ताज्या घडामोडी

स्वर परमेश्वर: लता मंगेशकर: डॉ. विजय भोसले

संगीत ही ईश्वराने मनुष्याला दिलेली एक अपार, अनमोल, अलौकिक अशी देणगी आहे. संगीत ऐकल्याने मन प्रसन्न होते, कान तृप्त होतात,संगीतामुळे मनुष्याला मानसिक स्वास्थ लाभते. संगीत कला ही सर्व कलांमध्ये सर्व श्रेष्ठ कला मानली जाते.मनुष्य आपल्या भावना संगीतातून व्यक्त करू शकतो.आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा संगीतातील शब्द समजतो व जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा संगीतातील शब्दांचा अर्थ समजतो.संगीत आपल्या आयुष्याला प्रेरणा देते.संगीताशिवाय आयुष्य अतिशय निरस, कोरडे, शुष्क वाटते. थोडक्यात काय तर संगीत म्हणजे जीवन.संगीत ही देवभाषा आहे.संगीत म्हणजेच ईश्वर.आत्मा आणि परमात्मा याचा मिलन म्हणजे संगीत. संगीताला कोणतीही जात नाही, कोणताही धर्म नाही, कोणताही वर्ण नाही,कोणताही देश नाही.भारतीय संगीताला संपूर्ण जगामध्ये एक वेगळे असे आढळ स्थान आहे.याची श्रेय जाते भारताची गाणंकोकिळा,स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना.

आचार्य प्र के अत्रे लतादीदी बद्दल बोलताना म्हणाले होते, *” लताच्या कंठातील अलौकिक कोमलतेला साजेस अभिवादन करायचं असेल तर त्यासाठी प्रभातकाळाची कोवळी सुवर्ण किरण, दवबिंदूमध्ये भिजवून बनविलेल्या शाईने, कमलतंतुच्या लेखणीने आणि वायुलहरीच्या हलक्या हाताने, फुलपाखरांच्या पंखावर लिहिलेला मानपत्रच गुलाबकळीच्या करंहकातून तिला अर्पण करायला हवं. लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनिसृष्टीतील एक अद्भुत चमत्कार आहे. सरस्वतीच्या विनेचा झंकार उर्वशीच्या नुपुरांची रुणझुन आणि श्री कृष्णाच्या मुरलीची साद हे सर्व एकवटून विधात्यांन लताचा कंठ घडविला असला पाहिजे.*

**हे सरता सरत नाही चांदणे तुझ्या स्वरांचे !*
आजच्या या काळात आपण पाहतो जे आहे ते तर दाखवायचेच;पण आपल्यात जे नाही, त्याचा सुद्धा खुला बाजार मांडायचा असा हा आजचा काळ.दुर्दैवाने या वृत्तीने आता कलेचा प्रांतही काळवंडला आहे.
‘ *Picture of Dorean Grey’*
या आपल्या कादंबरीच्या प्रस्तावनेत ऑस्कर्ड वाईल्ड यांनी कले बद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे.ते म्हणतात
” *To reveal art and conceal the artist. This is Art’s aim.”*
हे वाचायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच आचरणात आणणे ही अवघड आहे.कला प्रगट व्हायला हवी व कलाकार अदृश्य हवा.ही गोष्ट एवढी सोपी नाही.याला खूप मोठी तपस्या लागते. याला खूप मोठा त्याग लागतो.या तपस्येचं,या त्यागाच मूर्तिमंत रूप म्हणजे गानसरस्वती लतादीदी मंगेशकर l.

लता मंगेशकर कशा दिसायच्या हे त्या काळात व आजही लाखो लोकांना माहिती नाही आपण सतत लोकांना दिसत राहावे असं कधी त्यांना वाटलं ही नाही की अशी कांक्षा त्यांनी बाळगली नाही.पण, संपूर्ण आयुष्यात ज्याने त्यांना फोटोतहि पाहिलं नाही अशी असंख्य माणसे त्यांच्या स्वरांच्या चांदण्यात चिंब भिजलेली आहेत असं मला वाटतं. मीही असाच लतादीदींचा चाहता असून त्यांच्या स्वरांच्या चांदण्यात आकंठ बुडालेला एक निस्सीम भक्त आहे. लता दीदी नावाच्या माझ्या संगीत रुपी परमेश्वरा प्रति मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा येथे प्रयत्न करत आहे.

भारतातील एकही मनुष्य असा नसावा ज्याने एकदा तरी लतादीदींचा आवाज ऐकला नसेल.भारतात बारा महिने ,चोवीस तास,प्रत्येक वेळी, प्रत्येक मिनिटाला,प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक क्षणाला लता मंगेशकर चा आवाज हा कुठ न कुठ, कोणाचे ना कोणाचे कान तृप्त करत असतोच.

*भारतातील कोणत्याही वृत्तपत्राने,कोणत्याही टीव्ही चॅनल ने किंवा कुठल्याही स्पर्धा आयोजकाने जर लोकप्रियतेची स्पर्धा आयोजित केली असती व त्यात जर लता मंगेशकर यांचे नाव असते तर लता मंगेशकर यांचं नाव सर्वप्रथम म्हणून घोषित झाले असते यात तीळमात्र शंका नाही.*

मंगेशकरांचे मूळ आडनाव हर्डीकर. हे कुटुंब पुजारी होते म्हणून त्यांना अभिषेकी असे म्हटले जायचे . त्यांचे मुळगाव गोव्यातील मंगेशी व त्यांचे आराध्य दैवत श्री मंगेश. मंगेश याचेच आपण हात आहोत असे मानून त्यांनी हात (कर) म्हणजेच मंगेशकर हे आडनाव धारण केले.
गणेशभट्ट अभिषेकी व येसूबाई यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे मास्टर दिनानाथ अभिषेकी.गणेशभट्ट हे त्या काळातील निष्णात असे फर्डे वक्ते होते तर येसूबाई या उत्तम गायिका होत्या.त्यांनीच आपले चिरंजीव दिनानाथ यांना संगीताची शिकवण देण्याचे ठरवले.त्यासाठी त्या काळात दीनानाथ ला संगीत शिकवणी साठी दरारोज पाच मैल पायी घेऊन जात व येथून दीनानाथांचा संगीत प्रवास सुरू झाला.

स्वाभिमान हे दीनानाथांच खास वैशिष्ट्य.ते नेहमी मनत *मी कर्मानं ब्राह्मण असलो तरी जन्माने ब्राह्मण व मराठा दोन्हीही आहे.* याचे कारण म्हणजे येसूबाई ह्या मराठा होत्या. त्या माहेरच्या येसूबाई राणे होत्या. एकोणिसाव्या शतकात संगीत क्षेत्रातील बहुदा हा पहिलाच आंतरजातीय विवाह असावा.खानदेशातील थाळनेर येथील श्रीमंत सावकार व जमीनदार सेठ हरिदास रामदास लाड गुजराथी यांची मोठी मुलगी नर्मदा हिच्याशी मास्टर दिनानाथांचे पहिले लग्न झाले.हाही विसाव्या शतकाच्या तिसऱ्या शतकातील कर्मठ भारतीय समाजात आंतरप्रांतीय पहिलाच विवाह झाला असावा. परंतु लग्नाच्या चार वर्षानंतर बाळंतपणात नर्मदेचा मृत्यू झाला. त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले.ती मुलगी हि लवकरच मृत्यू पावली.त्यानंतर 1927 ला नर्मदेची छोटी बहीण शेवंता हिच्याशी मास्टर दिनानाथांचा दुसरा विवाह झाला. शेवंता म्हणजेच श्रीमंती,शुद्धीमती व नंतर त्याच माई मंगेशकर म्हणून प्रचलित झाल्या.

*28 सप्टेंबर 1929 रोजी रात्री साडेदहा वाजता गायक मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी श्रीमंती माई मंगेशकर यांनी कन्यारत्नाला जन्म दिला.* तो वार होता शनिवार. इंदूरच्या शिख वस्तीमध्ये लतादीदींचा जन्म झाला. लतादीदींच जन्म नाव ह्रदया असं होतं.काही दिवस तेच नाव प्रचलित राहिलं,त्यानंतर मग त्यांचं नाव हेमा हे ठेवण्यात आलं व शेवटी लता हे नाव त्यांना देण्यात आलं.

