विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराबाबत माहिती मिळणार एकाच ठिकाणी
23 फेब्रुवारीला करिअर मार्गदर्शन शिबीर, 24 फेब्रुवारीला नमो महारोजगार मेळावा • नमो महारोजगार मेळाव्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन • स्वयंरोजगाराबाबत तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन; स्टार्टअप, शासकीय योजनांविषयी प्रदर्शन
*
•
लातूर दि. 19 (जिमाका): मराठवाड्यातील युवक-युवतींना लातूर येथे 23 व 24 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळाव्यामुळे रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे. लातूर शहरातील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर आयोजित या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी https://nmrmlatur.in या संकेतस्थळवर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.
युवक-युवतींना व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत माहिती देण्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ज्ञ व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन आणि अनुभव कथन करणार आहेत. तसेच व्यवसाय, स्वयंरोजगाराची निवड करीत स्टार्टअप उद्योग, व्यवसायांची माहिती देणारी विविध दालने याठिकाणी उभारण्यात येणार आहेत. स्वयंरोजगारासाठी, उद्योगासाठी सहाय्य करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महामंडळे आणि बँकांची स्वतंत्र दालने राहतील.
*नमो महारोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा*
नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील विविध ठिकाणहून उद्योजक उपस्थित राहून मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. यासाठी 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 पासूनच लातूर शहरातील बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच विविध विषयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय (सर्व ट्रेड) आदी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी https://nmrmlatur.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.
*****