ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांचे अवधान खेचणारा प्रोफेसर :डॉ. महेश द्रोपदीबाई रामलिंग कळंबकर

डॉ. महेश द्रोपदीबाई रामलिंग कळंबकर उर्फ डॉ. फ्रीडम द्रोपदीबाई सरांचे व्यक्तिमत्व विविध पैलूंनी, गुणांनी युक्, विविध बहुरंगी असल्याने, ते विलक्षणपणे विद्यार्थ्यांचे लक्ष खेचून घेतात. दर्जेदार अध्ययन, अध्यापन असो किंवा संशोधन असो विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्याची शक्ती त्यांच्या फॅसिनेटिंग टिचिंग मध्ये आपल्याला दिसते. त्यांची रंजकपणे शिकवण्याची शैली विद्यार्थ्यांना खेळवून ठेवते . त्यांचे असामान्य मार्गक्रमण करणारे व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांना विधायकेकडे जाणारा मार्ग सांगत ,विलक्षण प्रभावी व अविस्मरणीय टीचिंग चा प्रत्यय देऊन जाते. अवधान खेचून विद्यार्थ्यांना कसं परिणामकारक शिकवावं व त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधावा, याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे माळी सरांचा वर्ग. गर्दी खेचणारा, समोर बसण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ करणारा ,असा सर्व संपन्न अवधान खेचून घेणारा क्लास म्हणजे माळी सरांचा टिचिंग क्लास होय.
अतिशय तरुण मन असलेला विद्यार्थ्यांच्या जीवनाला गतिमान करणारा, असामान्य, प्रभावी व आपल्या शिकवण्याच्या विशिष्ट शैलीने विद्यार्थ्यांच्या मनाला भावनांना स्पर्श करण्याची शक्ती असलेला, विज्ञानाची कास धरणारा कला व सौंदर्याचा आस्वाद घेणारा एक आगळावेगळा प्राध्यापक म्हणजे महेश माळी सर, असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व 30 जून 2024 ला प्रदीर्घ सेवेनंतर यशवंत महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहे.

समाजातील रूढी परंपरांना छेद देणारा ,साऱ्या रंगात रंगून देखील वेगळेपण दाखवणारा ,एक कलंदर प्राध्यापक म्हणजे महेश माळी सर. सामाजिक भान  असलेला, समाजाचे दुःख जाणून घेणारा व प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावला पाहिजे हे सांगणारा एक कलंदर प्राध्यापक म्हणजे महेश माळी सर .आपण त्यांचे ओजस्वी शब्दकळा मधे वर्णन करायचे म्हणजे
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा,
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा.

डॉ. फ्रीडम उर्फ महेश माळी सरांचा शैक्षणिक सामाजिक प्रवास खरोखर खूप रोमहर्षक संघर्षमय सहासी आहे . तो जाणून घेतला तर आपल्या मध्येही सकारात्मक बदल होतील,मनामध्ये एक नवी चेतना, नवी उमेद नवा उत्साह निश्चितच निर्माण होईल. सरांच्या जीवनसाधनेतुन उमगलेले त्यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना किती प्रभावित करत होते, हे त्यांच्या शिकवण्याच्या कौशल्यावरुन व त्यांच्या लेक्चरला गर्दी करण्यावरून आपल्याला दिसून येते.
आकाशाला गवसणी घालणारे ,निर्मितीक्षम ,नाविन्यपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या शिकवण्याच्या विलक्षण पद्धती व टूल्स, तंत्र सहजपणे रसायनशास्त्रातील प्रयोगशीलता अभिक्रिया अणुचे ,रेणुचे अंतरंग विद्यार्थ्यांना आकर्षित करत होते. खरं म्हणजे रसायनशास्त्र या विषयाची विद्यार्थ्यांना भुरळ घालण्याची किमया त्यांच्यामध्ये असल्यामुळे आपण त्यांना रसायनशास्त्रातील एक किमयागार निश्चितच म्हणू शकतो.