लतादीदींच्या जन्मानंतर दीनानाथ मंगेशकर हे चांगले गायक व चांगले नट म्हणून ख्याती प्राप्त झाले. या यशाचे श्रेय ते लतादीदींना देतात.तिच्याच पायगुणामुळेच आपल्याला लक्ष्मी प्रसन्न झाली,अशी दीनानाथांची श्रद्धा होती. वडिलांच्या संगीताचा रियाज लता अगदी लहानपणीच मन लावून ऐकायची व त्यांचे बोल आपल्या वाणीने पुन्हा गुणगुणायची. अतिशय लहान असलेल्या लताची स्मरणशक्ती अतिशय थक्क करणारी होती.एकदा जे ऐकलं की ते ध्यानात ठेवायचं हा लताला मिळालेला दैवी आशीर्वादच होता. एकदा दीनानाथ आपल्या शिष्याला गाणं शिकवत होते.लता दीदी तेव्हा पाच वर्षाची होती. शिष्याला गायला सांगून ते थोडंसं बाहेर गेले. तो शिष्य पुरीया धनश्री हा राग आळवीत होता. पण तो राग वेळोवेळी चुकवीत होता.लता तेथे खेळत होती .लताने आपला खेळ मध्येच थांबवला व ती म्हणाली हे असं नाही असं गायचं व तिने तो राग गाऊन दाखविला. तेवढ्यात मा दीनानाथ बाहेरून आले व त्यांनी लताला गाताना ऐकलं.त्यांचा स्वतःच्या कानावर ,स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. दीनानाथांना हा दैवी चमत्कार वाटला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता त्यांनी लताला त्याच रागापासून संगीत शिकवणीस प्रारंभ केला.हा संध्याकाळी गायनाचा राग होता.त्यांनी लताच्या हातामध्ये तानपुरा दिला व अशाप्रकारे लताचा सांगितिक जीवनाची सुरुवात झाली.
यानंतर काही दिवसात लताला देवी आल्या होत्या. देवी नावाचा एक आजार त्या काळी होता. लताच्या पूर्ण शरीरावर खूप जास्त प्रमाणात देवी आल्या होत्या. देवी आल्यावर त्या मनुष्याला अपंग करत असत किंवा एखादा अवयव निकामी करत असत.त्यामध्ये बहुदा कान, डोळे किंवा आवाज जाई. परंतु लताच्या सुदैवाने तिचा यातील कुठलाही अवयव खराब झाला नाही. तीन महिने देवीच्या पूर्ण शरीरावर झालेला आजार असूनही डोळे, कान व आवाज शाबूत राहिले.फक्त लता दीदीच्या चेहऱ्यावर व्रण तेवढे राहिले. गोरी असलेली लता थोडीशी गव्हाळ दिसू लागली.वयाच्या सहाव्या वर्षी लताने तिच्या बाबांसोबत ‘ *चंडीदास* ‘ हा के एल सेहगल यांचा पहिला चित्रपट पाहिला. त्यांना तो खूप आवडला व घरी आल्यावर ती म्हणाली मी मोठी झाल्यावर के एल सेहगल यांच्याशीच लग्न करणार .लता ही तिच्या बाबांची अतिशय लाडकी होती.ती रोज तिच्या बाबांसोबत नाटकात जाऊ लागली.त्यानंतर छोटे-मोठे काम करू लागली. एके दिवशी *सौभद्र* या नाटकाच्या वेळी अचानक नाटकातील नारदाची भूमिका करणारा नट आजारी पडला.तेव्हा लतादीदी वडिलांना म्हणाली मी करेल नारदाची भूमिका. या नाटकात अर्जुन छत्तीस वर्षाचा व नारद सात वर्षाचा.पण नारदाचं गाणं ऐकून सर्व श्रोते दंग झाले, लताचे वय विसरले व सर्वजण लतामय झाले. त्यानंतर मास्टर दीनाथांनी लता दीदी साठी ‘ *गुरुकुल* ‘नावाचं नाटक लिहून घेतलं. त्यामध्ये लता श्रीकृष्ण तर छोटी बहीण मीना सुदामा झाली होती.लहान मोठ्या कार्यक्रमात लता आपल्या वडिलांसोबत गायनात भाग घेऊ लागली. ‘ *मानापमान* ‘ या नाटकातील ‘ **शुरा मी वंदिते.. . ** हे लोकप्रिय गीत लताने गायले आहे.
लता ही व्यवसायिक गायिका व्हावं असं तिच्या वडिलांची इच्छा नव्हती. लतादीदी फक्त एक दिवस सांगलीच्या शाळेत गेली.शाळेत जाताना आपली रडणारी छोटी बहीण आशा हिला कडेवर घेऊन शाळेत गेली. शिक्षक तिच्यावर रागावले त्यामुळे लता नाराज झाली. हा अपमान समजून यापुढे आपण कधीच शाळेत जाणार नाही अशी तिने शपथ घेतली. विठ्ठल नावाच्या एका नोकराने लताला बाराखडी शिकवली. हेच काय ते लतादीदी चे शिक्षण. या काळात पंडित दीनानाथ मंगेशकर यशोशिखरावर गेले होते.त्यांच्याकडे अनेक लोक काम करायची, भरपूर पैसा आला. स्वतःचे नाटक कंपनी होती .सर्व आनंदात चालले होते. परंतु, नंतर काही काळानंतर व्यसनामुळे दीनानाथ मंगेशकर तीव्र वेगाने अधोगतीला पोहोचले, नाटक कंपनी बंद झाली, ते कर्जबाजारी झाले.शेवटी ते आजारी पडले व वयाच्या 42 व्या वर्षी म्हणजेच 24 एप्रिल 1942 ला त्यांच निधन झालं.यावेळी माई मंगेशकर अवघ्या 32 वर्षाच्या होत्या तर लतादीदी 13 वर्षाच्या होत्या. मंगेशकर कुटुंब पुन्हा एकदा ऐश्वर्यातून दारिद्र्यात आले. दीनानाथ मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला त्यावेळी फक्त सहा लोक उपस्थित होते.रक्ताच्या कुठल्याही नातेवाईकांनी त्यांना मदत केली नाही.कोणीही त्यांच्याकडे फिरकला सुद्धा नाही व इथूनच तेरा वर्षाच्या लतादीदी च्या अंगावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली.
पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ लतादीदींन *पी सावळाराम* यांच्याकडून एक गीत लिहून घेतले होते. ते गीत असे होते.

*”कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला ,वैभवाने भरून आला याल का हो बघायला ?* हे गीत पी सावळाराम यांनी केवळ लतादीदींसाठी लिहीले होते .हे गीत लतादीदींने ज्या तन्मयतेने आणि अर्थ अर्तेतेने गायलं होतं ती एकरूपता तिच्यात काय पण अन्य कोणत्याही गायक गायकीच्या गाण्यात क्वचितच आली असेल.गीतांच्या शेवटच्या ओळी अशा होत्या ” *पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात, पाठीवरी फिरवा हात,या हो बाबा एकच वेळा… या हो बाबा* एकच वेळा या ओळी लता दिदीने म्हटल्या व शेवटची बाबा.. अशी अर्त हक जेव्हा त्यांनी मारली तेव्हा त्या जमिनीवर धाडदीशी कोसळल्या. हे गीत अतिशय लोकप्रिय झाले.

