जिल्हा परिषद शाळेतील गहाळ झालेल्या विविध शालेय साहित्या ची माहिती उपलब्ध करून द्या
रिपब्लिकन सेनेचे मानवत तालुकाध्यक्ष दिपक ठेंगे यांची गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विविध शालेय साहित्य शाळेतून गायब झाले असून त्या सर्व साहित्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून द्या अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे मानवत तालुका अध्यक्ष दिपक भाऊ ठेंगे यांनी मानवत पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे १८ जानेवारी रोजी केली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील नवा मोंढा परिसरातील जिल्हा परिषद शाळेत अनेक क्रीडा साहित्य लोखंडी पोल, लोखंडी बेंच, खिडक्या, दरवाजे आदी साहित्य गहाळ झाले आहे. कुठे गेले हे साहित्य ? शाळेत जाऊन विचारणा केली असता शाळेत रंग रंगोटी सुरु आहे असे म्हणून सदरील प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कोणतीही वस्तू खरेदी – अथवा विक्री करावयाची असल्यास शालेय व्यवस्थापण समितीची परवानगी घ्यावी लागते व १ हजार रुपये पेक्षा अधिक कोणतीही वस्तू विक्री करता येत नसताना सर्व नियम पायदळी तुडवत या सर्व वस्तू विकण्यात आल्या आहेत. तसेच विदयार्थ्यांना बसण्यासाठी असलेले शाळेतील १०० बॅंचेस दुरुस्तीचा नावाखाली विकली गेली आहेत त्याच बरोबर विद्यार्थ्यांना भोजन करण्याच्या ४० ते ५० स्टील प्लेट या गंजल्या गेल्याच्या नावाखाली विक्री केल्या आहेत.
शाळेच्या आवारातील बहुतांश वृक्ष तोडून विकली आहेत ही सर्व माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा २२ जानेवारी रोजी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक ठेंगे यांनी शिक्षण विभागाला एका निवेदनाद्वारे दिला आहे.
***