दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काटकसरीने ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सव साजरा करा!
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे आवाहन; १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान सायन्स कॉलेजमध्ये कलाविष्कारांचा उत्सव सिने अभिनेते भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून अनावश्यक खर्च टाळण्यासह सामाजिक संवेदनशीलता जपत युवक महोत्सव साजरा करण्याचे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ चे आयोजन १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान नांदेड येथील सायन्स कॉलेजमध्ये करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेशही दिला जाणार आहे.
नांदेड : डॉ. प्रवीणकुमार सेलूकर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ ची माहिती देण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेजमधील स्वामी रामानंद तीर्थ स्मारक सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महोत्सवात अनावश्यक झगमगाट टाळावा, शाल, पुष्पगुच्छ आदींवर होणारा खर्च कमी करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. चासकर यांनी केले आहे. तसेच स्थानिक परीक्षक आणि सहाय्यकांना देण्यात येणाऱ्या मानधनातील काही रक्कम संबंधित मान्यवरांनी स्वेच्छेने परत करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा, असेही त्यांनी सुचविले आहे. सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श निर्माण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
३० कलाप्रकारांत विद्यार्थी दाखविणार प्रतिभा
‘ज्ञानतीर्थ-२०२६’ या युवक महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, वाद्य, ललित कला आणि महाराष्ट्राच्या लोककलांशी संबंधित सुमारे ३० कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शास्त्रीय गायन, वादन, सुगम संगीत, समूहगायन, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, एकांकिका, मूक अभिनय, वादविवाद, वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, कोलाज, पोस्टर मेकिंग, रांगोळी, छायाचित्रण, मेंदी, मातीकाम, पोवाडा, लावणी, लोकसंगीत आणि प्रबोधनात्मक जलसा अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेचे दर्शन घडणार आहे.या महोत्सवातून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्यातील सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यावरही भर दिला जाणार आहे.
वक्तृत्व स्पर्धेसाठी समकालीन विषय
महोत्सवातील वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘युद्ध नको बुद्ध हवा’, ‘अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि युवापिढीसमोरील आव्हाने’, ‘हवामान बदल : मानवी अस्तित्वासमोरील नवे आव्हान’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : मानवी अस्तित्वावरील विळखा’ हे चार विषय निश्चित करण्यात आले आहेत.या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक, पर्यावरणीय आणि तंत्रज्ञानविषयक प्रश्नांवर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता युवकांमध्ये सामाजिक जाणीव आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.
१६ ऑक्टोबरला उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती
‘ज्ञानतीर्थ-२०२६’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचे उद्घाटन १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सायन्स कॉलेजच्या सानेगुरुजी मुख्य सभागृहात होणार आहे. उद्घाटनप्रसंगी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले उपस्थित राहणार असून, कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ पार पडणार आहे.यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सी. ए. डॉ. प्रवीण पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र दादा चव्हाण आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड. प्रदीप नागापूरकर उपस्थित राहणार आहेत.
१९ ऑक्टोबरला समारोप व बक्षीस वितरण
महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सायन्स कॉलेजच्या सानेगुरुजी मुख्य सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. निलेश रोहन आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन उपस्थित राहणार आहेत. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल अम्रावाल आणि सचिव सौ. शामल पत्की यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
युवकांच्या कलागुणांना व सामाजिक जाणिवांना प्रोत्साहन
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर आणि युवक महोत्सवाचे सचिव डॉ. प्रशांत सुतकर यांनी विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.कला, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा समन्वय साधणारा ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच काटकसर, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणार आहे. दुष्काळी परिस्थितीचे भान राखत सांस्कृतिक उत्सव साजरा करण्याचा विद्यापीठाचा हा उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
