नांदेड:
साहित्याचं सृजन सामाजिक भान, जाण देऊन जाते. आपल्या आजोबांनी म्हणजेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांनी आपल्या प्रज्ञा आणि प्रतिभेच्या जोरावर प्रचंड साहित्य निर्मिती करून समाजमन जागृत करण्याचं मोठं काम अण्णा भाऊ आणि शंकर भाऊंनी केलं आहे. तोच वसा आणि वारसा समृद्ध करत आज महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये त्यांचे नातू आणि अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे हे अत्यंत निष्ठेने काम करत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो. आज सचिन भाऊ साठे यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख…
संपादक..
शब्दांना अनुभवाची धार आणि प्रतिभेचे तेजस्वीपण लाभले की अस्सल साहित्याचा जन्म होतो. अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांच्या साहित्याला हेच वास्तवाचे अधिष्ठान प्राप्त झाले होते. जगलेल्या दाहक जीवनाची विदारक अनुभूती शब्दा शब्दांतून पुल्लिंगासारखी प्रज्वलित होते आणि अंधारलेले मनाचे कोपरे प्रकाशमान व्हायला लागतात.दुःख दैण्याच्या अंधारात चाचपडणारा मानवी समूह हा अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे त्यांच्या अस्थेचा विषय होता. आणि त्यातूनच अस्सल साहित्याची निर्मिती होत गेली .एका कामगारानेच कामगारावर लिहावं ही अस्सल साहित्याची बीजं अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसायला लागतात. सुख वैभवच्या रुपेरी महालात बसून लिहिलेले तथाकथित मराठी साहित्य काळजाचा ठाव कधीच घेऊ शकले नाहीत. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांच्या साहित्याचं मराठी साहित्य विश्वातील पदार्पण म्हणजे खेडी-पाडी,वाडी- तांडे यातून दुःख, दैन्य, दारिद्र्य सोसणाऱ्या सामान्य माणसाच्या नायकत्वाचा उदय होता. विसाव्या शतकातील दोन सामर्थशाली लेखक म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे हे होत. फारसे आयुष्यमान न लाभलेल्या या दोन्हीही प्रतिभा संपन्न साहित्यिकांनी कथा, कादंबरी, नाटक, लोकनाट्य, प्रवासवर्णन ,पोवाडा, लावणी असे विविधांगी वाङ्मय प्रकार हाताळून अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या विविधांगी साहित्य प्रकारावर आज महाराष्ट्रभर आणि देशात संशोधन होताना दिसते. ही अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
केवळ मनोरंजनासाठी साहित्याचं सृजन करावे हा विचार अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांच्या मनाला स्पर्श करणारा नव्हता. सामाजिक परिवर्तनाचा क्रांतिकारी एल्गार हाती घेऊन इथल्या व्यवस्थेला अंतर्भाह्य परिवर्तन साकार करणे हेच अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांच्या साहित्याचे प्रधान मूल्य होते. भारतीय संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि मनुष्यता ही मूल्ये दिसून येतात. अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांच्या साहित्यात भारतीय संविधानिक मुल्यांचे दर्शन ठायी ठायी दिसून येते. अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांच्या साहित्यातील ही मुले कायम आपल्या जीवनात आणि संघटनात्मक पातळीवर आणि समाजामध्ये रुजावीत यासाठी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे हे महाराष्ट्रभर रात्रीचा दिवस करत समाजाच्या उत्थानासाठी, उद्धारासाठी, परिवर्तनासाठी आणि प्रबोधनासाठी आपली लेखणी आणि वाणी झिजवीत आहेत.याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव नावाच्या निवडुंगाच्या जंगलात वाढलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाने वाटेगाव या मातीचा सुगंध राज्य, देश आणि विदेशात सुगंधित केला आहे. त्यात अण्णा भाऊ साठे, शंकर भाऊ साठे, राघोजी साठे, फकिरा, विष्णुपंत कुलकर्णी आणि शंकर पाटील या कर्तृत्वान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्त्वाने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या पाऊल खुणा समृद्ध केल्या आहेत. तोच वसा आणि वारसा आज महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात सचिन भाऊ साठे हे सिद्ध करत आहेत. २८ फेब्रुवारी १९८६ साली वाटेगाव च्या पवित्र क्रांती भूमीत सचिन भाऊ साठे यांचा जन्म झाला. आपले मोठे आजोबा म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांच्या निधनानंतर १९९६ आजोबा शंकर भाऊ साठे यांचे निधन झाले. वडील संजय भाऊ साठे आणि आई गीताबाई आणि चुलत्या सावित्रीमाई साठे यांच्या संस्कारात सचिन भाऊ साठे वाढत गेले. वडील संजय भाऊ साठे यांचे अकाली म्हणजेच १९९३ साली निधन झाले. त्याच साली म्हणजे १९९३ सालीच सचिन भाऊ साठे यांचे छोटे बंधू पंकज यांचेही निधन झाले.सचिन भाऊ साठे यांनी इयत्ता पहिली आणि दुसरीचे शिक्षण वाटेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केल्यानंतर गीताबाई साठे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोंडोली या आपल्या माहेरी काही काळ वास्तव्यास राहिल्या. त्याचवेळी सचिन भाऊ साठे यांनी आपल्या आजोळी तिसरी आणि चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुन्हा पाचवीपासून पुढचे शिक्षण सचिन भाऊ साठे यांनी वाटेगाव मध्ये पूर्ण केले.
