एम सी आर
Uncategorized

लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला नवी दिशा

आयआयपीए’ व ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये शैक्षणिक व प्रशासकीय सहकार्यासाठी सामंजस्य करार

नांदेड:
लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणा यांना चालना देण्यासाठी नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन (IIPA) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्यात दिनांक 4 जून रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारामुळे लोकप्रशासन विषयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळण्याबरोबरच संशोधन व सुशासनाच्या क्षेत्रात नवे आयाम निर्माण होणार आहेत.
भारत सरकारच्या कर्मचारी, लोक तक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली IIPA ही लोकप्रशासन क्षेत्रातील देशातील सर्वोच्च संस्था मानली जाते. नांदेडचे जिल्हाधिकारी तथा IIPA नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष राहुल कर्डिले (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच नांदेड येथे या संस्थेची शाखा स्थापन करण्यात आली आहे.
विद्यापीठातील कुलगुरू दालनात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, IIPA नांदेड शाखेचे सचिव डॉ. बी. आर. कतुरवार, नवोपक्रम विभागाचे संचालक डॉ. एस. जे. वाढेर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. दीपक वाघमारे, डॉ. मीरा फड आणि डॉ. चांदोबा कहाळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सामंजस्य कराराअंतर्गत लोकप्रशासन व सामाजिक शास्त्रातील संशोधनाचा उपयोग प्रशासकीय सुधारणा आणि विविध विकासात्मक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येणार आहे. बी.ए. व एम.ए. लोकप्रशासनच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका आदी कार्यालयांमध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप, क्षेत्रभेटी आणि प्रकल्प अभ्यासाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रशासकीय अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच IIPA आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांसाठी विशेष व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा आणि मॉक इंटरव्ह्यू आयोजित केले जाणार आहेत. UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम विशेष लाभदायी ठरणार आहे.
या करारामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांचा उपयोग लोकप्रशासनातील संशोधन, प्रशिक्षण आणि प्रशासकीय सुधारणांसाठी होणार असून भविष्यात नांदेड हे प्रशासकीय सुधारणा, संशोधन आणि प्रशिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. संयुक्त संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून प्रभावी सुशासनासाठी धोरणात्मक शिफारशी केंद्र व राज्य शासनाला सादर केल्या जाणार आहेत.
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले, “हा करार मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शासन स्तरावरील धोरणनिर्मिती, सुशासन आणि प्रशासकीय सुधारणा यांच्याशी जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा ठरेल. लोकप्रशासन विषयातील संशोधनाचा उपयोग प्रभावी धोरणनिर्मितीसाठी होईल.”
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, “विद्यापीठातील संशोधन कार्य समाज व प्रशासनासमोरील प्रत्यक्ष समस्यांवर आधारित असणे आवश्यक आहे. संशोधनातून निघणारे निष्कर्ष आणि शिफारशी विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयोगी पडल्या पाहिजेत. समाजोपयोगी आणि गुणवत्तापूर्ण संशोधनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक IIPA नांदेड शाखेचे सचिव डॉ. बी. आर. कतुरवार यांनी केले, तर आभार नवोपक्रम विभागाचे संचालक डॉ. एस. जे. वाढेर यांनी मानले.
———————————————-

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये शोधचक्र प्रणालीवर ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन

Chief Editor

पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार प्रदान

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे विशेष वार्षिक शिबीर-२०२५-२६ चे मौजे. पारवा येथे आयोजन

Chief Editor

एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी किरण पडलवार यांची निवड

Chief Editor

संत गाडगेबाबा यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्नशील – महापौर कविता मुळे

Chief Editor

स्वामी विवेकानंद ‘क्षितिज-2026’ या वार्षिक स्नेहसंमेलनात तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

Leave a Comment