ताज्या बातम्या

मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात वैचारिकतेचा पाया भक्कम करण्यात ग्रंथालय चळवळीचे योगदान* – प्रा. डॉ. महेश जोशी

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथोत्सवात विशेष परिसंवाद

मराठवाडा मुक्ती लढ्याचे मोल युवकांपर्यंत
पोहोचविण्याचा निर्धार

नांदेड (mcrnews) दि. 20 :- कोणत्याही मुक्तीच्या चळवळीत विचाराचा गाभा हा खूप मोलाचा असतो. त्यादृष्टिने विचार करता मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीचा पाया हा समृद्ध वैचारिकतेवर मजबुत झालेला आहे. मराठवाड्यातील बलवंत वाचनालयासारख्या ग्रंथालयांनी व याचबरोबर भूमिगत राहून असंख्य लोकांनी ग्रंथाच्या माध्यमातून मुक्तीचा विचार गावोगावी पोहोचविल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. महेश जोशी यांनी केले.

‘नांदेड ग्रंथोत्सव 2022’ उपक्रमाअंतर्गत “मराठवाडा मुक्ती संग्रामातील संवेदनांचे काठ”या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात डॉ. पृथ्वीराज तौर, प्रा. प्रतिक्षा गौतम तालंखेडकर यांनी सहभाग घेतला. माजी आमदार गंगाधर पटने यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी या चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप केला.

मुक्तीच्या लढ्यामध्ये लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या सशक्ती करणाचे बिजे महत्वाची असतात. त्यादृष्टीने स्वामी रामानंद तीर्थ यांनी निझामाच्या विरोधासह लोकशाहीच्या सार्वभौमत्वाला अधिक प्राधान्य दिले. मराठवाडा मुक्तीच्या इतिहासाकडे पाहतांना जहाल, मवाळ, आर्य समाज व इतर विविध संस्थांच्या योगदानाला समजून घेतले पाहिजे, असे प्रा. डॉ. महेश जोशी यांनी स्पष्ट केले.

*निझामाची भाषिक दडपशाही हा सुद्धा अत्याचारच*
– प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर

मराठवाडा मुक्तीच्या लढ्याकडे पाहतांना निझामाने उर्दूच्या नावाखाली मराठी, तेलगू, कन्नड व इतर बोली आणि मातृ भाषेला दुर्लक्षीत करून केवळ उर्दू भाषेतूनच शिक्षणाची केलेली शक्ती ही दडपशाहीचाच एक भाग होता, असे प्रतिपादन प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले. एकाबाजुला शिक्षणापासून ते त्याच्या शासकिय कामकाजात उर्दूची सक्ती करायची, लोकांच्या शेतजमिनीसह इतर कागदपत्रांची उर्दू भाषेतून नोंद करायची, ही एक प्रकारची दमनशाही होती, असे त्यांनी सांगितले. त्या काळी जिथे कुठे छोटी मोठी ग्रंथालय असो, साहित्यिकांच्या संस्था असतो, या सर्वांनी मराठवाड्याच्या मुक्तीसमवेत भाषिक हक्कासाठी दिलेले योगदान आपण समजून घेतले पाहिजे, असे तौर यांनी सांगितले.

*मुक्ती लढ्याच्या भरण-पोषणात महिलांचे योगदान*
– प्रा. प्रतिक्षा गौतम तालंखेडकर

समाजातील सर्वच घटकांनी त्याग दिल्यामुळे स्वातंत्र्य मिळू शकले. यात महिलांनी आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देऊन मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात शस्त्र पुरविणे आणि ने-आण करणे सारखी महत्वपूर्ण जबाबदारीही पार पाडल्याचे प्रा. प्रतिक्षा गौतम तालंखेडकर यांनी सांगितले. दगडाबाई शेळके या लष्करी वेषात हातात बंदुका घेऊन फिरल्या. सहकाऱ्यांना धीर देण्याचे काम त्यांनी केले. गंगुबाई देव ही महिला आपल्या मुलीचा मृत्यू झालेले असतांनाही तिचे प्रेत झाकुण ठेवत कार्यक्रत्यांच्या व्यवस्थेसाठी पुढे सरसावली. नांदेड जिल्ह्यातल्या असंख्य महिलांनी पुरुषांना खंबीर साथ दिल्यामुळे हा लढा अधिक व्यापक झाला, असे त्या म्हणाल्या.

*लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी युवकांपर्यंत लढ्याचे मोल पोहोचणे आवश्यक*
– जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार

आज जे पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांनी कधीकाळी त्यांच्या लहानपणी अंगाई गितासमवेत रझाकाराने केलेल्या अत्याचाराच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. पिढ्या बदलल्या. नव्या पिढी पर्यंत आपल्या पूर्वजांनी जे कष्ट, हाल-अपेष्टा सहन करून स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचे मोल पोहचविणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनस्तरावरून यासाठी विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताला स्वातंत्र्य मिळूनही केवळ निझामाच्या हट्टापायी 11 महिने विलंबाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी आपल्या पूर्वजांना वेगळा संघर्ष करावा लागला. रझाकाराच्या सैन्याला वाकून नमस्कार केला नाही म्हणून अनेकांनी त्यांचे फटके अंगावर घेतल्याचे वयोवृद्ध आपल्या बोलण्यात सहज सांगून जातात. हा लढा व यातील बारकावे युवकांपर्यंत पोहचावे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रत्येक तालुका पातळीवर मराठवाडा मुक्तीचा लढा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी विविध संस्थांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. सशक्त लोकशाहीसाठी, स्वातंत्र्यासाठी दिलेल्या या लढ्यात उमरी बँक लुटीचे अनन्य साधारण महत्व आहे. ही घटना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच 1948 ची आहे. ही बँक निझामाविरुद्ध लढा देता यावा, लढण्यासाठी शस्त्र मिळावी, त्याला बळ मिळावे यादृष्टीने ही बँक लुटली. यातील प्रत्येक पैशाचा हिशेब देऊन, याची पडताळणी निझामाच्या नोंदीसह करून दिल्यानंतरच खऱ्या अर्थाने उमरी बँकेच्या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी मुक्त श्वास घेतल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मृतीचिन्ह व पुस्तक देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अर्जुन सुर्यवंशी यांनी केले. तगडपल्ले यांनी लक्ष्मीकांत तांबोळी लिखीत मराठवाडा गीत सादर केले.
00000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button