अध्ययन ,अध्यापन तसेच संशोधन यामधील त्यांचे योगदान अतुलनीय असल्यामुळे, ते एक उत्कृष्ट प्राध्यापक तर होतेच, त्याचबरोबर सामाजिक भान असल्यामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जीवन पद्धतीकडे  नेण्याची प्रेरणा सुद्धा होते.

रसायनशास्त्राच्या संकल्पना अतिशय स्पष्टपणे समजावून सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांना असा वेगळा अभ्यास करण्याची गरज भासत नसे, त्यांच्या नोट्स वाचल्या की ते सहजपणे रसायनशास्त्र समजत. अतिशय सहजपणे , उत्कटतेने ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत व त्यांच्या संवाद साधण्याच्या कौशल्यातुन ज्ञानाच्या अनेक छटा झळकत असे. रसायन शास्त्रातील रसायन ,त्यांनी विद्यार्थ्यांसोबत खेळवले ,रुजवले व फुलवले ,अन् ते अनेकांपर्यंत पोहोचवले.
एक हाडाचे , प्रामाणिक शिक्षक म्हणून ,ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत असलेल्या अनेक कॉलेजमध्ये प्रसिद्ध झाले .केवळ रसायनशास्त्र शिकून ते थांबले नाही तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, निर्माण करण्यासाठी त्यांनी सतत अनेक उपक्रम राबवले.

अनेक प्राचार्य ,प्राध्यापक ,त्यांचे विद्यार्थी यांच्याकडून त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती , टेक्निस व ज्ञानाबद्दल चांगला अभिप्राय मिळत राहिला.त्यांची कारकीर्द, प्रवास कमालीचा यशस्वी राहिला. जगात घडणाऱ्या बदलाची जुळवून घेत त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले .एक यशस्वी प्रोफेसर म्हणून समाजात त्यांचा नावलौकिक झाला. प्रचंड उत्साही, हौसी ,स्मित हास्य करणारा ,इतरांना आनंदित करणारा प्राध्यापक सेवानिवृत्त झाल्यामुळे यशवंत महाविद्यालयाला त्यांची नेहमीच उणीव भासेल .
नॅशनल, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, वर्कशॉप, आयोजित करण्यामध्ये नेहमीच त्यांनी हिरीरीने भागघेतला .कॉलेजच्या अनेक समित्यांमध्ये उत्कृष्टपणे त्यांनी काम केले.

पुस्तक वाचणे, ते बिटवीन द लाईन वाचणे, त्याच्यावर विचार मंथन करणे ,इतर तज्ञांसोबत चर्चा करणे. वर्तमान पेपर वाचणे, त्यावर चर्चा करणे, विचार मंथन करणे , आपल्या सहयोगी प्राध्यापकांसोबत चर्चा करणे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ,सामाजिक क्षेत्रामध्ये ,आर्थिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये ,कोणते बदल घडतात, या विषयाची त्यांची आवड व चर्चा आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून दिसून येते.
त्यांच्यासमोरचा विद्यार्थी खूप हुशार असावा ,असे त्यांना अभिप्रेत नसायचे .सर्वसाधारण विद्यार्थ्यांचे मने, सुद्धा त्यांनी प्रज्वलित केले .खरं म्हणजे, त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतःच शोधला अत्त दीप भव.
एम एस्सी चे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद मध्ये पूर्ण केल्यानंतर, तेथील शिक्षकांचा ठसा त्यांच्यावर पडला असल्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले‌. रसायनशास्त्र या विषयाकडे सखोलतेने बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण झाला व त्यातच नावीन्यपूर्णतेचा शोध घेण्याचे वेड त्यांना लागलं. केमिस्ट्री हा विषय त्यांच्या जीवनाचा पार्ट टाइम पार्सल झाला. रसायनशास्त्रासारखा विषय शिकवत असताना त्यांना नॅचरल सायन्स मध्ये सोशल सायन्स चे मूलभूत नियम दिसू लागले आणि त्यांनी रसायनशास्त्र शिकवताना सामाजिक शास्त्र हे कसे नैसर्गिक शास्त्राशी निगडित आहेत, हे देखील समजून सांगण्याचा प्रयत्न केला. रसायनशास्त्रा सोबतच विद्यार्थ्यांना जीवनाचे समाजशास्त्र उलगडून दाखवले. त्यातील नवीन शोध, नव्या संकल्पना, समजवून सांगताना ते भारावून जाऊ लागले. प्रामाणिकपणे बिटवीन द लाईन्स केमिस्ट्री वाचून समजून विवेक बुद्धीला पटेल ,अशा दृष्टीने ते विषय समजून घेऊन विद्यार्थ्यांना शिकवायला लागले .एक नवी आशा ,नवी दिशा, नवी ऊर्जा नवी उमेद यामधून त्यांना मिळाली.