मधुकर अण्णा भाऊ साठे आणि संजय शंकर भाऊ साठे यांचे निधन झाल्यानंतर घरात एकही कर्ता पुरुष नसतानाही माई सावित्रीबाई साठे आणि माई गिताबाई साठे यांनी आपल्या चिमुकल्या लेकरांना म्हणजेच दिपालीताई, सुवर्णाताई, ज्योतीताई, आरती ताई आणि सचिन भाऊ यांना या लेकरांना तळ हाताच्या फोडासारखं जपत सांभाळत अण्णा भाऊ आणि शंकर भाऊ यांच्या कर्तृत्वाचा समृद्ध वारसा या दोन्हीही माऊलींनी अत्यंत समर्थपणे सिद्ध केला आहे. या काळात या परिवाराने सोसलेले आणि भोगलेले अनेक बरे वाईट प्रसंग वाट्याला आले असतानाही कधीच न खचता, न घाबरता अत्यंत समर्थपणे या दोन्हीही माऊलींनी महाराष्ट्रातील येणा-या जाणाऱ्यांची काळजी अगदी जीवापाड जपली आहे. सावित्रीबाई साठे आणि सचिन भाऊ साठे अण्णाभाऊंचा वारसा समर्थपणे पुढे चालवत महाराष्ट्र पालथा घालत आहे.
समाजाच्या उन्नतीचे काम करत असताना पोटापाण्याचे प्रश्न सुटणार नाहीत कुठेतरी कायमस्वरूपी नोकरी असावी हा विचार महाराष्ट्रातील काही विचारवंतांच्या मनात आला आणि अण्णाभाऊंचे वारसदार म्हणून सचिन भाऊ साठे यांना बीड येथील बलभीम महाविद्यालयात नोकरीसाठी आपला शब्द खर्ची केला आणि सचिन भाऊंना एकदाची नोकरी मिळाली. समाजाविषयीची प्रचंड ओढ आणि समाजाच्या उत्थानाचा विचार कायम सचिन भाऊ साठे यांच्या मनात रुंजी घालत असायचा. नोकरी सांभाळून समाजाच्या उत्थानाचे काम करता येणार नाही ही बाब लक्षात आल्यानंतर सचिन भाऊ साठे यांनी नोकरीचा त्याग केला.
पुढे २०१७ साली त्यांनी महाराष्ट्रातील काही विचारवंतांना सोबत घेऊन मानव हित लोकशाही पक्षाची स्थापना केली. परंतु राजकीय महत्त्वकांक्षा आणि समाजाच्या उत्थानाचा विचार करत त्यांनी पुढे २०२३ सालापासून सचिन भाऊ साठे आणि गणेश भाऊ भगत आणि महाराष्ट्रातील काही विचारवंतांनी मिळून पुन्हा एकदा अण्णा भाऊ साठे क्रांती सेना या नावाने आपले संघटन सुरू करून महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात सचिन भाऊ साठे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज घडीला महाराष्ट्रातील २२-२३ जिल्ह्यांमध्ये अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या क्रियाशील कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर संघटन चालू असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बंड पुकारून अन्यायग्रस्त समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सचिन भाऊ साठे हे रात्रीचा दिवस करून महाराष्ट्रासह अनेक राज्यात आज फिरताना दिसत आहेत. अण्णा भाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र सह तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशामध्ये या संघटनेचे जाळे सर्वदूर पसरलेले आहेत. हे सगळं करत असताना सचिन भाऊ साठे यांच्या अर्धांगिनी एडवोकेट मीराताई सचिन साठे यांची त्यांना मिळालेली खंबीर साथ हे सचिन भाऊंच्या आजच्या धडपडीचे यश म्हणावे लागेल. सचिन भाऊंचे कन्या मुक्ता उर्फ राजनंदिनी आणि चिरंजीव प्रसेनजीत या दोन्हीही चिमुकल्यांना शिक्षण आणि संस्कार अडवोकेट मीराताई आपला वकिलीचा व्यवसाय सांभाळत या लेकरांच्या शिक्षणाची आणि संस्काराची काळजी वाहत आहेत.
अण्णा भाऊ साठे क्रांती सेना म्हणजे केवळ संघटन नसून ते एक कुटुंब या भावनेने क्रांतीसेनेत काम करणारे सर्व झुंजार कार्यकर्ते आज महाराष्ट्रभर समाजाच्या उन्नतीचा आणि उत्थानाचा विचार करत अत्यंत निष्ठेने काम करत आहेत. सचिन भाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाची दखलही महाराष्ट्र शासनाने घेतले असून. ते सध्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सन्माननीय सदस्य म्हणूनही काम करत आहेत. महाराष्ट्रातील २२-२३ जिल्ह्यांमधील कार्यकर्ते आपल्या लाडक्या सचिन भाऊंच्या आदेशाची आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण समाज उपयोगी उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचा आदेश मानून आज काम करत धडपडत आहेत.
नांदेड जिल्ह्याचे क्रियाशील जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी देवकृपा लॉन्स नांदेड येथे सचिन भाऊ साठे यांच्या वाढदिवसाचे आणि राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करून त्यांचा आगळावेगळा वाढदिवस साजरा करत आहेत. सचिन भाऊ साठे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा….
*शिवा कांबळे*
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक, नांदेड