आता यानंतर प्रश्न लताच्या संगीताचा नव्हता तर आपली चार भावंड मीना,आशा,उषा, हृदयनाथ आणि आई माई मंगेशकर अशा सहा तोंडांसाठी अन्न आणायचा होता. याकाळात अभिनेत्री नंदाचे वडील विनायक कर्नाटकी यांनी मंगेशकर कुटुंबाला मदत केली. लताने मग ‘ *पहिली मंगळागौर’* या पहिल्या चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांनी *माझं बाळ, चिमुकला संसार ,गजाभाऊ, बडी मा, सुभद्रा,जीवन यात्रा, मंदिर ,छत्रपती शिवाजी आदी चित्रपटात* इच्छा नसतानाही काम केले.मराठी चित्रपटातील पहिलं गाणं ‘ *नटली चैत्राची नवलाई…* हे त्यांनी 1942 मध्ये ‘ *किती हसाल’* या चित्रपटासाठी गायलं.परंतु हे गाणे चित्रपटात न ठेवता ते काढून टाकण्यात आले. मग 1943 ला लतादीदींनी आपलं पहिलं हिंदी गीत ‘ गजाभाऊ या मराठी चित्रपटात गायलं .ते गीत होते ‘ *माता एक सपूत की दुनिया बदलते तो….*

लतादीदी मग *नवयुग* या कंपनीत काम करू लागल्या .1946 ला लता दीदी आपल्या संपूर्ण कुटुंबासह कोल्हापूरला गेल्या व इथून मंगेशकर कुटुंबाच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली. येथेच लतादीदीची व त्यावेळची प्रख्यात गायिका नुरजहा यांची पहिली भेट झाली व त्याच रूपांतर नंतर मैत्रीत झाले. *नूरजहा लताच्या गायनाची मुक्त कंठाने प्रशंशा करायची. ‘*
*प्रफुल्ल पिक्चर्स* ‘या कंपनीमध्ये तेव्हा लतादीदी काम करू लागल्या .दरमहा 80 रुपये वेतनावर त्यांना काम मिळाले. 1945 ला लता दीदी मुंबईला आल्या.’ आपकी सेवा मे’ या पहिल्या हिंदी चित्रपटात त्यांनी आपलं गीत गायल. ते गीत होतं ‘ *पा लागू करजोरी रे शाम मोसे ना खेलो होरी…’* यानंतर अचानक एका दिवशी लतादीदींचे भेट प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदरशी झाली. लतादीदी अकरा वर्षाची असताना त्यांनी एका ‘खनिजाची’स्पर्धेत गायनामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. तेव्हा परीक्षक म्हणून गुलाम हैदर हे होते .त्यांच्या हस्ते लतादीदीचा सत्कार झाला होता. दीदींनी त्यांना त्या प्रसंगाची आठवण करून दिली.या गोष्टीला सहा वर्षे झाली होती. गुलाम हैदर यांनी लता दीदीला शहीद चित्रपटातील गाण्यासाठी बोलावले पण शहीद चे निर्माते व फिल्मिस्तान कंपनीचे मालक शशिधर मुखर्जी यांना लताचा आवाज बिलकुल आवडला नाही. तो फारच कवळा आवाज होता. एखाद्या लहान मुलीचा असावा तसा बारीक, चिरोटा आवाज त्यांना वाटला. मग गुलाम हैदर यांनी लताला बॉम्बे टॉकीज इथे बोलावले व तेथे त्यांनी ‘ *पिया मिलने को मै तो जीती हू तेरे भरोसे पिया…’* हे गाणं गाऊन घेण्याचे ठरवले. ह्या गाण्याचे त्या रात्री *32 टेक* झाले व ते गाणे ठरले. मजबूर चित्रपटाचे संगीतही हिट झालं आणि *या चित्रपटातील आठ पैकी सात गाणी लतादीदींनी गायली* . लतादीदींच्या आयुष्यातील हा योग तिला एका नवीन पूर्वाकडे घेऊन गेला.

*मजबूर नंतर मग अनोखा प्यार,गजरे,दीदी, हिर-रांझा,जिद्दी* असे काही चित्रपट तिला मिळाले.जिद्दीतील ‘ *चंदा रे जा रे जा रे पिया से संदेशा मेरा कही हो जाये ..’* या गाण्याने तिला नाव मिळालं. 1949 मधील ‘ *महाल* ‘ या चित्रपटातील त्याकाळची सुप्रसिद्ध व सुंदर अभिनेत्री असलेली मधुबालावर चित्रित केलेले ‘ *आयेगा आनेवाला आयेगा…’ या गाण्याने लतादीदीची खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीतील यशस्वी सुरुवात झाली.* हे गाणं एवढं प्रसिद्ध झालं की लोक शेकडो वेळा ते गाणं फर्माईश करून रेडिओ वर ऐकत.त्या काळात गायक किंवा गायिकेचं नाव म्युझिक रेकॉर्डवर लिहिलं जात नसे. लोकांनी रेडिओवर अनेक वेळा गायिकेचं नाव विचारलं व शेवटी *भारतीय चित्रपट संगीतात पहिल्यांदाच एखाद्या गायकाचे किंवा गायिकेचं नाव म्युझिक रेकॉर्डवर लिहिण्याची सुरुवात झाली.* या गाण्यानंतर लताने पुन्हा कधीही मागे फिरून पाहिले नाही. *हिंदी चित्रपट सृष्टीत रॉयल्टी घेणाऱ्या लता मंगेशकर या पहिल्या गायिका होत.*

*आयेगा आनेवाला* च्या अभूतपूर्व यशानंतर इतर अनेक संगीतकारांचेही लतादीदी कडे लक्ष गेलं. त्यावेळचे प्रख्यात संगीतकार नौशाद यांनी लताला गाणं द्यायचा विचार केला व त्यांनी लताला गायनासाठी गाणे दिले.त्यावेळची सुप्रसिद्धी गायिका सुरैयाला तिचा मत्सर वाटला. सुरैया नौशादला म्हणाली,ही हिंदू मुलगी त्यातून मराठी बोलणारी उर्दू जबान तिला कशी जमणार. पण नौशादने लतादींना गाणी दिली व ती गाणी हिट झाली.एके दिवशी संगीतकार अनिल विश्वास व लतादीदी रेल्वेने गोरेगाव येथे फिल्मीस्थान स्टुडिओ ला जात असताना रेल्वेच्या त्याच डब्यात दिलीप कुमार शी भेट झाली. दिलीप कुमारच आणि अनिल विश्वास यांचे बोलणे झाले.नंतर मग अनिल विश्वास यांनी लता दीदी मंगेशकर या नव्या गायकीची ओळख करून देताना मुक्त कंठाने प्रशंसा केली. तेव्हा *दिलीप कुमार यांनी त्या सावळ्या मुलीला न्याहाळले व म्हणाले तुम्ही मराठी ना मग बाकी सारं ठीक आहे परंतु या मराठी मुलीच्या उर्दूला नेहमी डाळ- भाताचा वास येतो.लता दिदिंना हा उपहास बोचला* आणि त्यांना खूप राग आला.परंतु त्यांनी यातुन योग्य तो बोध घेतला .
लतादीदींनी लगेचच हिंदी व उर्दू शिकायला आरंभ केला.अनेक प्रकाराने उर्दू भाषेवर प्रबोध मिळवण्यासाठी अभ्यास सुरू केला. मोठमोठ्याने गद्द वाचणे,पद्य वाचणे, *शायरीवर प्रभुत्व मिळवणे यासाठी त्यांनी एका शफी नावाच्या मौलवीकडे शिकवणी लावली.* दीदी त्यांच्याकडून फक्त बोलूनच नाही तर त्यातील शब्दांचा अर्थही समजून घेत.याचबरोबर 1966 मध्ये त्यांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या श्लोकांचं ध्वनीमुद्रण करायचं ठरवलं व त्यासाठी शुद्ध संस्कृत उच्चारांसाठी त्यावेळचे प्रख्यात लेखक श्री गो नी दांडेकर यांना पुण्याहून मुंबईला आल्यानंतर भेटून त्यांच्याकडून संस्कृत शिकून घेतली. जवळपास दीड महिना त्यांनी संस्कृत भाषेचे शिक्षण घेतले. लता दीदी प्रचंड मेहनत व परिश्रम आणि सराव करून गाणे गात राहिल्या.
उस्ताद अमान अली खान भेंडी बाजार वाले हे लतादीदींचे मास्टर दिनानाथ नंतरचे चे संगीतातील गुरु. त्यांनी लतादीदीला हंसध्वनी हा राग शिकवला. *हंसध्वनी हा लतादीदीचा सर्वात आवडता राग होता* . बडे गुलाम अली खान यांच्याकडून सुद्धा लतादीदींनी संगीताचे मार्गदर्शन घेतले. अतिशय वयस्कर असलेले गुलाम अली खान लतादीदीच्या संगीत शिकण्याच्या तीव्र इच्छे मुळे तसेच तिच्या स्वभावामुळे तीला खूप चिकाटीने व प्रेमळ पणाने शिकवत .