डॉ. फ्रीडम उर्फ महेश माळी सरांचे व्यक्तिमत्व हे ज्ञान, प्रज्ञा ,विज्ञान, तत्त्वज्ञान याने ओतप्रोत भरलेले असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विज्ञान मंच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. भास्कर दवणे सर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायंटिफिक टेंपर निर्माण होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. विज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी विज्ञानाच्या विश्वात हा डिजिटल व्याख्यानाचा कार्यक्रम वेगवेगळ्या महाविद्यालयात अनेक वर्ष केला. त्याचप्रमाणे प्रा. डॉ. फ्रीडम यांचा ‘विज्ञान आणि तीन बुद्ध’ हा वैशिष्ट्यपूर्ण ,अद्वितीय ,सामाजिक व वैज्ञानिक जाणीव जागृत करणारा अभिनव उपक्रम, प्रबोधन व व्याख्यान कार्यक्रम केल्या 25 वर्षापासून महाराष्ट्रभर होत आहेत.
सध्याचे युग हे सायन्स टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचे असल्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाचे वेगवेगळे टूल्स वापरणे व ते विद्यार्थ्यांना समजून सांगत अध्ययन अध्यापन करणे व त्यांच्याशी अनुबंध जुळून घेणे हे सरांनी सहज शक्य करून दाखवले. त्यामुळेच ते आपल्याला नेहमी स्मितहास्य आनंदी , सदाचाराच्या मार्गावर आरुढ होत असताना दिसतात. त्यांची विद्यार्थ्यांप्रती समर्पित भावना असल्यामुळे एक कृतज्ञतेचा भाव त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो.

