आधुनिक माध्यमाचा वापर केल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो – प्रा. राहुल पुंडगे

——————————————–
उदगीर:- सध्याच्या शिक्षण पद्धतीत आधुनिक माध्यमांचा वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवात सुधारणा होत असताना दिसून येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा देखील विकास होत आहे. सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे.एखादी घटना घडली तर अगदी काही क्षणात आपल्या पर्यंत कशी पोहचेल अशी साधने आज उपलब्ध आहेत आणि ही साधने अतिशय लोकप्रिय असल्यामुळे विद्यार्थी याकडे लवकर आकर्षित होत आहे. माध्यमाचा वापर केल्याने कधी काळी रटाळ व अवघड वाटणारा अभ्यास दृकश्राव्य पद्धतीने सोपा होत असल्याचे चित्र दिसून येते. माध्यमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात आवड असेल तर त्यात त्याला सक्रिय सहभाग घेता येतो. यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल गांधी यांनी केले.
येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना
(एन.एस.एस) विभागाच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान मौजे देवर्जन (हत्तीबेट) ता. उदगीर जि.लातूर येथे विशेष वार्षिक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात बौद्धिक सत्रात शिक्षणात आधुनिक माध्यमाचे महत्व या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, प्रा. राशिद दाईमी, रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे, प्रसाद कोंडावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रा. पुंडगे म्हणाले की, मास मीडियामुळे विद्यार्थ्याच्या कल्पना स्पष्ट होतात आणि योग्य ज्ञान मिळते. तसेच
मास मीडिया हा मिळणाऱ्या सूचनांना ठोस बनवतात आणि गोष्टींमध्ये रस आणि कुतूहल जागृत करतात. यात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम,ब्लॉग, यूट्यूब, झूम चॅट, शेअर चॅट हे माध्यम लोकप्रिय आहेत. विविध रिअ च्या माध्यमातून तुम्ही तुमचे कौशल्य विकसित करू शकता. त्यांमुळे आधुनिक शिक्षण व्यवस्था पारंपरिक शिक्षणाच्या तुलनेत अधिक लवचिक आणि सोयीस्कर बनली आहे. लॉगडाउन च्या काळात या माध्यमानी आपली विश्वासाहर्ता सिद्ध केली.परंतु जसे या माध्यमाचे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे यांनी केले तर सूत्रसंचलन सुयश स्वामी व आभार परमेश्वर पाटील यांनी मानले. यावेळी रासेयो चे स्वयसेवक उपस्थित होते.