_नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले यांनी केले भरभरून कौतुक._
मराठवाड्यातील प्रसिद्ध लेखक,वक्ते तथा परखड समीक्षक प्रा डॉ विश्वाधार देशमुख यांच्या नवनवीन कल्पनापैकी एक असलेला ‘यशवंत बिब्लियोफाइल्स’ हा कार्यक्रम नुकताच यशवंत महाविद्यालय येथे संपन्न झाला. मोबाईल, सोशल मीडियाच्या काळात माणूस अस्थिर, अस्वस्थ व बैचेन झालेला आहे. अशा या काळात सुट्टीच्या दिवशी मोबाईल पासून दोन तास दुर राहून फक्त आणि फक्त पुस्तकाच्या दुनियेत रमण्यासाठी व पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी स्वतःशी निवांत बसून विचार करण्यासाठी , मन शांत, प्रसन्न करण्यासाठी व खरा आत्मानंद मिळवण्यासाठीचा हा कार्यक्रम. कुठलीही औपचारिकता नाही, कुठलाही बडेजाव नाही की कोणालाही नकार नाही. ज्याची इच्छा आहे त्याने यावे स्वतः आपल्या आवडीचे पुस्तक ठेवलेल्या जागेवरून घ्यावे, जिथे जागा मिळेल मग ती पायरी असो की खुर्ची, फरशी असो की गवत, जमीन असो अथवा गालिचा ज्याला जसे योग्य वाटेल तसे बसावे. त्याच्या सोबतीला हळुवार आवाजात शास्त्रीय संगीत. सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असा बुक मार्क दिला जातो. विशेष म्हणजे हे बुक मार्क विद्यार्थ्यांनीच स्वतः तयार केलेले आहेत. त्या बुक मार्क वर एखाद्या साहित्यिक, कवी, लेखक यांची ओळख दाखवणारे विशेष वाक्य, त्यांचा फोटो असतो व मागच्या बाजूस वाचन कट्टा हा वॉटर मार्क असतो. विद्यार्थी जेव्हा पुस्तक वाचत असतात तेव्हा काही स्वयंसेवक विद्यार्थी आपापले काम जसे की फोटो काढणे, शूटिंग घेणे , कोणत्या गोष्टीची कमतरता असल्यास तत्काळ ती देण्याचा प्रयत्न करणे इत्यादी व्यवस्थापनाच्या गोष्टी अतिशय आनंदाने व उत्साहाने करतात. काही निवडक विद्यार्थी या सुंदर कार्यक्रमाचे पेंटिंग करत होते.सर्वांचा उद्देश एकच प्रेम आणि आनंद देणे. यातून विद्यार्थी घडतात. कोणी सुंदर फोटोग्राफर होतो,कोणी एडिटर होतो तर कोणी चांगला लेखक. मुलांचा आत्मविश्वास वाढतो व मुल भविष्यातील वाटचालीसाठी सक्षम होतात. विद्यार्थ्यांचा एकमेकावर विश्वास निर्माण होतो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत होऊन व विद्यार्थ्यांना काहीतरी चांगले केल्याचा नवीन शिकण्याचा आनंद मिळतो.
हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी यशवंत महाविद्यालयातील खुल्या प्रांगणात पार पडला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले सर व यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश चंद्र शिंदे सर हे प्रमुख मार्गदर्शक होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक तथा कवी श्री व्येंकटेश चौधरी, प्रा डॉ विजय भोसले, प्रा गजू हांडे यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला डॉ विश्वाधार देशमुख यांनी या कार्यक्रमाची संकल्पना व महत्त्व सांगून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांकडून कल्पना निर्माण झाली,त्या विद्यार्थ्यांचे आवर्जून आभार मानले व पुस्तक व वाचन संस्कृती किती व कशी महत्त्वाची आहे या विषयी सांगुन सर्वांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन यशवंत महाविद्यालयाच्या बी.एस्सी. तृतीय वर्गातील विद्यार्थिनी कु पूजा तोटावाड हिने अतिशय ओघवत्या भाषेत केले. वाचन कट्टा उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच स्वरूप तिने सांगितले. यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाविषयी माहिती दिली.तसेच प्राध्यापकांच्या व विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याबद्दल तसेच यशाबद्दल सर्वांचे कौतुक केले. डॉ विश्वाधार देशमुख हे अतिशय उपक्रमशील प्राध्यापक असून त्यांना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संकल्पना बद्दल व कामाबद्दल शुभेच्छा दिल्या. वाचन कट्टा या उपक्रमाचे अध्यक्ष असलेला विद्यार्थी शुभम राठोड व त्याच्या सहकाऱ्यांनी वाचन कट्टा तर्फे माननीय जिल्हाधिकारी यांचे बुक मार्क देऊन स्वागत केले.
आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून फक्त आणि फक्त पुस्तकांप्रती, वाचनाप्रती असलेल्या आवडीमुळे व डॉ विश्वाधार देशमुख यांच्यावर असलेल्या जिव्हाळ्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी या कार्यक्रमास येऊन प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. विद्यार्थ्यांना उपदेश करताना माननीय जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांसाठी डॉ देशमुख यांच्या अतिशय नाविन्यपूर्ण व वेगळ्या अशा उपक्रमाचे भरभरून कौतुक केले, तसेच हा उपक्रम यशवंत महाविद्यालया पुरता न राहता तो पूर्ण जिल्हाभर राबविला जावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून लवकरच जिल्ह्यातील मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक घेऊन अशा प्रकारच्या विद्यार्थी केंद्रित व विद्यार्थ्यांच्या साठी अतिशय उपयुक्त अशा कार्यक्रमाचे जिल्हाभर सर्वत्र आयोजन करू असे सांगून या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी पुस्तक वाचनामुळे ते स्वतः कसे घडले व पुस्तक हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र कसा असतो हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.विद्यार्थी दशेमध्ये असताना मी ज्या काही उपक्रमामध्ये किंवा गोष्टींमध्ये भाग घेऊ शकलो नाही त्या गोष्टीची मला खंत वाटते म्हणून विद्यार्थ्यांनो वेळीच जागे व्हा व कॉलेज जीवनाचा भरभरून आनंद लुटा, भरपूर वाचन करा, त्यातील महत्वाच्या गोष्टी लिहत रहा, भरपूर लिखाण करा, मित्र जोडा असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जवळजवळ 40 ते 45 मिनिटाच्या भाषणात त्यांनी अतिशय सविस्तर, अभ्यासपूर्ण असे मौलिक मार्गदर्शन केले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेशचंद्र शिंदे यांचे व डॉ विश्वाधार देशमुख यांनी अशा सुंदर कार्यक्रमास बोलविल्याबद्दल आभार व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांचे वैयक्तिक कौतुक करून प्रत्येक विद्यार्थ्याला बुक मार्क देऊन कोणते पुस्तक वाचत आहात, लेखक कोण आहेत हे विचारून त्या पुस्तकाविषयी, लेखकांविषयी तसेच त्या विषयावरच्या दुसऱ्या लेखकाच्या पुस्तकाविषयी विद्यार्थ्यांना अतिशय आत्मियतेने माहिती दिली. यातून जिल्हाधिकारी सरांचे पुस्तकाविषयी, लेखकांविषयी असलेले प्रेम, अभ्यास दिसला. एवढा विद्वान माणूस पण कुठेही अहंकाराचा लवलेशही दिसला नाही. माझा छोटा मुलगा सर्वेश भोसले हा सुद्धा या उपक्रमात सहभागी झाला त्याबद्दल त्यांनी त्याचेही विशेष कौतुक केले व कोणते पुस्तक वाचत आहेस , त्याचे लेखक कोण आहेत इत्यादी चर्चा केली.
या कार्यक्रमासाठी मुद्दाम आलेले यशवंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अभिलाष महामुने, जे सध्या पुणे येथे कार्यरत आहेत त्यांच्याशीही जिल्हाधिकारी यांनी तो करत असलेल्या उपक्रमाबद्दल चर्चा केली. तसेच, श्री बालाजी लोंढे या माजी विद्यार्थ्याने स्वतः करत असलेल्या हॉटेल व्यवसायाची माहिती घेऊन त्याने मुद्दामहून आणलेल्या रगडा कॉफीचे भरभरून कौतुक केले व आपण विश्वाधार देशमुख सोबत हॉटेलला नक्की भेट देऊ असा शब्द दिला. ओम कवाळे, बालाजी जाधव, बालाजी माने तसेच प्रा माधव पुयड इत्यादी सोबतही त्यांनी गप्पा मारल्या. अहंकारशून्य ,वाचनप्रेमी, विनम्र व आपल्या साधेपणाने त्यांनी सर्व उपस्थितांचे मन जिंकून घेतले. डॉ विश्वधार देशमुख यांनी या कार्यक्रमा साठी उपस्थित सर्वांचे आभार मानले व त्यानंतर खास तयार करण्यात आलेल्या यशवंत बिब्लियोफाइल्स सेल्फी पॉईंट येथे जिल्हाधिकाऱ्यां सोबतच माननीय प्राचार्य सर व सर्व विद्यार्थ्यांचे फोटो घेतले.मग अतिशय हसत खेळत अतिशय सहज व साधेपणाने कार्यक्रम संपन्न झाला व रविवारचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ‘वाचन कट्टा माय मराठी मंडळा’चे अध्यक्ष शुभम राठोड, यशवंत बिब्लियोफाइल्सच्या हिंदवी जाधव, पूनम भोसले, प्रणिता तेलंग, तबस्सूम शेख,’कला कट्ट्या’च्या शिवानी कार्लेकर,जर्मिन शेख,गौरी शिंदे,स्नेहा गायकवाड, ‘कर्तव्य कट्ट्या’च्या गोदावरी कानशुक्ले, कृष्णा गव्हाणे, सृजन गित्ते, दुर्गा देशमुख,राधा कराड,पवन टाकणखार, ‘कवी कट्ट्या’चे आयुष सोनकांबळे, मयूर धुतुरे, अंजली मद्रेवार, सचिन तेलंग,विश्वजित परमार,
पल्लवी रागेवार,शिवानी क्षीरसागर अशा अनेकानेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
डॉ विजय नागोराव भोसले, रसायनशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड.
मो नं 9403067252