एकूणच जागतिक पातळीवर टेक्नॉलॉजी मधील विकास अत्यंत शिखरावर पोहोचलेला आहे, बेसिक सायन्स मधील विकास देखील वरच्या टोकाला गेलेला आहे, परंतु ज्या मूळ मुद्द्यावर मानवी समाज सामाजिक ,राजकीय व आर्थिक जीवन जगतो आहे, ती सामाजिक शास्त्रे मात्र 3000 वर्षांपूर्वीची आहेत. त्यामुळे भौतिक सुविधा या 21व्या शतकातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी वर आधारित आहेत, तर सामाजिक ,मानसिक गरजा मात्र आम्ही 3000 वर्षांपूर्वीच्या समाजशास्त्रानुसार भागवतो आहोत, त्यामुळे जगातील सर्व मानव जातीच्यावर एक प्रकारचे प्रेशर तयार झालेले आहे , जगातील संपूर्ण मानव जात पूर्णपणे या दोन्हीच्या मध्ये पिळली जात आहे ,म्हणून मानव आज वैयक्तिक , सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रकारच्या मानसिक व सामाजिक युद्धामध्ये अडकला गेलेला आहे. त्यामुळे काही काळ नैसर्गिक विज्ञानाची प्रोग्रेस थांबवणे आवश्यक झालेले आहे . तंत्रज्ञानाची प्रोग्रेस पूर्णपणे थांबायला पाहिजे. मानवाला आपला विकास करायचा असेल व विनाश टाळायचा असेल ,तर पुढील काळात फक्त सामाजिक शास्त्राच्या विकासावर पूर्णपणे भर दिला गेला पाहिजे, तरच मानव जात विनाशापासून वाचेल अन्यथा स्वतःच निर्माण केलेल्या विकासाच्या जाळ्यामध्ये स्वतःचाच विनाश करून घेईल , असे त्यांचे अनेक वर्षाच्या विश्लेषणात्मक अभ्यासामुळे मत बनलेले आहे
अलन मस्क ने सुद्धा ए आय ला चांगले काम व राक्षसी काम दोन्ही साठी वापरू शकतो असे म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्या मेंदूला नियंत्रित करू लागली तर खूप मोठा धोका होऊ शकतो. मानवी नैसर्गिक उत्क्रांतीला शह मिळू शकतो. डॉ जेफ्री हिंटन फादर ऑफ ए आय यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे व ते राजीनामा देऊन गुगल मधून बाहेर पडले.  भविष्यात युद्ध झाले तर ए आय टूल्स आणि रोबोट्स याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊन मानव जात नष्ट होण्याची शक्यता निर्माण होईल व संबंध जीवसृष्टी धोक्यात येईल
डॉ‌. ए.टी. सूर्यवंशी, डॉ.भास्कर दवणे डॉ. अशोक कंधारे , डॉ. एल. पी. शिंदे, डॉ. संतोष शिंदे, विठ्ठल धुतमल आधी सहकाऱ्यां सोबत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली .त्यातूनच त्यांनी फुले आंबेडकर विचार प्रचारक समिती या संघटनेच्या माध्यमातून फुले आंबेडकरी विचारधारा समाजात रुजवण्यासाठी अथक प्रयत्न केले.
महात्मा फुलेंचे विचार  अविद्येने काय अनर्थ होऊ शकतात हे ते समाजामध्ये सांगायला लागले.
विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले
फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक काम करू लागले, याचेच उदाहरण द्यायचे म्हणजे त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी ,ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्यांचा असुड यावर वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, विचार मंथन करून प्रवचने व वाचन करण्याचे काम केले. फुले आंबेडकरी व विज्ञानवादी विचारावर त्यांनी महाराष्ट्रभर गेल्या 30-35 वर्षांमध्ये अनेक व्याख्याने दिली , वृत्तपत्रातून लेखन केले, अनेक ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजन केले व समाजाच्या उद्धारास काही प्रमाणात हातभार लावला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज विकास मंडळाचे ते अध्यक्ष राहिले. मंडल आयोगाच्या, ओबीसी आरक्षण बचाव चळवळीमध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
त्यांनी रिस्क घेतल्यामुळे त्यांना अनेक धमक्यांचे फोन सुद्धा येऊ लागले, त्याची तमा त्यांनी बाळगली नाही.वस्त्या वस्ता मध्ये, वाड्यावाड्यामध्ये, गावागावात व्याख्यान देत असताना त्यांच्यावर  हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला तरीसुद्धा ते डगमगले नाहीत, दवणे सर नाना शिंदे सर सूर्यवंशी सर दूथडे सर यांनी त्यांना नेहमीच साथ दिली. त्यांच्या निर्भीडपणाकडे व धैर्यशील तिकडे बघितले तर आपल्याला सुरेश भट यांच्या लाईन आठवतात.
माझी झोपडी जाळण्याचे केले कैक कावे…
जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना विज्ञाननिष्ठ पुरस्कार ,राजश्री शाहू प्रबोधन पुरस्कार विवेक वादी पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित केले

