शवंत ‘ मध्ये इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न*
नांदेड :(दि. ८ ऑक्टोबर २०२६)
यशवंत महाविद्यालयातील इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. उद्घाटक व प्रमुख अतिथी राष्ट्रसंत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत मालेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. गजानन सोडनार होते.
याप्रसंगी इतिहास अभ्यास मंडळाचे तसेच ‘नंदगिरी’ भित्तिपत्रकाच्या फलकाचे विमोचन करण्यात आले.
प्रमुख अतिथी डॉ. गजानन सोडनार यांनी, इतिहास हा विषय केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न ठेवता क्षेत्रभेटी, ऐतिहासिक स्थळांना भेटी आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून शिकविल्यास विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची गोडी निर्माण होईल, असे प्रतिपादन केले. इतिहासाच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना भूतकाळाचे चिकित्सक आकलन होण्याबरोबरच वर्तमान समजून घेण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी प्राप्त होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज ओळखावी, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी,विद्यार्थ्यांनी इतिहासाच्या अभ्यासासोबतच संशोधनाची आवड जोपासली पाहिजे. संशोधन करताना प्राथमिक स्वरूपाच्या मूळ कागदपत्रांचा, अभिलेखांचा व अन्य ऐतिहासिक साधनांचा शोध घेऊन चिकित्सक पद्धतीने अभ्यास केल्यास संशोधन अधिक दर्जेदार आणि वस्तुनिष्ठ ठरते. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची, पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढण्याची आणि इतिहासाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय विकसित करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकात इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे यांनी, इतिहास अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास डॉ. संगीता शिंदे (ढेंगळे), डॉ. साईनाथ बिंदगे, प्रा. राजश्री भोपाळे तसेच विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.अजय गव्हाणे, संदीप पाटील, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी परिश्रम घेतले.
