ताज्या घडामोडी

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने..

28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात साजरा केला जातो.भारतीय शास्त्रज्ञ डॉ सी व्ही रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी लावलेल्या रामन परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. या विषयी माहिती देणारा हा लेख… .

भारत हा नवोन्मेषकांचा देश आहे. भारतात अनेक प्रतिभावान लोक आहेत. भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारताला अविकसित राष्ट्राकडून एका विकसनशील अशा राष्ट्राकडे नेलेले आहे.शून्याचा शोध लावणाऱ्या आर्यभट्टांपासून ते पायचे मूल्य मोजण्याचे सूत्र शोधणाऱ्या रामानुजमपर्यंत अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक क्रांती केलेली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे क्षेपणास्त्र पुरुष म्हणून ओळखले जाते. सुपर कम्प्युटरचे निर्माते डॉ विजय भटकर यांना भारतीय संगणक क्रांतीचे जनक मानले जाते.श्री सतीश धवन हे भारतीय रॉकेट शास्त्रज्ञ आणि अवकाश शास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध आहेत. इस्रोचे संचालक के शिवन यांनी भारतीय अंतराळ क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेले आहे.श्री अजय भट्ट हे एक संगणक आर्किटेक्ट आहेत ज्यांना यूएसबी चे सह-शोधक म्हणूनही ओळखले जाते.भारताच्या हरित क्रांतीमध्ये डॉ. बी पी पाल, डॉ स्वामीनाथन यांचे प्रमुख योगदान आहे. श्री जयंत नारळीकर हे एक भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ आहेत तर अनिल काकोडकर हे एक भारतीय अणु भौतिकशास्त्रज्ञ आहेत. अशा एक ना अनेक शास्त्रज्ञांनी आपल्या भारत देशात वैज्ञानिक क्रांती घडवलेली आहे.

विद्यार्थ्यांना विज्ञानात आवड निर्माण करणे आणि या क्षेत्रातील संशोधकांचा सन्मान करणे व विद्यार्थ्यांना नवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरित करणे तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील घडामोडीं ची माहिती देणे हा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा उद्देश आहे. दरवर्षी या दिवशी भारत सरकार च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विविध क्षेत्रांतील शास्त्रज्ञांचा त्यांच्या विज्ञानातील असाधारण अशा योगदानाबद्दल सत्कार करण्यात येतो.राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्ट लोकांमध्ये जीवनातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.

भारतीय शास्त्रज्ञ डॉ सी व्ही रामन यांना रामन इफेक्ट नावाच्या प्रकाश विखुरण्याच्या अभ्यासातील योगदानाबद्दल 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे.रामन परिणाम हे जेव्हा प्रकाश पारदर्शक माध्यमामधून जातो तेव्हा त्याचे किरण विखुरण्याची क्रिया होते. प्रकाशाचे किरण ज्या पद्धतीने विखुरतात त्या प्रक्रियेला ‘रमन इफेक्ट ‘असे म्हटले जाते. लॅब मध्ये जेव्हा या इफेक्टचा वापर काही संशोधनात केला जातो, तेव्हा या प्रक्रियेला ‘रामन स्पेक्ट्रोस्कोपी’ असे म्हणतात. याचा वापर शास्त्रज्ञ रसायनशास्त्रात आणि भौतिकशास्त्रात पदार्थाचे विश्लेषण करण्यासाठी करतात. ‘रामन स्पेक्ट्रोस्कोपी हे पर्यावरणीय आणि पर्यावरणविषयक अभ्यासातील एक प्रमुख संशोधन साधन आहे.

दरवर्षी भारत सरकार तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक थीम ठरवली जाते व त्या अंतर्गत वर्षभर संशोधन क्षेत्रातील वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. राष्ट्रीय विज्ञान दिन 2025 ची थीम आहे “विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोपक्रमातील जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांना सक्षम बनवणे.” भारतातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि संशोधन संस्था विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि वैज्ञानिक प्रगतीमध्ये रस निर्माण करण्यासाठी विज्ञानातील वेगवेगळ्या विषयावरील निबंध लेखन, भाषण स्पर्धा, प्रदर्शने, संशोधकांची व्याख्याने यासारखे विविध उपक्रम आयोजित करतात. वेगवेगळ्या संशोधन संस्था त्यांनी केलेल्या कामाचे प्रदर्शन आयोजित करतात.

विज्ञानामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक भौतिक सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. विज्ञानामुळेच मानवाचे राहणीमान सुधारलेले आहे.आरोग्य सुधारले आहे व आयुष्य वाढलेले आहे. असाध्य अशा रोगांवर सुद्धा विज्ञानाच्या क्रांतीने उपाय शोधलेले आहेत.नुकत्याच झालेल्या कोरोना महामारीवर सुद्धा आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेली लस सपूर्ण जगातील लोकांसाठी उपयुक्त ठरली.मानवाची जाणून घेण्याची जिज्ञासा, कुतूहलामुळेच विज्ञान व नवनवीन आविष्कार निर्माण होतात आणि हेच कुतूहल मानवाची सर्वात महत्त्वाची क्षमता आहे. ही क्षमता आपणास आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यास उपयुक्त ठरते.

तर दुसरीकडे मानवाची वैज्ञानिक प्रगती आणि विज्ञानाच्या निर्माण केलेल्या सुविधांच्या चुकीच्या आणि अती वापरामुळे ‘ग्लोबल वार्मिंग’ सारखे संकट निर्माण झाले आहे. प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ निर्माण झालेली आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. या अशा प्रकारच्या व हवामान बदलाच्या समस्यांवर एकमेव संभाव्य उपाय म्हणजे विज्ञान आणि वैज्ञानिक प्रगती हाच आहे. विज्ञान हे ज्ञानाचे आणि प्रगतीचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे . वैज्ञानिक प्रगतीतच आपल्या समाजाच्या हितासाठी अनेक उपाय दडलेले आहेत. म्हणून आपण सर्वांनी विज्ञानाकडे संशोधक वृत्तीने, प्रगतीच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने पहिले पाहिजे व त्या दृष्टीने सर्वांनी कार्यरत राहणे आवश्यक आहे. सर्वांना, राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा……

*प्रा डॉ विजय भोसले* , रसायनशास्त्र विभाग,यशवंत महाविद्यालय, नांदेड.
दूरध्वनी 940 306 72 52

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.