महिला महाविद्यालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न.
गेवराई दि. १२ (प्रतिनिधी) कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्यंत प्रगत असे आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात परिवर्तन होईल. विशेष करुन उच्च शिक्षण क्षेत्रातील बदल हे अमुलाग्र व दुरगामी असतील असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी केले. त्या महिला महाविद्यालय, गेवराई येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, समाज : सामाजिक परिवर्तन, समानता आणि मानवी भविष्य’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय, गेवराई येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, समाज : सामाजिक परिवर्तन, समानता आणि मानवी भविष्य’ या विषयावर राष्ट्रीय परिषदे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटक म्हणून र.भ.अट्टल महाविद्यालय च्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजच्या डिजिटल युगातील महत्त्वाची तांत्रिक क्रांती असून तिच्यामुळे मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्राबरोबर उच्च शिक्षण क्षेत्रात ही आमूलाग्र व दुरगामी असे बदल घडत आहेत. अध्यापन, संशोधन आणि ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वाढत असून विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा सकारात्मक व सर्जनशील वापर करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे बिजभाषक राजीव गांधी केंद्रीय विद्यापीठ, अरुणाचल प्रदेश येथील प्रोफेसर डॉ. विनोद कुमार यादव आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नवीन रोजगार निर्मिती होईल तसेच तंत्रज्ञानाचे केंद्रीकरण झाल्याने आर्थिक विषमता वाढेल. अटोमेशन मुळे अकुशल कामगार मोठ्या प्रमाणात बेरोजगार होतील. त्यामुळे आपले रोजगार टिकवण्यासाठी आपण कृत्रिम बुद्धिमत्ता चे कौशल्य आत्मसात केले पाहिजे.
परिषदेच्या समारोप समारंभ चे प्रमुख अतिथी प्रमीलादेवी पाटील महाविद्यालय, नेकनूर चे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. दादासाहेब मोटे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता चे ग्रामीण भागातील समाजावर होणारे परिणाम महत्त्वपूर्ण असणार आहेत.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. तात्याराम सोंडगे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता चा मानवी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित, अध्यक्ष मा.श्री. जयसिंग पंडित, सचिव मा. श्री. अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या राष्ट्रीय परिषदेसाठी मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता या विषयाचे महत्त्व अधोरेखित होते असे प्रतिपादन केले. यावेळी जय भवानी कला व विज्ञान महाविद्यालय, पाटोदा चे प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे व श्री. शिवाजीराव दादा पंडित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिवाजीनगर गढी चे प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उद्घाटन समारंभाचे सूत्र संचालन सह समन्वयक डॉ. संगीता आहेर यांनी केले. अतिथींचा परिचय डॉ. संजय भेदेकर यांनी करून दिला, तर संयोजक प्रोफेसर डॉ. दत्ता तंगलवाड यांनी आभार मानले. समारोप समारंभाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. नामदेव शिनगारे यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. डॉ. रामहरी काकडे यांनी करून दिला, तर कार्यक्रमाच्या शेवटी समन्वयक प्रा. डॉ. राजाभाऊ चव्हाण यांनी आभार मानले.
या राष्ट्रीय परिषदेत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, समाज, सामाजिक परिवर्तन आणि उच्च शिक्षण या विषयांवर संशोधन पर लेख सादर करण्यात आले. परिषदेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि सामाजिक विचारांची देवाणघेवाण होऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