स्त्री पुरुष समानता म्हणणारे व स्री चे सक्षमीकरण व्हायला पाहिजे असे सांगणारे व्याख्याना द्वारे जनजागृती करून आपले हक्क काय अधिकार काय याची जाणीव करून देणारे डॉ. फ्रीडम उर्फ महेश माळी सर स्रीला उन्नत पातळीवर नेण्यासाठी मोलाचे योगदान देतात. याचं उत्कृष्ट पदावर उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे माळी सरांनी अनेक वर्षांपूर्वी 1995 पासून त्यांच्या नावापुढे आईचं नाव लावण्यास सुरुवात केली ते म्हणजे महेश द्रोपदीबाई कळबकर . येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते ती म्हणजे त्यांचे उत्कट उदात मातृप्रेम. आई विषयी त्यांना अतिशय आपुलकी जिव्हाळा माया दिसते. आपल्याला माहिती आहे गॉर्कीची आई, श्यामची आई, या पुस्तकांनी इतिहास घडवला. आई किती महान असते आकाशापेक्षा गगनापेक्षाही ती मोठी असते मुलांना तेजपुंज प्रज्वलित करणारी शिकवणारी आई असते. आईला अतिशय महत्त्व देणारे व आईवर प्रेम करणारे आईचे महत्व पटवून सांगणारे आईचे संस्कार कसे असतात हे शिकवणारे माळी सर आपल्याला भावतात. जिओ सायंटिफिकली, स्कोअर मॅजिकली ,असा विचार केला म्हणजे खरोखर आपल्या मध्ये आईचे मायक्रोकोंद्रियाल  डीएनए आलेले असतात, म्हणून आई ही खरोखर वडीला पेक्षा महान असते. मुळातच बाळाची पहिली ओळख ही आई असते, म्हणून सायंटिफिकली सांगायचं झालं तर मदर इज प्रायमरी, फादर इज सेकंडरी. खरं तर ,आपली ओळख ही आईच्याच नावाने झाली पाहिजे असा त्यांचा सायंटिफिक विचार आहे. एवढेच नाही तर,वेळप्रसंगी आई स्वतःच्या प्राणाची परवा न करता मुलाला वाचवते ,म्हणून तर डॉ.फ्रीडम उर्फ महेश माळी सर स्वतःच्या नावापुढे प्रथम आईचे नाव लावतात ,हे अतिशय उल्लेखनीय अभिनव व अभिमानास्पद आहे.
अश्यात शासनाने काही डॉक्युमेंट वर आईचे नाव अनिवार्य केले आहे. ‍महेश कळंबकर सर यांनी त्यांच्या नावापुढे आईचे नाव लावण्याची सुरुवात तीस वर्षांपूर्वीच केलेली आहे. म्हणजे ते समाजाच्या पुढे जवळपास 30 वर्ष जगत आहेत .खरोखर लोक नेहमीच्या वाटेने नेहमी जात असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो त्यापैकी माळी सर हे एक आहे. अनेक वर्षापासून स्वतःचे स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लावणारे, सायन्स मध्ये वेगवेगळे थेरम, थेयरी  वाचून त्यांचा मतितार्थ विद्यार्थ्यांना समजून सांगणारे एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून नावा रूपाला आलेले माळी सर 30 जून 2024 ला सेवानिवृत्त झाले आहेत.
अनेक जण आयुष्याच्या शर्यती जिंकतात परंतु आपल्या कर्तुत्वाने जिंकणारे माळी सर हे एक यशस्वी प्राध्यापक म्हणून रिटायर झालेले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वा मधुन  आपल्याला धैर्यशीलता, शौर्यपणा, विधायकता, पॉझिटिव्हिटी दिसते म्हणून तर समाज विघातकघातक घटकाविरुद्ध नेहमीच ते पेटून उठताना आपल्याला दिसतात. अनेक प्रगतिशील विचार समाजात पेटवण्याचे रुजवण्याचे काम त्यांनी केले आहे.
स्त्रियांच्या सक्षमी करण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांनी प्रबोधनाद्वारे जनजागृती केली. एवढेच नाही तर त्यांनी स्त्रीवादी समानता पार्टी नावाचे राजकीय पार्टी चालून राजकीय क्षेत्रात स्त्रियांना समानता मिळवून देण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे.

