्टिकोन उच्चस्तरावर नेण्याचा ध्यानधारणेद्वारे आटोकाट प्रयत्न करतात. ओशो रजनीश यांचा संन्यास देखील त्यांनी स्वीकारलेला आहे. स्वामी आनंद सुरेश हे त्यांचे संन्यास नाव.
नांदेडमधील भगवान रजनीश ब्लेसिंग मेडिटेशन कम्युनमध्ये ध्यानशिबिरातील त्यांचा सहभाग व सहकार्य शब्दापलीकडील आहे. साधकांना तुलसी पेंट्समधील निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देणारे सुरेश धूत हे वेगळेच रसायन. भगवान रजनीश यांच्याद्वारे संन्यासीत स्वामी गोपाल भारती यांच्याद्वारे संचालित अनेक शिबिरांमधील त्यांची साधना नवोदित साधकांना मार्गदर्शक आहे. ध्यानसाधना करीत असताना शिबिर संचालनाचे देखील त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. इतर अनुभवी संचालक नसताना नांदेडमधील साधकांना ओशो रजनीश यांच्याद्वारे मार्गदर्शित संगीतमय ध्यानधारणेचे त्यांचे संचालन साधकांना उपयुक्त ठरले आहे. या ध्यान साधनेतील त्यांचे सहकारी मित्र म्हणजे प्रा. सुनील नेरळकर. या दोन्ही साधकांचे क्षेत्र वेगवेगळे असले तरी ध्यानधारणेबाबत मात्र एकमत.
उद्योजक असूनही ध्यानधारणेसाठी आयुष्य समर्पित करणारे सुरेश धूत मानवी जीवनातील अंतिम सत्याबाबत बांधिलकी दर्शवितात. सुरेश धूत यांचे विशेष स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ते दानत स्वभाव बाळगून आहे. पैसा केंद्रबिंदू न मानता ध्यान, माणूस व साधना केंद्रबिंदू मानून ते ‘देणाऱ्याची ‘ भूमिका वठवितात.
नामानिराळे, अफलातून व मित्रांचे मोहळ निर्माण करणाऱ्या सुरेश धूत यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांचे उर्वरित आयुष्य ध्यानमग्न, मौन, आनंदी व समाधिमय जावो, ही प्रार्थना.
-डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड

Share

Related posts

_विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Chief Editor

आकाशा गावकवाड मृत्यू प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला १ कोटींची मदत देण्याची मागणी

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची यशोगाथा; पोलिस भरतीत दोन विद्यार्थिनींची निवड

Chief Editor

यशवंत ‘द्वारे शोधचक्र पोर्टलवर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

लोकमत नांदेड गौरव सोहळा २०२६ : आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अर्जुन शेळके यांचा सन्मान

Chief Editor

Leave a Comment