लतादीदींनी अनिल विश्वास यांच्याकडून एक खास खुबी हस्तगत केली होती.
” *दोन शब्दांमध्ये श्वास घेताना हलकेच मायक्रोफोन पासून दूर जाव,श्वास घ्यावा व तात्काळ परत येऊन गाणं पुढे चालू ठेवावं हे लतादीदी अनिल विश्वास यांच्याकडून शिकल्या.”*

मदन मोहन,सलीलदा एस डी बर्मन,जयदेवजी, आर डी बर्मन आदी विख्यात संगीतकासोबत लतादीदींनी आपले गायन सुरू ठेवले.
लतादीदींच्या आवाजाची विशेषता होती.त्यांचा आवाज अतिशय गोड, मधुर होता.उच्चार अतिशय स्पष्ट,सुरेल,लयबद्ध असे होते.गायनातील सफाई,उच्चारातील स्पष्टता, स्वरलहरी वरील पकड,श्वासावर नियंत्रण या सर्वांमुळे लतादीदींनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. लतादीदी चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय अचूक, निर्दोष शब्दउच्चार. लतादीदीच्या स्वरातील कंप, एक संवेदना जागृत करण्याचे तिचे सामर्थ्य हे अतिशय अवर्णनीय आहे. लतादीदींच्या स्वरांमध्ये मुलायमपणा व लवचिकता होती. लतादीदी आपल्या गायनाद्वारे चित्रपटातील भूमिकांशी त्यांच्या भावभावनांशी त्यांच्या सुखदुःखाची सहज समरस होत असत. चित्रपटातील कुठल्याही नायिकेशी लतादीदीचा आवाज एकदम परफेक्ट मॅच होत असे. लतादीदी च्या गाण्यांमध्ये त्यांच्या सुरामध्ये एक निरागसपणा होता, एक निर्मळ पणा होता. लतादीदीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तोच त्यांच्या गाण्यातल्या निर्मळपणात दिसतो.लतादीदीमुळे भारतातील प्रत्येक घरी शास्त्रीय संगीत पोहोचले.
लतादीदी मुळे भारतीय संगीताला अतिशय विलक्षण अशी लोकप्रियता लाभली. इतकेच नव्हे तर लोकांचा शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.लोकांना शास्त्रीय गायन करण्याची इच्छा निर्माण झाली. लोकांचे गाणे सुद्धा सुधारले. दुःख, विरह, यातना विसरून जाण्याचे सामर्थ्य लतादीदींच्या गळ्यात आहे.त्यांच्या मधुर व मुलायम आवाजामध्ये स्पष्ट व अर्थपूर्ण शब्दोचारामुळे लतादिदीचे गाणे ऐकणाऱ्याचे कान नेहमीच तृप्त होतात व ऐकणारा देहभान विसरून जातो. गळ्यातून निघणाऱ्या प्रत्येक स्वराला चिरंजीवित्व प्राप्त करून देण्याची लतादीदींची किमया, क्षमता आघात आणि थक्क करणारी आहे.संपूर्ण विसाव्या शतकाच्या अर्ध्यापासून त्यांनी आजपर्यंत संपूर्ण जगाला आपल्या संगीतमय कवेत घेतले आहे.सर्वांवर स्वरसंस्कार घडवले आहेत. ईश्वराने लतादीदीला जो निसर्गतः गोड गळा दिलेला आहे त्या गळ्यावर प्रयत्नपूर्वक संस्कार करून दिदिने स्वरसिद्धी प्राप्त केलेली आहे.
लतादीदी च्या गाण्याने जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद नाही तर लिंगभेदही संपवला आहे. लतादीदी ही फक्त व्यक्ती नव्हे तर ती एक संगीतमय संस्था आहे. मागील नऊ दशकापासून लतादीदी चे संगीतक्षेत्रावर अनभीज्ञ साम्राज्य आहे. भारतातच नव्हे तर जगात सर्वात जास्त कुणाचा स्वर ऐकला जात असेल तर तो लतादीदीचा होय.

संगीतकार आर डी बर्मन लतादीदी बद्दल म्हणाले होते,
*” लतादीदींचा मुलायम आवाज मायक्रोफोन मधून बाहेर पडताच इतका कर्णमधुर व दमदार होऊन कसा बाहेर पडतो हे मला न उमजलेलं कोड आहे. त्यांच्या गळ्यात अशा काही तरंग लहरी आहेत की, त्या माइक वर अत्यंत योग्य रीतीने आदळतात. मायक्रोफोन जवळीक साधणारा असा आवाज क्वचितच आढळतो.”*

लता दीदीला आपल्या गायनापेक्षा काहीही प्रिय नाही. लतादीदी जिथे गाणे गात ते ठिकाण म्हणजे मंदिर होत असे व रसिकांसाठी या मंदिरातील देवी म्हणजे लतादीदी व त्यांचा आवाज ऐकल्याचा आनंद त्यांना मिळत असे.

*लतादीदींनी 36 पेक्षा जास्त भाषांत गाणे गायलेले आहे. जवळपास 50 हजार गाणी त्यांनी वेगवेगळ्या भाषेत गायलेली आहेत.* मराठी, हिंदी, बंगाली, संस्कृत,तमिळ, कन्नड,पंजाबी, गुजराती, तेलुगु इत्यादी भाषांमध्ये त्यांनी आपल्या स्वरांचा मृदगंध दरवळला आहे. लतादीदींना बंगाली भाषा विशेष आवडत होती.लतादीदींनी बंगाली, पंजाबी,तमिळ भाषा सुद्धा शिकली.तमिळ गाणे गाताना लतादीदींना सुरुवातीला थोडस अवघड जाई. दीदी अशावेळी उच्चारानुसार शब्द लिहिणे व नंतर त्याचा अर्थ पाहणे या पद्धतीने आपले कार्य पूर्ण करत.
*
*” लतादीदींची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झालेली आहे.Time या अमेरिकेतील साप्ताहिकाने सुद्धा लतादीदींचा परिचय दिला होता* .त्या काळातील ही एक अद्भुत व पहिल्यांदाच घडणारी घटना होती.लता दीदींना भारतीय उपखंडातील एक सांस्कृतिक राजदूत म्हणूनच पाहिलं जायचं. ”
*मुघल-ए-आझम या चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं (1960* ) ” *प्यार किया तो डरना क्या…”* हे गाणे आजही सर्वांच्या मनामध्ये स्थान करून आहे. लता दीदींनी हे गाणे खूप सुंदर गायले आहे आणि आजही ते सर्वांच्या हृदयात आहे. तसेच, दिल अपना और प्रीत पराई (1960) मधील ” *अजीब दास्तान है ये…”* हे देखील लतादीदींनी अतिशय सुंदरपणे गायले होते. हे शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केले होते. जयदेव यांच्यासाठी लता मंगेशकर यांनी 1961 मध्ये ” *अल्ला तेरो नाम…” आणि “प्रभू तेरो नाम…”* ही दोन लोकप्रिय भजने रेकॉर्ड केली. बीस साल बाद मधील हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेल्या ” *कहीं दीप जले कहीं दिल…”* या गाण्यासाठी लता दीदीं ना 1962 मध्ये दुसरा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जानेवारी 1963 मध्ये *भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लता दीदींनी एक देशभक्तीपर गीत गायले होते. *भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत “ए मेरे वतन के लोगो,जरा आँख में भर लो पानी…” हे गाणे होते.* तेव्हा लतादीदी च्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून *पंडितजींच्या डोळ्यात अश्रू आले.* सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे कवी प्रदीप यांनी लिहिले आहे.

*आज फिर जीने की तमन्ना है…”, “गाता रहे मेरा दिल..”* आणि गाईड मधील “पिया तोसे” (1965), ज्वेल थीफ मधील ” होठो पे ऐसी बात …” *पाकीजा मधील ‘ चलते चलते… व इन्ही लोगोने….* हे गीत व अशी असंख्य गाणी अजरामर झाली.1960 च्या दशकात लताजींच्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या सोबत सर्वाधिक लोकप्रिय गाणी गायली. लतादीदीने आपल्या कारकीर्तीतील सर्वाधिक म्हणजे *696 गाणी या जोडीसाठी गायली.* सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली.

” *शोमॅन राज कपूर यांच्या जवळपास पूर्ण चित्रपटातील गीते लतादीदींनीच गायलेली आहेत. आवारा, श्री 420, बरसात, आग, मेरा नाम जोकर, ते हीना पर्यंत जवळपास सर्वच चित्रपटातील गीते* लतादीदींनी गायलेली आहेत.”