संशोधनातही माळी सर गरुड झेप घेतात 37 वर्षाच्या अध्ययन-अध्यापनामध्ये प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थी पीएचडी तर तीन विद्यार्थी एम फिल झाले आहेत. तसेच अनेक शोध पत्रिका त्यांनी दर्जेदार जर्नल्स मध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. अनेक तज्ञांचे व्याख्याने आयोजित करून विविध विषयाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आज आंतरजातीय विवाह म्हटले की ऑनर किलिंग च्या अनेक बातम्या आपल्याला वर्तन वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळतात .परंतु माळी सर आपल्याला कृतिशील समाज सुधारक दिसतात, स्वतःच्या मुलांची लग्न आंतरजातीय केलेले आहेत. त्यांच्या दोन्ही अपत्यांना मुलगा व मुलीला त्यांनी समाजाच्या रूढी परंपरा झुगारून पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेले आहे .यावरून एक स्वतंत्रपणे विचार करणारा व्यक्ती आपल्याला माळी सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतो.  स्वतःच्या मुला मुलींची आंतरजातीय लग्न करून त्यांनी जातीच्या अभैध भिंती तोडल्या आहेत. समाजात एक नवा पायंडा घातला, समाज व्यवस्थेला हादरा दिला आहे. डॉ. महेश कळंबकर सरांनी आंतरजातीय विवाह वधुवर सुचक केंद्र अतिशय यशस्वीरित्या चालवले व या केंद्राद्वारे त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह घडून आणले.
नवे मित्र जोडणे नवे अनुभव  घेणे विविध चळवळी सोबत अटॅच होणे, संस्कृती, रूढी ,परंपरा यांचा अभ्यास करणे व त्यामधून एक नवा सम्यक दृष्टीकोन निर्माण करणे, यासाठी ते प्रसिद्ध झाले. वेगवेगळ्या जाती समूहातील लोकांना भेटून त्यांनी विचाराचे आदान प्रदान केले व अंधश्रद्धेवर खुल्या मनाने प्रहार केले. जग खूप सुंदर आहे त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकले तर जीवन कठीण व दुःखमय होते , म्हणून त्यांनी जनजागृती करूनवैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे काम केले.
महेश कळंबकर सरांना गावाकडील डोंगरदऱ्या वृक्षवेली मेगर्जना नेहमी साद घालत असतात त्याचा थोडाफार आस्वाद घेण्यासाठी ते नांदेड येथील एग्रीकल्चरल स्कूल शेतात फिरत असतात. निसर्गाचे व त्यांचे नाते अतूट उत्कट आहे .वृक्षवेली, पशुपक्षी त्यांच्याशी संवाद साधतात असे त्यांना वाटते. प्राणी ,वनस्पती पर्वतरांगा यामधून खळखळणारे झरणे , यामध्ये रमणे त्यांना खूपच आवडते.त् मनाचा व शरीराचा समतोल निसर्गातच राखला जातो. निसर्गाच्या सानिध्यातच मनुष्याचे जीवन फुलते ,बहरते आनंददायी व समृद्ध होते, निसर्गातच आपला भावनिक, मानसिक, शारीरिक विकास साधला जातो अशी त्यांची धारणा आहे.
काळाच्या गतीचक्रात जीवनकलहात हा कळंबकर म्हणजेच माळी सर किती पुढे गेलेले आहेत, त्यांचे व्यक्तिमत्व किती प्रेरणादायी आहे, तसेच प्रभावी, परखड  आहे ,हे आपल्याला दिसते. असं म्हटल्या जाते की झोपल्यावर पडणारी स्वप्न खरी नसतात ,स्वप्न ती खरी असतात की जी तुम्हाला झोपू देत नाही, प्रत्यक्षात माळी सरांनी अनेक स्वप्न पाहिली व ती पूर्ण करण्याकरता जीवन जगत राहिले . नेट सेटचा प्रश्न महाराष्ट्र पातळीवर नेऊन त्यांनी यशस्वीपणा पणे लढा दिला व तो प्रश्न मार्गी लावला. माळी सरांच्या बोलण्यात त्यांच्या मध्ये एक वजन आहे अतिशय प्रभावीपणा व शब्दशक्ती द्वारे ते बोलताना आपल्याला दिसते. म्हणून एक कवी म्हणतो
वो बात करो पैदा तुम अपनी जुबानो मे ,दुनिया भी कहे कुछ है भीम के दिवानो मे

