*
प्रतिनिधी :
नांदेड जिल्ह्यातील,लोहा तालुक्यातील उणीपुरी सहाशेची लोकसंख्या असलेल्या मलकापूर नावाच्या छोट्याशा खेड्यातून बाहेर पडून यशवंत महाविद्यालयातील पदवीचे शिक्षण आणि वाचन कट्ट्यातून मिळालेला अभिव्यक्तीचा आत्मविश्वास या बळावर प्रथमेश परमेश्वर तेलंग हे झी माध्यम समूहातील ‘झी-२४ तास’ या वृत्त वाहिनीचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत.
विशिष्ट विषयात पारंपरिक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरण्याचा पर्याय अव्हेरुन ज्या विषयात आपल्याला रुची आहे, त्याच्याशी निगडीत कौशल्य आत्मसात करुन त्यावर प्रभुत्व संपादन करत पत्रकारितेच्या क्षेत्रात नोकरी करण्याचा निर्णय प्रथमेश यांनी पाच वर्षांपूर्वी घेतला.वृत्तांकन, शब्दांकन, बातमी लेखन, अहवाल लेखन अशा कौशल्यांचा रियाज करण्यासाठी त्यांना यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागाच्या ‘वाचन कट्टा’ या उपक्रमाची विशेष मदत झाली. कोरोना काळात वाचन कट्ट्याने घेतलेल्या ‘प्रेरणेचा प्रवास’ या संवाद मालिकेपासून प्रेरणा घेऊन त्यांनी पत्रकारितेकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला न्यूज नेशन नेटवर्क,नंतर नवभारत,पुढे दैनिक पुढारी असा प्रवास करत त्यांनी राजधानीतील माध्यम जगतात आपला जम बसवला आणि या अनुभवाच्या जोरावर आता ते देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा झी माध्यम समूहात दाखल झाले असून ‘झी-२४ तास’चे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपले काम सुरु केले आहे.
भाषण आणि लेखन या दोन्ही कौशल्यांवर त्यांचे प्रभुत्व असून ‘दिल्लीतील महाराष्ट्र’ हा त्यांचा पाक्षिक स्तंभ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा खासदार श्री.अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा सौ.अमिताभाभी चव्हाण,सचिव श्री डी.पी.सावंत, सहसचिव ॲड.उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ.रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य तथा भोकरच्या आमदार ॲड.श्रीजयाताई चव्हाण, ॲड.सुजयाताई चव्हाण, नरेंद्रदादा चव्हाण,प्राचार्य डॉ.जी.एन.शिंदे आणि वाचन कट्ट्याचे समन्वयक डॉ. विश्वाधार देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
