ताज्या घडामोडी

विखंडित राष्ट्रके असलेल्या भारताला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक राष्ट्र म्हणून उभे केले- प्रा. श्याम मुडे

सोनखेड (वार्ताहर) दि.२१- स्वातंत्र्यपूर्व भारत अनेक राष्ट्रकात विखंडित होता. भारतात जवळपास अडीच हजार संस्थानिक,राजे- महाराजे , जहागिरदार, वतनदार राज्य करत होती. ते स्वत:ला राजे व आपल्या वतनाला स्वतंत्र देश समजत होते ,त्यांचे स्वतःचे वेगवेगळे राज्य होती. हे सर्व राजे- महाराजे आपापले अस्तित्व नि अस्मितेसाठी आपापसांत लढत होते. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उपखंडात राष्ट्र नावाची संकल्पना अस्तित्वात नव्हती. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यातून आणि लेखणीतून सर्वार्थाने अनेकात्म असलेल्या भारतीय जनमानसांत राज्य, राष्ट्र आणि राष्ट्रवाद वगैरे संकल्पनेची वैचारिक पेरणी करत अनेक राष्ट्रकात विखंडित असलेल्या भारताला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात एक राष्ट्र म्हणून उभे केले, असे प्रतिपादन प्रा. श्याम मुडे यांनी केले. ते लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला निमित्त आयोजित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर काल, आज आणि उद्या” या विषयावर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्रीनिवास मोरे पं. स. सदस्य, लोहा, मा. अच्युत शंकरराव मोरे माजी सरपंच मौ. सोनखेड, मा. प्रकाशराव मोरे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष, लोहा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कु. शितळे शितल यांच्या सुमधुर स्वागत व प्रार्थना गीताने झाली. तद्नंतर मान्यवरांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रंथालय चळवळीतील विशेष योगदानाबद्दल ग्रंथपाल डॉ. गोविंद घोगरे यांचा डॉ. राजपालसिंह चिखलीकर, डॉ.आशा धुमाळ यांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर मा. गणपतराव मोरे यांनी सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन तर प्रास्ताविक डॉ. आर. डी. शिंदे समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला यांनी केले. यावेळी पुढे बोलताना प्रा. श्याम मुडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासारख्या विविध जाती आणि धर्माने नटलेल्या अनेकात्म समाजाला संविधानाद्वारे ‘राष्ट्र’ नावाच्या एका सुंदर माळेत गुंफले. ब्राह्मणांसह सर्वच जाती-धर्मातील लोकांच्या विकासासाठी आवश्यक असलेले धोरण, तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम दिला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले धोरण, तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम हाच या देशाचा मुख्य अजेंडा असणे अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने तसेच झाले नाही. त्यामुळेच देश अनेकांगी प्रश्नाने हेलकावे खात आहे. वर्तमान काळात जातीय आणि धार्मिक उन्मादाचा ज्वर इतका चरम सीमेला पोहोचला आहे की, देश पुन्हा एकदा अनेक राष्ट्रकांत विभाजित होतो की काय ? अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. देश हिटलरशाहीकडे वाटचाल करतो आहे, हे निश्चितच भारताच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने उचित नाही. स्वातंत्र्याच्या अमृत्तकालाची यशोगाथा सुरक्षित ठेवायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय
गत्यंतर नाही,असे आवाहनही प्रा. श्याम मुडे यांनी उपस्थितांना केले. प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे यांनीही आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्यावर समर्पकपणे विचार मांडले. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोविंद घोगरे यांनी तर आभार डॉ. सूर्यकांत शिंदे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.