परिचय या चित्रपटातील ” *बीती ना बिताई रैना…” या गाण्यासाठी लता दीदीला 1973 मध्ये सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला . आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केले होते आणि गुलजार यांनी लिहिले होते. 1974 मध्ये नेल्लू चित्रपटासाठी “”कदली चेंकडली..” मल्याळम गाणे देखील गायले होते. ते सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केले होते आणि वायलर राम वर्मा यांनी लिहिले होते.कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या कोरा कागजमधील ” *रुठे रुठे पिया…” या गाण्यासाठी दीदींना 1975 मध्ये पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला . 1970 पासून लतादीदींनी विविध चॅरिटी ट्रस्टतर्फे अनेक जाहीर कार्यक्रम देखील केले. *1974 मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये लतादीदींची पहिली जाहीर कार्यक्रम झाला. आणि ती करणारी ती पहिली भारतीय होती.* प्रख्यात लेखक व निवेदक श्री हरीष भीमाणी यांनी लतादीदींच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पहिल्यांदाच केले होते. यानंतर पुढे अनेक वर्ष त्यांनी लतादीदी सोबत शंभराच्या वर कार्यक्रमाचं संचालन केलं. लतादीदींच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्यासोबत त्यांचे बंधू श्री हृदयनाथ मंगेशकर,त्यांचे घरगुती मित्र राजसिंह डुंगरपुर, सहगायक व संगीतकार सोबत असत. अमेरिका, कॅनडा, वेस्टइंडीज, दक्षिण अमेरिका,जर्मनी,फ्रान्स इत्यादी अनेक देशांमध्ये लतादीदींनी संगीताचे कार्यक्रम केले.

1970-1980 च्या काळात , लतादीदींनी एस डी बर्मन यांचा मुलगा राहुल देव बर्मन, संगीतकार रोशनचा मुलगा राजेश रोशन, संगीतकार सरदार मलिकचा मुलगा अनु मलिक आणि संगीतकार चित्रगुप्ताचा मुलगा आनंद-मिलिंद या संगीतकारांसोबत काम केले. *रुदाली (1993) मधील “दिल घुम घुम करे…” या गाण्याने त्या वेळेचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले.* रवींद्र जैनसाठी राम तेरी गंगा मैली (1985) मधील ” *सुन साहिबा सुन”…,* सौतन (1981) मधील “शायद मेरी शादी का ख्याल…” ” *जिंदगी प्यार का गीत है…”* सारखी हिट गाणीही गायली.
डॉ. भूपेन हजारिका या असामी संगीतकारा सोबतही संगीत आणि गीतांसह दीदींनी गाणी गायली.युनायटेड वे ऑफ ग्रेटर टोरंटोने जून 1985 मध्ये लता मंगेशकरांना मॅपल लीफ गार्डन्समध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले. तिने ‘यू नीड मी’ हे गाणे गायले. *या कार्यक्रमाला त्या काळात सुमारे 12,000 लोकांनी हजेरी लावली होती.*
1990 च्या दशकात लता दीदी मंगेशकर यांनी आनंद-मिलिंद,नदीम श्रवण, जतीन-ललित इत्यादी विविध संगीतकारासोबत गाणी गायली. *लेकीन चित्रपटांसाठी दीदींनी 1990 मध्ये स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. ” यारा सिली सिली…” या गाण्यासाठी दीदींना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.* लतादीदींचे लहान भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी हे गाणे संगीतबद्ध केले होते.
लतादीदींनी यश चोप्राच्या जवळपास सर्वच चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. ए.आर. रहमानने या काळात दिदी सोबत काही गाणी गायली.
*1994 मधील ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील ‘दीदी तेरा देवर दिवाना…’ या गाण्याने हिंदी चित्रपट सृष्टीतील त्यावेळेसचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते.* या चित्रपटातील सर्वच गाणी लतादीदींनी गायली होती व ती सुपरहिट ठरली.वयाच्या 66 व्या वर्षी लतादीदींनी 21 वर्षाच्या तरुण मुलींसाठी गायलेलं ते गाणं म्हणजे एक चमत्कारच होता.याचं काळातील’ *1942 -ए लव्ह स्टोरी ‘ या चित्रपटातील ‘ कुछ ना कहो , कुछ भी ना कहो … ‘हे गाणे अतिशय लोकप्रीय आहे.* 1999 मध्ये लता इओ डी परफुम नावाचा एक परफ्यूम ब्रँड नाव देखील लाँच करण्यात आला. त्याच वर्षी दीदींना झी सिने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1999 मध्ये लता दीदी मंगेशकर राज्यसभेच्या खासदार म्हणून नामनिर्देशित झाल्या.
*2001 मध्ये लता दीदी मंगेशकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्यात आला.*

त्याच वर्षी त्यांनी पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली. या हॉस्पिटलमध्ये 40 टक्के गरीब लोकांना मोफत उपचार देण्यात येतो.2011 मध्ये दीदींनी सरहदे: म्युझिक बियॉन्ड बाऊंडरीज हा अल्बम रिलीज केला.2012 मध्ये लता दीदींनी भजनांच्या अल्बमसह ‘एलएम म्युझिक’ हे स्वतःचे संगीत लेबल लाँच केले. दीदींनी 2014 मध्ये एक बंगाली अल्बम रेकॉर्ड केला. *2019 मध्ये मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेले “सौगंध मुझे इस माती की…” हे गाणे रिलीज केले . हे भारतीय सैन्य आणि राष्ट्राला दिलेली श्रद्धांजली होती.* नर्गिस, मधुबाला,नूतन,वहिदा रहमान,हेमा मालिनी,रेखा इत्यादी यांच्यापासून ते आजच्या काळातील नायिका माधुरी दीक्षित,प्रीती झिंटा, मनीषा कोइराला पर्यंत आपला जादुई आवाज दिला.

लतादीदी मंगेशकर ह्या अतिशय नम्र स्वभावाच्या होत्या. स्वतःच्या भाऊ बहिणीशिवाय कुणालाही त्या कधीही अरे तुरे ने बोलत नसत. हजरजबाबीपणा हे अजून एक लतादीदींचे गुणवैशिष्ट्य. एखादं गाणं गाताना जोपर्यंत आपला गळा पूर्ण ठीक होत नाही तोपर्यंत लतादीदी माइक समोर येत नसत. लतादीदी अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या.देवाचे दर्शन घेऊनच त्या गाण्याची सुरुवात करत. *गाणं गाताना लता दीदी चप्पल काढूनच गाणं गात. त्याचबरोबर रंगमंचावर तेथील पायरीला त्या नमस्कार करत.* अमावस्येला लता दीदी कधीही गान गात नसत.लतादीदी गाणं ही संगीताची साधना आहे असे म्हणत.लता दीदी नित्यनेमाने उपवास करत. प्रभु कुंज या त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी सुद्धा त्या जात. लतादीदी रोज नियमित देवपूजा करत असत.
आपणाला हे जे काही यश मिळालेले आहे त्यामध्ये *ईश्वराची कृपा, वडिलांचा आशीर्वाद व लोकांच्या शुभेच्छा* यामुळेच हे मिळालेला आहे असं त्या नेहमी अतिशय नम्रतेने सांगत.

*”आपण जे काम करतो आहोत ते बरोबर आहे सत्य आहे असा एकदा ठाम विश्वास बसला तर मग कुणाचीही भीती बाळगू नकोस”* हा वडिलांनी दिलेला मंत्र त्या नेहमी आपल्या आचरणात आणत.भीती बाळगायची असेल तर स्वतःची बाळगावी,स्वतःला प्रश्न विचारायचे.मी सत्य आहे काय उत्तर जर होय असेल तर कशाचीही परवा करणार नाही हे लतादीदींनी स्वतःशीच ठरवलेलं होतं.

‘ *भुकेने शरीर मरतं पण भिकेन आत्मा मरतो’* हा माई मंगेशकर यांनी दिलेला कानमंत्र लतादीदींनी आयुष्यभर जपला व त्यामुळे आयुष्यात त्या कधीही कुणापुढेही झुकल्या नाहीत. जनतेचे प्रेम व आशीर्वाद हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे असं दीदी नेहमी सांगत .दीदींच्या वागण्यामध्ये अतिशय साधेपणा होता. लतादीदी अतिशय धार्मिक होत्या.