आयुष्याच्या या ऊन सावलीच्या खेळात चढउतारामध्ये ते प्रेमात सुद्धा पडतात ,प्रेमाची परिभाषा काय असते यावरही ते भाष्य करतात.   प्रेमाचं सरोवर खरोखर खूप अद्भुत, रम्य व अनुपम असतं, त्यामध्ये नौका विहार केला म्हणजे आपल्या भावभावनांचे अनेक स्पेक्ट्रम आपल्या मन पटलावर उमटतात.
व्हॅलेंटाईन डे पुन्हा त्यांच्या आयुष्यामध्ये येतो ,प्रगती करत करत त्यांनी प्रेमाची नातेही विकसित केले, यामध्ये त्यांची दिवाणगी ,बेखुदी आपल्याला दिसून येते त्यांचीही प्रेमाच्या शिखरावर आरुढ होऊन केलेली भ्रमंती भ्रमंती जगावेगळी आहे
डॉ. फ्रीडम यांनी माझ्या सायंटिफिक भाई की कविता नावाचा कवितासंग्रह देखील प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये निर्धार नामाच्या कवितेमध्ये ते लिहितात “निर्धार”
तन माझं ,मनही माझं  ,
मी माझाच राहत नसे !
वेडाच मी, लागले
वेड्याला बघ तुझेच पिसे …
माळी सरांची दुसरी” संध्या” कविता खूप काही सांगून जाते ते म्हणतात
नाजूक गाली तुझ्या ग संध्या,
हजारो रंगछटांची अप्रतिम लाली !
कोणी केली उधळण रंगाची ,
क्षितिजा सवे तू खेळतेस होळी !

