एम सी आर
Uncategorized

नाथ संप्रदायातील एक सहज संत: ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर*

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीत भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा अद्भुत संगम घडवणाऱ्या संतांनी समाजाला नवे जीवनदर्शन दिले. पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे.या वारीतील भक्ती परंपरेने लोकजीवनाला दिशा दिली आहे आणि सामान्य माणसाच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण केला आहे .या संतपरंपरेत अनेक संप्रदाय असून या पैकी एक महत्त्वाचा संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. या संप्रदायातून समाजप्रबोधन, आध्यात्मिक उन्नती आणि लोककल्याणाचे कार्य अखंडपणे चालू आहे. या परंपरेचे सद्य काळातील एक प्रभावी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर चे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर. औसेकर महाराजांनी धुंडा महाराज देगलूरकर यांच्याकडून आध्यात्मिक शिक्षण घेतले आहे. श्री गहिनीनाथ महाराज यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष झाल्यावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये मंदिराचे जतन करणे, संवर्धन करणे त्याच बरोबर भाविकांसाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याच्या महत्त्वाचा निर्णय घेण्यात त्यांनीच पुढाकार घेतला आहे.तसेच पंढरपूर येथे संतपीठ निर्माण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. पंढरपूर हे महाराष्ट्राचे हृदय असून या ठिकाणी प्रकट झालेला समतेचा विचार महाराष्ट्रभर प्रवाहित झाला आहे. पंढरपूर हे समतेचे केंद्र आहे” असे गहिनीनाथ महाराज औसेकर नेहमी सांगतात.

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत अद्भुत अशी पवित्र परंपरा आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी,कार्तिकी एकादशीला भगवान श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आळंदी व देहू येथून तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून पंढरपूरला पायी जातात.वारी ही केवळ यात्रा नसून ती भक्ती, समता आणि एकतेचा संदेश देणारी परंपरा आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंग गात गात “ज्ञानोबा-तुकाराम” जयघोष करत वारकरी पुढे चालत असतात. श्री विठ्ठल भक्तांसाठी ही वारी म्हणजे आयुष्यभराची आध्यात्मिक साधना आहे.महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक पुरातन परंपरा असून वारकरी संप्रदायाने तर भक्तीसंगीतातील अनेक प्रकार दिल आहेत. वारकरी संप्रदायातील अशाच अनेक पुरातन परंपरेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा मानली जाती ती चक्री भजनाची . औसेकर महाराज हि परंपरा आजही चालवत आहेत.या चक्री भजनाचे पारंपरिक 14 अभंग असून देगलूरकर घराण्याची ही परंपरा 332 वर्षांपासून सुरु आहे. चक्राकार नाचत अभंग गायनाची हि पद्धत होय. यालाच चक्री भजन असे म्हणतात.हातात दिमडी पायात घुंगरू आणि भगवंताचा,गुरुचा जयघोष करीत सुरु झालेले भजन रंगात येवू लागताच वारकरी वेगवेगळ्या पद्धतीने नाचत मंत्रमुग्धपणे नाचू लागतात. “चक्रीभजन” ही एक अत्यंत महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण साधना आहे. चक्रीभजन म्हणजे भक्तीचा अखंड प्रवाह ज्यात वारकरी गोलाकार फिरत, टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात नाचत व भजन गात विठ्ठलनामाचा जप करतात. या भजनातून एकात्मता, समर्पण आणि सामूहिक साधनेचा अद्वितीय अनुभव मिळतो. ह भ प श्री गहिनीनाथ महाराज यांनी या चक्रीभजन परंपरेला नवे बळ दिले असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविक भक्त या साधनेत सहभागी होतात आणि अध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतात. श्री गहिनीनाथ महाराज या सर्व कार्यांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात.

नाथ संप्रदायाची परंपरा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून पुढे आलेली आहे. या अखंड गुरुपरंपरेतून निर्माण झालेली आध्यात्मिक ऊर्जा आजही समाजाला दिशा देते. या परंपरेचा वारसा पुढे नेणारे “अद्वैत धर्मप्रसारक पीठ, नाथ संस्थान, औसा” हे एक महत्त्वाचे केंद्र आहे.नाथ संस्थान औसा ही केवळ धार्मिक संस्था नसून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे केंद्र आहे. सुमारे 250 वर्षांची ही परंपरा औसेकर घराण्याच्या माध्यमातून सातत्याने समाजसेवा करत आहे. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर हे या परंपरेचे पाचव्या पिढीतील प्रमुख वाहक आहेत. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1959 रोजी सोलापूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर घरातील धार्मिक वातावरणाचा आणि संस्कारांचा प्रभाव होता. तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर संगम दिसून येतो.बालवयातच त्यांनी भक्तीमार्ग स्वीकारला. केवळ नवव्या वर्षी त्यांनी औसा ते पंढरपूर अशी पायी माघवारी केली. ही यात्रा म्हणजे त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होती. पुढे 1970 साली त्यांनी कीर्तनसेवा सुरू केली आणि समाजप्रबोधनाचा ध्यास घेतला. कीर्तन, प्रवचन आणि अभंगांच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये नैतिक मूल्ये, भक्तीभाव आणि सामाजिक जाणीव जागृत केली. विविध धार्मिक उत्सव, पायी माघवारी, चक्रीभजन यांसारख्या उपक्रमांमधून समाजात एकात्मता निर्माण करण्याचे कार्य येथे होते.