” *अध्यात्माची बैठक असल्याखेरीज संगीत होऊच शकत नाही असं मला वाटतं कारण सूर हाच ओंकार आहे”* असं लतादीदींचा स्पष्ट मत होतं .त्या दररोज रामायण, भगवद्गीता इत्यादी धार्मिक ग्रंथांच वाचन करत. लतादीदींनी अनेक भजने गायलेली आहेत. ‘ *ठुमक चलत रामचंद्र..* ‘ हे त्यांचे भजन अतिशय प्रसिद्ध झाले. लतादीदींनी मीराबाईंची भजन, गालीबांच्या गझला, गीतेतील श्लोक, तुकारामाचे अभंग, ज्ञानेश्वरांच्या ओव्या अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने व तन्मयतेने गायलेले आहेत.

*पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाचे वर्णन केलेलं व जगद्गुरु संत तुकारामांनी लिहिलेलं ‘ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया’ हे भजन जेव्हा आपण लतादीदींच्या स्वरांमध्ये ऐकतो तेव्हा साक्षात तो सावळा परब्रम्ह पांडुरंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.*
हे लतादीदींच्या गायनाचे सामर्थ्य होय. ‘ *अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम…’* हे गाणं लतादीदींच्या स्वरामध्ये ऐकताना अंगावर काटे उभे राहतात.संगीताला कोट्यावधी लोकांपर्यंत पाठवण्यासाठी चित्रपटाची गरज नाही तर मनापासून गायल्यास गाणे हृदयापर्यंत जाते हा त्यांचा ठाम विश्वास होता. लतादीदींचा अजून एक मोठ गुणवैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत जेवढी गाणी गायलेली आहेत ते गाणं गाण्या अगोदर *लतादीदी स्टुडिओमध्ये पूर्ण गाणं स्वतःच्या हस्तक्षरात लिहून काढत.* ही त्यांना सवयच होती.एकदा एखाद गाणं स्वीकारलं की लतादीदी जोपर्यंत ते गाण पूर्णपणे समाधानकारक होणार नाही,तोपर्यंत घड्याळाकडे पाहत नसत. लतादीदींचे गाणे एवढे परफेक्ट असे की त्यांना रिटेक घेण्याची गरज च पडत नसे. परंतु, काही वेळेला संगीतकारांच्या किंवा तेथील वाद्य व अजून काही कारणामुळे त्यांना रिटेक घेण्याची वेळ येत असे.पण अशा वेळेला लतादीदी कधीही कुणावरही रागावल्या नाहीत किंवा त्यांनी साधा चिडचिडपणाही केलेला नाही.

*लेकिन हा लता दीदी निर्मित चित्रपट. या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातील ‘ *यारा* *सिली सिली* ..’* हे गाजलेलं अतिशय अवघड गाणं लतादीदींनी एकाच टेक मध्ये पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर ‘ *सत्यम शिवम सुंदरम* ‘ या चित्रपटातील टायटल सॉंग सुद्धा त्यांनी एका टेक मध्ये पूर्ण केलेला आहे. गाणी किती मधुर गायली यापेक्षा गाण्यांची संख्या यावरून आजकाल संगीतकाराचे महत्व ठरत आहे,हे बरोबर नाही असं दीदी अतिशय दुःखाने म्हणत.
लतादीदी इतर सहगायकांचा सुद्धा अतिशय सन्मान करत.त्या काळातील त्यांचे सहगायक मुकेश भैय्या, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मन्ना डे ,हेमंत कुमार, सी रामचंद्र, तलत मेहमूद ,नितीन मुकेश, भूपेंद्र, मोहम्मद अजीज, येसुदास, शैलेंद्र सिंग यांच्यापासून ते एस पी बालसुब्रमण्यम, सुरेश वाडकर, पंकज उदास, जगजीत सिंग,कुमार सानू, उदित नारायण, अन्नू कपूर, अमित कुमार, अभिजीत इत्यादी अनेक गायकांसोबत लतादीदींनी पार्श्वगायन केलेले आहे.

*लतादीदींनी मोहम्मद रफी सोबत सर्वात जास्त म्हणजे 440 गाणी गायली आहेत त्याचबरोबर त्यांचे आवडते गायक किशोर कुमार यांच्यासोबत 327 गीते गायलेली आहेत.* लतादीदींना मोहम्मद रफी साहेबांबद्दल अतिशय आदर होता. रफी साहेब म्हणजे एक कुटुंब वत्सल, विनम्र, प्रेमळ व्यक्तिमत्व अस लतादीदींचे मत होते.मुकेश भैय्या यांना तर लता दीदी आपला मोठा भाऊच मानत . मुकेश भैय्या यांचं गायन कोणीही जाऊ शकत नाही त्यांच्यासारखा दुसरा होणं खूप अवघड आहे अस दीदी म्हणतं..लतादीदींना गायन करताना सर्वात जास्त जर कोणासोबत आनंद येत असे तर तो किशोर कुमार यांच्यासोबत. लतादीदी किशोर कुमार हे दोघेही अतिशय उत्तम रीतीने नकला करत. किशोर कुमार म्हणजेच किशोरदा हे अतिशय हरहुन्नरी कलाकार.सतत हसत राहण, वेगवेगळ आवाज काढणं, टीवल्या, बावल्या करणे,गाणे कोणतेही असो अगदी सहज गाणं हे किशोरदांचे वैशिष्ट्य. हेमंत कुमार यांच्या बद्दल बोलताना लतादीदी म्हणत की,हेमंत दा चे गायन ऐकताना एखादा शांत ठिकाणी मंदिरामध्ये साधूचं गायन ऐकण्याचे फिलिंग मला येतं.लता दीदी हेमंत दा यांना राखी बांधत असत.
लता दीदीनी या सर्व महान विभुतीना श्रद्धांजली म्हणून एक अतिशय सुंदर कॅसेट काढलेली आहे. त्यामध्ये त्यांनी या सर्व गायकांचे दोन दोन गाणे स्वतःच्या आवाजात गावून त्यांना श्रद्धांजली दिलेली आहे.

*लतादीदींना चित्रपटसृष्टीत सर्वश्रेष्ठ स्थान होतं.याची त्यांना जाणीवही होती. पण त्यांनी कधीही याचा दिखावा केला नाही किंवा अहंकार केला नाही.* लता दीदी सर्वांना अतिशय प्रेमाने बोलत असत. सहकलाकारांना त्या यथोचित मान देत.एखादा नवीन संगीतकार असो किंवा जुना संगीतकार असो दीदी सर्वांशी सन्मानानेच वागत.
लता दीदी मंगेशकर यांनी अनेक चित्रपटांना संगीतही दिलेल आहे *. ” राम राम पाहुण,मोहित्यांची मंजुळा,मराठा तितूका मेळवावा,साधी माणसं, तांबडी माती”* इत्यादी मराठी चित्रपटांसाठी लतादीदींनी संगीत दिलेल आहे.त्यांनी चित्रपटाच संगीत ‘ *आनंदघन’या* नावाने दिलेल आहे. *साधी माणसं या चित्रपटातील ” ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे…” या गाण्यासाठी लतादीदींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.*

*चित्रपट निर्माता म्हणून लतादीदींनी चार चित्रपटाचे काम केले.वादळ (1953) हा मराठी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.त्याच बरोबर झांजर (1953), कांचन गंगा (1955) व लेकिन (1990)हे तीन हिंदी चित्रपट लतादीदींनी स्वतः दिग्दर्शित केले .*

लतादीदींच आपले *वडिल मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारत माता,छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस,आपला धर्म व स्वा.सावरकर यांच्या बद्दल प्रचंड आदर व श्रद्धा होती*लता दीदी** *छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत. मराठी माणसाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेला जाज्वल्य अभिमान त्यांच्या*शिवकल्याण राजा*या ध्वनी मुद्रिकेत अतिशय उत्कटतेने सादर झालेला दिसतो .** आपल्या भारत माते बद्दल बोलताना लतादीदी एकदा हरीश भिमाणी यांना म्हणाल्या होत्या की, *मला सर्वात जास्त घ्रणा ही त्या भारतीयांची येते ज्या भारतीयांना आपण भारतीय आहोत हे सांगायला लाज वाटते.* दीदी नेहमी म्हणत, आम्हाला मेड इन इंडिया च्या शिक्याबद्दल अभिमान असो वा नसो पण निदान आपली राष्ट्रभाषा व मातृभाषेची तर लाज वाटता कामा नये.