. गाडी, बंगला असण्यापेक्षा  आपण किती लोकांच्या हृदयाची तार छेडली, किती लोकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य  आणले, किती जणांना सन्मानाच्या, सदाचाराच्या मार्गावर आणले, हे महत्त्वाचे आहे .त्यांची ही प्रदीर्घ वाटचाल कारकीर्द खरोखर उल्लेखनीय व यशस्वी राहिलेली आहे.
ते प्रभावी लेखक सुद्धा आहेत, त्यांचा लेखन मार्गही आनंददायी व विचाराला चालना देणारा आगळावेगळा आहे. त्यांनी “माझ्यासायंटिफिक बायकी कविता” हा काव्यसंग्रह “फुले आंबेडकर प्रवाह” हा वैचारिक ग्रंथ , “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आई शिक्षक दिनोउत्सव” हे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. आई ही पहिली शिक्षिका असते, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या समाजाच्या आई आहेत, आणि त्याचबरोबर शिक्षिका आहेत .प्रत्येक शिक्षकांमध्ये आईत्व निर्माण झालं पाहिजे आणि आईच्या मायेन प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे ,याचा आदर्श म्हणजे क्रांतीज्योती सावित्री आई फुले. त्यांची जयंती ही आई आणि शिक्षक यांचा सन्मान करणारी म्हणून आई शिक्षक दिन मधून साजरी करावी, अशा प्रकारचं सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाला आई आणि शिक्षकाचे महत्त्व सांगणारा म्हणून या ग्रंथाचा आपणाला उल्लेख करता येईल. समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम त्यांच्या या पुस्तकानी केले आहे .
आयुष्याच्या या सेकंड ईनिनिंगमध्ये डॉ. फ्रीडम उर्फ महेश माळी सर निश्चितच यशस्वी होतील. आपण जर महेश कळबंकर सरांना बघितले तर ते साठ वर्षाचे वाटत नाही कारण एक पॉझिटिव्हिटी ,सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या प्राध्यापकाचे वय नेहमीच कमी असणार आहे, शरीराने जरी आपण थकलो तरी मनाने तरुण असणं खूप महत्त्वाच आहे. आपण त्यांच्याकडे बघितले की एक साठ वर्षाच तरुण व्यक्तिमत्व आपल्यासमोर दिसते.
Age is not the mind over matter if you don’t mind it doesn’t matter.
आयुष्य कधीच थांबत नसतं ते निरंतर सुरू असतं, थांबणे त्याला माहिती नसतं. नवी आशा, नवी दिशा, नवी उमेद ,तमन्ना घेऊन ते वाटचाल करत असते. नदीच्या पाण्यातून एक पाय काढून ,आपण दुसरा टाकला की ते पाणी बदललेलं असतं. निसर्गाचा नियम सतत बदलणे हा आहे. नव्याने जगण्याची उमेद निर्माण करत आयुष्य आगेकुच करत असतं. डॉ. महेश कळंबकर सरांच्या बाबतीमध्ये ही वाटचाल नक्कीच सुखद व आनंददायक हेल्दी व आयुष्यातील स्वप्न साकारणारी असणार आहे. नवे क्षितीज ,नवे स्वप्न ते रंगूऊ शकतात व या डिजिटल युगात नव्या स्वप्नांना बहर आणू शकतात. उत्साहाची नवी उमेद नवी सकाळ स्मिथ हास्य करून रोज ते आपल्या आयुष्यात आल्हाददायी आनंद व्यक्त करू शकतात. सकाळी फिरायला गेल्यानंतर सूर्योदय बघणे, फुलणारी फुल बघणे पक्षांचे गुंजन ऐकणे, बहरलेले झाड बघणं वृक्षवेली बघणं किंवा सायंकाळचा सूर्यास्त बघणं हे सुद्धा मनाला प्रसन्न व चैतन्यमय करते.

मानवी जीवन हे वाहत्या नदीसारखे प्रवाही आहे विविध ठिकाणी वळण घेत ते प्रगतीचा मार्ग शोधत आगे कूच करत असते. डॉ.महेश कळबंकर सरांचे जीवन सुद्धा असेच प्रवाही आहे. आजच्या या वर्तमान स्थितीमध्ये ज्ञानाची क्षितिज खूप सहस्त्रपटीने विस्तारलेली आहेत,  त्याला ते समजून घेत आहेत. जीवनाची मूल्य अमुलाग्रपणे बदललेली आहेत,मेट्रो सिटी मध्ये लाईप स्टाईल पराकोटीची बदललेली आहे ,यामध्ये आपल्याला आपल्या जुन्या जीवन पद्धतीमध्ये बदल करणे क्रमप्राप्त आहे. सर या बदललेल्या परिस्थिती सोबत जुळवून घेऊन आधुनिकतेची कास धरत आहेत. त्यांच्या जीवन कर्तुत्वाकडे व कार्याकडे बघून अनेक विद्यार्थी प्रेरणा घेऊन उज्वल भविष्याकडे वाटचाल करतील असे वाटते.
त्यांच्या या सेवानिवृत्तीनंतरच्या सेकंड इनिंग मध्ये त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.
प्रा. डॉ. अनिरुद्ध बनसोडे.
सायन्स कॉलेज, नांदेड

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.