यशवंत महाविद्यालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त विशेष व्याख्यान संपन्न

नांदेड:( दि.१ मार्च २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक कर्करोग दिनानिमित्त ‘कर्करोगाचे प्रकार, लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार’ या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य जनजागृतीसाठी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी भूषविले. याप्रसंगी विचारमंचावर प्रमुख अतिथी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथील शल्यचिकित्साशास्त्र विभागातील वरिष्ठ निवासी सर्जन डॉ.रागिणी मिटके, डॉ. फरीहा, डॉ.शुभांगी सक्सेना, डॉ.विजय, देवेंद्र जोग, आयोजक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय नंनवरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजनाने झाला. डॉ. संजय नंनवरे यांनी प्रास्ताविकात कर्करोग दिनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, कर्करोग ही एक गंभीर समस्या बनली आहे आणि बदलती जीवनशैली, भेसळयुक्त आहार, व्यसन यामुळे कर्करोगाचे रुग्ण वाढले आहेत. तंत्रज्ञानात प्रगती झाल्यामुळे कर्करोगावर उपचारांची संख्या वाढली असली तरी, त्याच्या प्रतिबंधासाठी जागरूकता अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना कर्करोगाची वेळेवर ओळख, उपचार आणि प्रतिबंध याबद्दल माहिती मिळविण्याचे महत्त्व सांगितले तसेच पर्यावरण,जीवनशैली,आहार आणि मानसिक तणाव यांचा कर्करोगावर थेट प्रभाव होतो, असेही नमूद केले.
कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट तरुणांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे, जीवनशैलीतील योग्य बदल आणि कर्करोग प्रतिबंधक उपायांबद्दल माहिती देणे होते.
उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतात, कर्करोगाच्या गंभीरतेवर आणि त्याच्या प्रतिबंधावर विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना कर्करोगाची लवकर ओळख, नियमित तपासणी आणि योग्य उपचार घेण्याचे महत्त्व सांगितले तसेच निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि शारीरिक सक्रियता कर्करोगाच्या प्रतिबंधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, हे विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांना कर्करोगाच्या कारणांबद्दल जागरूक होण्याचे आणि त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख अतिथी डॉ. रागिनी मिटके यांनी ‘कर्करोग: विविध प्रकार, लक्षणे, प्रतिबंध, उपचार आणि व्यवस्थापन’ या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल आणि माहितीपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी सादर केलेल्या पावर पॉइंट सादरीकरणात कर्करोगाच्या विविध प्रकारांबद्दल, जसे की त्वचा, फुफ्फुस, स्तन, पचनसंस्था इ. बाबींची, सखोल चर्चा केली आणि प्रत्येक प्रकाराचे लक्षणे व उपचार कसे असतात, हे सविस्तर सांगितले. त्यांनी कर्करोगाच्या मुख्य कारणांमध्ये अस्वास्थ्यकर जीवनशैली, तंबाखू सेवन, मद्यपान, जंक फूड, अनुवांशिक घटक, पर्यावरणीय घटक आणि संक्रमणांचा समावेश केला. कर्करोगाच्या लक्षणांबद्दल माहिती देताना असामान्य वजन कमी होणे, रक्ताच्या व्रणातून रक्तस्राव होणे, तासक्यात बदल, शारीरिक वेदना किंवा सूज येणे यांसारखी लक्षणे कर्करोगाच्या संकेतांचा भाग आहेत, असे स्पष्ट केले. भारतामध्ये कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे, विशेषतः स्त्रियांमध्ये स्तन कर्करोग आणि पुरुषांमध्ये तंबाखूच्या सेवनामुळे होणारा तोंड किंवा गळा कर्करोग हे प्रमुख प्रकार आहेत. कर्करोगापासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सुचविले. त्यात तंबाखू आणि मद्यपानाचा त्याग करणे, नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, वजनावर नियंत्रण ठेवणे आणि मानसिक आरोग्याचे संरक्षण करणे यांचा समावेश आहे.
कर्करोगाच्या लवकर ओळख आणि उपचारासाठी वेळेवर तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. शस्त्रक्रिया, कीमोथेरेपी, रेडिओथेरपी आणि इम्यूनोथेरपी यांसारख्या उपचार पद्धती कर्करोगावर प्रभावीपणे काम करतात. त्यांनी व्याख्यानात प्रमुख संदेश दिला की, कर्करोगावर मात करणे शक्य आहे, परंतु त्यासाठी प्रबोधन, लवकर निदान आणि योग्य उपचार महत्त्वाचे आहेत. कर्करोगापासून बचाव करणे हे प्रत्येकाच्या हातात आहे, फक्त योग्य जीवनशैली आणि नियमित तपासणी आवश्यक आहे.
शेवटी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रात मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत प्रमुख व्याख्यात्यांनी त्यांच्या शंकांचे निराकरण केले.
सूत्रसंचालन डॉ.दिप्ती तोटावार, प्रा. नारायण गव्हाणे यांनी पाहुण्यांचा परिचय आणि प्रा. साहेबराव माने यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एच.एल. तमलुरकर, डॉ. एम.एस. कदम, डॉ.एन.आर. जैस्वाल, डॉ. डी.बी. भुरे, डॉ. बी. बालाजीराव, शंकर मिरेवाड, परमेश्वर राठोड यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील,अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डॉ.शिवराज बोकडे, डॉ. अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि संशोधकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.