लता दीदी कधीही स्वांत सुखाय कार्यक्रम करत नसत.त्यांचा प्रत्येक कार्यक्रमा मागे एखादा सामाजिक किंवा राष्ट्रीय पातळीवरील कर्तव्य भावना असे.मग तो कार्यक्रम परदेशात असो अथवा आपल्या देशात. कार्यक्रमाची सुरुवात त्या ईश्वर स्तवनाने करत. परदेशातही त्या आपल्या सोबत एक छोटास देवघर सोबत घेऊन जात. दीदींना आपल्या सहकलाकरांचा खूप मोठेपणा होता. त्यांचे कौतुक करण्याचा त्यांचा गुण वाखानण्यासारखा होता. लता दीदी कलाकार म्हणून तर मोठ्या होत्याच पण एक माणूस म्हणूनही त्या तेव्हढ्याच महान होत्या.

*1984 ला बाबा आमटेंच्या आनंदवन च्या मदतीसाठी लतादीदींनी ब्रेबॉर्न स्टेडियमवर कार्यक्रम घेतला. त्यावेळी लता दीदी स्वतः उद्योगपतींकडे पैसे मागत फिरल्या.त्यामध्ये त्यांनी आदित्य बिर्ला,धीरूभाई अंबानी, वालचंद, गोदरेज, गरवारे, गोयंका इत्यादी मोठमोठ्या उद्योगपती कडे स्वतः गेल्या. या पद्धतीने पैसे जमा करण्यासाठी लतादीदी कधीही फिरल्या नव्हत्या. परंतु एका चांगल्या समाजकार्यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला व त्या काळात आनंदवनासाठी 34 लाखाचा चेक जमा करून श्री बाबा आमटे यांच्याकडे सुपूर्त केला .* लतादीदींनी वडिलांच्या नावाने दोन शाळा व एका शास्त्रीय संगीत विद्यालयाची स्थापना केली. त्यामध्ये त्या दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांसाठी दोन लाखाची स्कॉलरशिप देत असत. कुणी थोडीही स्तुती केली की दीदी आपली वस्तू पुढच्या माणसाला सहज देऊन टाकत.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू पासून अटल बिहारी वाजपेयी असो किंवा सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो लतादीदींचे सर्वांशी अतिशय स्नेहाचे प्रेमाचे संबंध होते. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे,शरदचंद्रजी पवार आदी जवळपास सर्वच पक्षातील राजकीय लोकांशी लतादीदींचे अगदी जवळचे संबंध होते. दीदींचा मित्रपरिवार खूप मोठा होता. चित्रपटसृष्टीतील राजकपूर,अमिताभ बच्चन, रजनीकांत, संजीव कुमार, हेमा मालिनी, रेखा, जया बच्चन इत्यादी सर्वच कलावंतांसोबत लतादीदींचे अतीशय स्नेहाचे होते.
*इजिप्त ची प्रख्यात गायिका *उल्मे कुल्सूम*यांच्या लतादीदी फॅन होत्या.* लतादीदींना विदेशी गायक बिथोफेन व मोझार्ट च्या सिम्पनीज तसेच नेट किंग कोल व फ्रॅंन्क सिनागा यांची गाणी आवडत.

लतादीदींना चित्रकलेची, फोटोग्राफीची खूप आवड होती.तसेच कार ड्रायव्हिंग व फिरणे दीदींना खूप आवडे. दुसऱ्याच्या अक्षराची लता दीदी हुबेहूब न नक्कल करत. लतादीदीला चहा पिण्याची खूप आवड होती. लता दीदीला गोड तसेच तिखट पदार्थ आवडायचे. त्यांना चटक-मटक खमंग खायची सवय होती.लतादीदी स्वतः उत्कृष्ट स्वयंपाक बनवायच्या. स्वतः खायच्या, व इतरांना हि सुद्धा खाऊ घालण्यात त्यांना खूप आनंद मिळायचा. दुसऱ्याच्या आवाजाचे मीमीक्री लतादीदी अगदी परफेक्ट करत. लतादीदींना फुल खूप आवडायची. पांढरा गुलाब व कमळ हे लतादीदींचे आवडते फूल.प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी तसेच दररोज आपल्या घरात लता दीदी वेगवेगळ्या फुलांचा गुच्छ नियमित ठेवत.

” *एकत्र कुटुंब पद्धती हा लता दीदींच्या वैशिष्ट्येपैकी एक पैलू होय. आई,बहिण,भाऊ, नातवंड यांना घेऊन प्रेमाने चालणे त्यांना आवडे.आईबापांचीही अडचण वाटणाऱ्या या काळात हा एक आदर्श दीदींनी समाजाला घालून दिला. “*

पाण्यात राहूनही कमळ जसे स्वच्छ आणि कोरडे राहते आगदी त्याप्रमाणे लतादीदी या सध्याच्या आधुनिक जगात राहून हि फॅशनच्या किंवा इतर मोहाच्या पासून नेहमीच दूर राहिल्या.लता दीदीचे वागणे अतिशय सहज,सुंदर होते. आयुष्यभर दीदींनी पांढरी साडी वापरली. त्या अंग भरून पदर घेत.लतादीदींचे केस दाट व खूप लांब होते.लता दीदीनी कधीही चित्र विचित्र केस रचना केली नाही.लांब सडक दोन वेण्या व कुठलाही मेकअप न करता लता दीदी आपल्या अतिशय पाणीदार अशा डोळ्यांनी शांत निर्विकार नजरेने सर्वांकडे पहात व गोड हास्य देत.एवढ ऐश्वर्य असून एवढा साधेपणा,एवढी सुंदरता जगात कुठेही नाही.

‘ *माझी पटकथा लेखक होण्याची इच्छा होती* ‘पण मला वेळ मिळाला नाही असे लता दीदींनी एका कार्यक्रमात सांगितले होते. गायनाबरोबरच लतादीदींना अनेक वाद्य ही वाजवता येत. उस्ताद बिस्मिल्ला खान यांची सनई,पंडित रविशंकर यांची सतार, श्री राम नारायण यांच तंतुवाद्य, शिवकुमार शर्मा यांचे संतूर वाद्य व पन्नालाल घोष यांची बासरी लतादीदींना विशेष आवडायची.

*बसंत बहार या चित्रपटातील *’मै पिया तेरी तू माने यां ना माने…’ या गाण्यांमध्ये लतादीदींची बासरी सोबत जुगलबंदी आहे. जनु दुसरी गायिकाच गात आहे या पद्धतीने या गाण्यांमध्ये पन्नालाल घोष यांनी बासरी वाजवलेली आहे .* पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरी वादन सुद्धा लतादीदींना खूप आवडत असे.
*लता दीदींनी जवळपास सर्वच प्रकारचे गीत गायन केलेले आहे.त्यामध्ये भजन, बालगीत, देशभक्तीपर गीत,श्लोक, अभंग, ओवी,लोकगीत, भावगीत, आरती,लावणी, गझल, कव्वाली , ठुमरी, दादरा,कजरी, ख्याल* इत्यादी गीत प्रकार आहेत. लता दीदींनी सूरदास,कबीरदास, संत ज्ञानेश्वर,नामदेव,संत तुकाराम, मैथीली शरण गुप्त,साहिर लुधियानवी, पंडित नरेंद्र शर्मा, मजरुह सुलतानपुरी, हसरत जयपुरी,इंदिवर, नीरज, गुलजार,शांता शेळके, कुसुमाग्रज,पी सावळाराम, सावरकर,फडके, जगदीश खेबुडकर इत्यादी अनेक कवींचे गीत गायले आहेत.
*लतादीदींना वाचनाची प्रचंड आवड होती.* वि स खांडेकर,भा रा तांबे, ग दी माडगूळकर , शिवाजी सावंत,फडके यांच्या कादंबऱ्या दीदींनी वाचल्या.केशवसुत,बालकवी, कुसुमाग्रज,ग्रेस यांच्या कविता, शरदचंद्र चटर्जी यांचे बंगाली साहित्य हि वाचले. त्याचबरोबर बकिंमचंद बॅनर्जी, प्रेमचंद, जयशंकर प्रसाद, साकेत, मैथीली शरण गुप्त यांचेही साहित्याचे दीदींनी वाचन केलं आहे. गालिबांचे उर्दू साहित्य त्यांनी आवडीने वाचले.हरी नारायण आपटे यांचे उष:काल त्यांनी अनेक वेळा वाचले. बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा दीदींना विशेष आवडत.
लतादीदींनी स्वतः लेखन केलेला आहे.लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने 1995 ला प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. त्यानंतर जयश्री देसाई यांच्या मैत्रेय प्रकाशनने ‘ *फुले वेचिता ‘ या नावाने तो लेखसंग्रह* प्रसिद्ध केलेले आहे. *लतादीदींना चित्रपट पाहण्याची सुद्धा खूप आवड होती . पडोसन हा लतादीदींचा आवडता चित्रपट. *लतादीदींनी पडोसन हा चित्रपट तब्बल 40 वेळा पाहिलेला आहे.*

