शिवचरित्रावर आधारित खुल्या रांगोळी स्पर्धेचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून कौतुक
विजेत्या तीन स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण

महासंस्कृती महोत्सवाचा समारोप जिल्हा प्रशासनाने मानले नागरिकांचे आभार
नांदेड (जिमाका) दि. 19 :- नांदेडच्या 15 ते 19 फेब्रुवारी काळातील महासंस्कृती महोत्सवाचा आज समारोप झाला. शेवटच्या टप्प्यात 18 ते 19 फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनच्यावतीने शिवचरित्रावर आधारित भव्य खुल्या रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन आयटीआय येथे केले होते. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या रांगोळी प्रदर्शनास भेट देवून सुंदर, रेखीव नानाविध स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळ्या पाहून स्पर्धकांचे कौतुक केले. या महोत्सवात सहभागी झालेल्या कलाकारांचे व प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, आयटीआयचे प्राचार्य एस.व्ही.सूर्यवंशी, उपप्राचार्य व्हि.डी.कंदलवाड, एम.जी.कलंबरकर, सचिन राका, मनिष परदेशी, धर्मेद्रसिंघ सिलेदार, आर.जी.कुलकर्णी फारुकी वासे यांची उपस्थिती होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कुलकर्णी व सचिन राका यांनी केले तर आभार उपप्राचार्य व्हि.डी.कदंलवाड यांनी मानले.
या रांगोळी स्पर्धेचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही प्रसंगावर नेमून दिलेल्या जागेत रेखीव व सुबक रांगोळी काढणे, असा असणार होता. 18 व 19 फेब्रुवारी या दोन दिवशी ही स्पर्धा संपन्न झाली. यात एकशे वीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी विशाल पांडे यांना दहा हजार रुपये रोख व सन्मानपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक मुनिराज भीमराव पैठणे यांना रोख पाच हजार रुपये व सन्मानपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक सीमा कपिंजल महाजन यांना रोख तीन हजार रुपये व सन्मानपत्र व सन्मानचिन्ह काल संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवून गौरव करण्यात आला.
0000