ह भ प श्री गहिनीनाथ महाराजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अष्टपैलू आहे. ते एक उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, विचारवंत आणि समाजसेवक आहेत. पण यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते “सहज संत” आहेत. त्यांच्या वागण्यात कोणताही अवडंबर नाही, कोणताही अहंकार नाही. मोठ्या पदावर असूनही त्यांच्यातील साधेपणा आणि नम्रता विशेष जाणवते.ते अतिशय स्पष्ट वक्ते आहेत.त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठा गुण म्हणजे “लोकसंग्रह” पंढरीच्या वारीमध्ये हजारो फक्त त्यांच्या दर्शनासाठी येतात. महाराज प्रत्येकाशी वैयक्तिक बोलतात. ख्याली खुशाली विचारतात. सर्वाना नावाने ओळखतात, लहान मोठा,श्रीमंत गरीब, असा कोणताही भेदभाव त्यांच्या वागण्यात दिसत नाही. राजकारण, समाजकारण , अध्यात्म या सर्व क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांचा संबंध असला तरी महाराज अतिशय साध राहतात. इतरांना प्रोत्साहन देतात, सन्मान करतात. त्यामुळेच त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस कायमचा त्यांचा होतो. गहिनीनाथ महाराज यांची जीवनशैली अत्यंत साधी आहे. वारकऱ्यांची ओळख असलेले स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे व डोक्यावर पांढरी टोपी किंवा नाथ परंपरेचा हिरवा फेटा, कपाळावर अष्टगंध बुक्का व नेहमी हसतमुख राहणे, कोणत्याही परिस्थितीत शांत आणि स्थिर राहणे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे जीवन म्हणजे संतत्वाचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या आचरणातून आपणास खरे संतत्व दिसते .
श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची दखल समाजाने विविध पुरस्कारांच्या माध्यमातून घेतली आहे. धर्म, समाजप्रबोधन, कीर्तन आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानासाठी त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग कडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित असा ‘कीर्तन समाज प्रबोधन पुरस्कार, मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार, धर्मभास्कर पुरस्कार, पं.मदनगोपालजी व्यास पुरस्कार,आर्ट ऑफ लिव्हिंग पुरस्कार,वि.स.पागे पुरस्कार,मराठवाडा भुषण पुरस्कार, शनिरत्न पुरस्कार,हिंदुत्वाचे आधारस्तंभ पुरस्कार,धर्मकेसरी पुरस्कार, समाजप्रबोधनपर पुरस्कार, धर्म प्रचार कार्य पुरस्कार,गांधी फोरम पुरस्कार,वारकरी पुरस्कार,किर्तनकार पुरस्कार,संतश्रेष्ठ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
नुकताच नांदेड येथिल श्री याज्ञवल्क्य वेद पाठशाळेच्या वर्धापन दिनानिम्मित अयोजित कार्यक्रमात श्री गहिनीनाथ महाराज औसेकर याना पंढरपूर येथील गोपालशास्त्री गुरुजी यांच्या स्मरनार्थ दिला जाणारा ‘शास्त्री पुरस्कार’ गाथामूर्ती सद्गुरु ह भ प चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याही पुढे श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर येथील अध्यक्ष रूपाने वारकऱ्यांची सेवा घडत राहो व त्यांच्या हातून चांगले समाजकार्य घडो तसेच श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच त्या जगत विधात्या पांडुरंग चरणी प्रार्थना.🙏🙏.

प्रा डॉ विजय नागोराव भोसले,
रसायनशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड,
मो नं 9403067252

Share

Related posts

कै सौ कमलताई जामकर महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमाचे आयोजन 

Chief Editor

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

Chief Editor

सतत बत्तीस दिवस ‘कृष्णाकाठ’चे अभिवाचन करुन यशवंतराव चव्हाण यांना अनोखे अभिवादन!

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

बालकलाकारांच्या अदाकारीने रंगले स्नेहसंमेलन

Chief Editor

बोधिसत्त्व नगर वाडी बुद्रुक येथे माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने अजय वसंतराव गव्हाणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

Leave a Comment