*लतादीदींची नुसती गाणी आठवण हा सुद्धा एक आनंदोत्सवच आहे.*

*पूर्ण चंद्राची या कोडी l वक्तृत्व घापे कुरोडी lतैसी आणि गोडी अक्षराते l*

या ज्ञानेश्वरीतील ओवी चा अर्थ असा आहे की,त्यांच्या वक्तृत्वातील अक्षरांना इतकी गोडी येते की, अल्हाद देणारे पौर्णिमेचे कोट्यावधी पूर्ण चंद्र त्यांच्या वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत. या ओवी मध्ये वक्तृत्व ऐवजी गायन हा शब्द वापरल्यास लतादीदींच्या स्वरकोषाचे पुरेपूर वर्णन होईल. त्याचबरोबर
*सूर्य अधिष्ठली प्राची l जगा राणीव दे प्रकाशाची l तेथील श्रोतयी ज्ञानाची l दिवाळी करी ll*

या ज्ञानेश्वरी मधील दुसऱ्या एका ओवीमध्ये सूर्याने पूर्व दिशेला अंगीकार केला म्हणजे तो सर्व जगाला प्रकाशाची राजसंपन्नता देतो त्याप्रमाणे त्यांची(लतादीदींच्या) वाणी त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या भाषणाद्वारा (गायनाद्वरा)श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करतात, तृप्त करतात .

लता दीदी क्रिकेटच्या खूप शौकीन होत्या. *भारताने जेव्हा कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 चा पहिला वर्ल्ड कप जिंकला होता,तो सामना लतादीदींनी प्रत्यक्ष लंडनमध्ये लॉर्ड्स च्या स्टेडियम मध्ये बसून पाहिला होता.* यानंतर लतादीदींनी संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाचे भरभरून कौतुक केले होते व त्यांचे अभिनंदन केले होते. दिदी बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्या त्या वेळी प्रत्यक्ष क्रिकेटचे सामने पाहत. जेव्हा त्यांना प्रत्यक्ष जायला मिळत नसे तेव्हा त्या आवर्जून भारताचे क्रिकेटचे पूर्ण सामने टीव्ही वर पाहण्याचा प्रयत्न करत.भारत पाकिस्तान मॅच तर लतादीदी सर्व कामे सोडून पाहत असत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा लतादीदींचा आवडता क्रिकेट खेळाडूं. सचिनला दीदींनी पुत्रवत प्रेम दिले.
लतादीदींना अनेक मानसन्मान,अनेक पदव्या मिळालेल्या आहेत. *भारत सरकारचा सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार,दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार, म्युझिक वर्ल्ड पुरस्कार, भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त “वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट”* सन्मान या प्रकारचे कितीतरी पुरस्कार लतादीदींना मिळाले आहेत. चित्रपट सृष्टीतील मानाचा *फिल्मफेअर पुरस्कार लता दीदींना सलग पाचते सहा वेळेस मिळाला.त्यानंतर त्यांनी नम्रपणे हा पुरस्कार मला न देता नवीन प्रतिभेला देण्यात यावा अशी विनंती केली.*

लतादीदी बद्दल किती लिहावं,काय लिहावं, शब्द कमी पडतील,अक्षर कमी पडतील. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला दीदी अतिशय प्रिय आहेत . मागील 30-35 वर्षापासून असा एकही दिवस गेला नसेल की ज्या दिवशी मी लतादीदींचा स्वर ऐकलं नसेल व माझे कान तृप्त झाले नसतील.एवढं लतादीदींचं व्यक्तिमत्व महान आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एवढं प्रेम, एवढा मान, एवढा सन्मान, एवढं वैभव, सर्वच क्षेत्रातील व्यक्तींच प्रेम, भारतच नाही तर जगभरामध्ये स्वतःच एक वेगळं स्थान. लहान बालकापासून ते अगदी वयोवृद्धापर्यंत, शेतकऱ्यापासून ते शास्त्रज्ञ पर्यंत,रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरापासून ते भारत देशाच्या पंतप्रधानापर्यंत सर्वांचे दिदीला भरभरून प्रेम मिळालं. अस कुठलंही क्षेत्र नाही की, ज्या क्षेत्रातील व्यक्ती लतादीदींवर प्रेम करत नाही.

*लता दीदी म्हणजे साक्षात ईश्वराचा अवतार* . लतादीदी म्हणजे भारताची संस्कृती.सर्व जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणणारी लतादीदींना कोणी शापित अप्सरा म्हणत व शाप देणारा सुवर्ण वाणी काढून घ्यायचं विसरला असावा असं मानतात.कोणी लता दीदींना ” *स्वरमोहिणी,यक्षकिन्नरी म्हणत. गानकोकिळा, गानसम्राज्ञी,गान देवता, भारताची कोकिळा, कोकीळ कंठी, भारताची नाईट एंजल, मेलोडी क्वीन,संगीतातील गायत्री, स्वर सुंदरी अशा एक ना अनेक पदव्या लतादीदींना अनेक दिग्गजांनी, तत्त्वज्ञांनी,लेखकांनी, विचारवंतांनी दिलेल्या आहेत. कुणी म्हणत लतादीदी म्हणजे साक्षात श्रीकृष्ण भगवंतांची बासरी, तर कोणी म्हणत लताचा स्वर म्हणजे पंचमवेद होय. विधात्याला पडलेले स्वप्न म्हणजे लता.* स्वप्नमई, जादुई,मधुर, मधाळ स्वरांची खान म्हणजे लता. संगीतातील प्रत्येक वाद्याच परमोच्च मिठास रूप म्हणजे लता.

*पु ल देशपांडे लतादीदींबद्दल म्हणाले होते,’मला आकाशात देव आहे का हे माहिती नाही पण आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे.’*

लता दीदींना त्याकाळी अनेक लोक आपल्या भावना पत्र लिहून कळवत असत.असेच एकदा, सीमेवर देश सेवा करणारा एक भारतीय सैनिकाने दीदींना एक पत्र लिहिले होते.तो म्हणाला होता, *” लतादीदी तुमच्या गळ्यात गाण्यात आम्हाला आमची घरदार दिसतात आत्ताचे आवाज ऐकू येतात बालकांचे स्वर ऐकू येतात आणि आमच्या एकाकी पण निघून जातो आणि आम्ही सज्ज होतो पुन्हा एकदा नव्या दमानं. .”*

एकदा एक संगीताचा दर्दी पाकिस्तानी सैनिक म्हणाला होता , *तुम्ही आम्हाला लता दीदी चा स्वर द्या आम्ही तुम्हाला काश्मीर देऊन टाकू.* तर असं हे लतादीदींच व्यक्तिमत्व अगदी अलौकिक आहे, अमर आहे, अजय आहे.सर्व मान्य, जगमान्य, ईश्वर मान्य,पृथ्वी मान्य व्यक्तिमत्व म्हणजे लतादीदी मंगेशकर. लता दीदी पुन्हा होणे नाही. जोपर्यंत पृथ्वीतलावर मनुष्य आहे, प्राण आहे,प्रकाश आहे, वारा आहे, पाणी आहे, हवा आहे तोपर्यंत लतादीदींचा आवाज, लतादीदींचे स्वर,लतादीदींचे गाणे क्षणोक्षणी कुठे ना कुठे, कोणी ना कोणी ऐकतच राहणार.
” *नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा मेरी आवाज ही मेरी पहचान है… “* हे लतादीदींनीच गायलेलं गाणं बहुदा लतादीदींसाठीच असावं. अशा ह्या अलौकिक, उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या जयंती निमित्त लता दीदी मंगेशकर यांना विनम्र अभिवादन 🙏….
*प्रा डॉ विजय भोसले* , रसायनशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड.
भ्रमणध्वनी: 9403067252

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.