*ढेमसा, दंडारच्या तालावर रंगली दिवाळी; आदिवासी बांधवांच्या जीवनशैली, संस्कृती आणि समस्यांचा घेतला आढावा
*किनवट : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि माणसांना जोडणारा सण! मात्र, या आनंदाच्या प्रकाशापासून आजही अनेक आदिवासी पाडे विकासाच्या बाबतीत दूर आहेत. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी, त्यांची संस्कृती समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी किनवट तालुक्यातील वरगुडा या दुर्गम आदिवासी गावात मुक्काम करत अनोख्या पद्धतीने **’दिवाळी संवाद’** साधला.
वरगुडा गावात पोहोचण्यासाठी तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता नाही. डोंगर चढून, पायवाटेने प्रवास करत या गावात पोहोचावे लागते. आधुनिक विकासाच्या गप्पा सुरू असताना या गावापर्यंत साधा रस्ताही पोहोचलेला नाही, ही वस्तुस्थिती मनाला अस्वस्थ करणारी आहे. मात्र, याच दुर्गम वाटेने प्रवास करत विठ्ठल पावडे यांनी आदिवासी बांधवांच्या दारात दिवाळीचा आनंद पोहोचवला.
डोंगराच्या उंचीवर वसलेले हे गाव म्हणजे निसर्गाचे एक सुंदर रूप! सर्व घरे कुडाची, आजूबाजूला हिरवीगार वनराई, पशुधन हाच जीवनाचा आधार आणि निसर्गाशी घट्ट नाते जोडलेली माणसे. गावापासून काही अंतरावर असलेल्या उंचावरील इरा (पाण्याचा नैसर्गिक जलस्रोत) येथे मुबलक पाणी आहे. पशुपालनावर आधारित जीवन जगणारा हा आदिवासी समुदाय आधुनिक जगाच्या धावपळीपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात समाधानाने आपले आयुष्य जगत आहे.
या संवादादरम्यान गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. आदिवासींची जीवनशैली, त्यांची बोलीभाषा, परंपरा, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते आणि रोजगार अशा विविध विषयांवर माहिती जाणून घेण्यात आली. विशेषतः महिलांशी संवाद साधताना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या भेटीचे सर्वांत भावनिक आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे रात्री आदिवासी बांधवांसोबत अनुभवलेली त्यांची समृद्ध लोकसंस्कृती! ढेमसा आणि दंडार या पारंपरिक नृत्यांच्या तालावर विठ्ठल पावडे यांनीही सहभाग घेतला. कोणताही औपचारिकपणा नाही, कोणतेही व्यासपीठ नाही, कोणताही राजकीय अभिनिवेश नाही… फक्त माणसांमधील माणुसकी, आपुलकी आणि संस्कृतीशी जोडलेले नाते! दिवाळीचा खरा आनंद याच क्षणांत अनुभवायला मिळाला.
यावेळी तालुकाध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, आदिवासी नेते डॉ. पुंडलिक आम्ले, राजीव गांधी पंचायत राजचे राज्य सचिव ईश्वर चव्हाण, कुणाल गजभारे, संतोष व्हडगीर उपस्थित होते. गावातील वैभव, लिंगोजी यांच्यासह तरुणांनी गावाची संस्कृती, परंपरा, जीवनशैली आणि समस्यांची सविस्तर माहिती दिली.
या भेटीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे **आदिवासी समाजाकडे निसर्गाशी जगण्याची समृद्ध जीवनदृष्टी आहे; मात्र त्यांच्या गावापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याची जबाबदारी व्यवस्थेची आहे.** त्यांच्या संस्कृतीचे जतन करत शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचा प्रकाशही त्यांच्या जीवनात पोहोचला पाहिजे.
दिवाळीच्या निमित्ताने केवळ दिवे लावणे नव्हे, तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यातील अंधार समजून घेणे, त्यांच्या आनंदात सहभागी होणे आणि त्यांच्या प्रश्नांना आपले प्रश्न मानणे, हाच या दिवाळी संवादाचा खरा उद्देश होता.
**डोंगर चढून वरगुड्यापर्यंत पोहोचलेली ही पावले केवळ एका गावाला भेट देण्यासाठी नव्हती, तर आदिवासी समाजाच्या सुख-दुःखाशी नाते जोडण्यासाठी होती. कारण लोकनेतृत्व हे केवळ व्यासपीठावरून नव्हे, तर माणसांच्या दारात जाऊन, त्यांच्या सोबत राहून आणि त्यांचे जगणे समजून घेतल्याने सिद्ध होते!**
