नांदेड:( दि. १३ ऑक्टोबर २०२६)
अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करण्याच्या उद्देशाने यशवंत महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्या रमन क्लबतर्फे जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त ‘रॉकेट रिव्होल्यूशन २०२६’ या संकल्पनेवर आधारित पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे परीक्षण डॉ. एन. एल. इंगळे आणि डॉ. शिवराज सिरसाट यांनी केले. रमन क्लबच्या अध्यक्ष आरुबा झिक्रा आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका अर्मिश हुरैन सरवारी यांनी जागतिक अंतराळ सप्ताहाचे महत्त्व स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे, संशोधनाभिमुख उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आणि आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडींबाबत जिज्ञासा कायम ठेवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता वैज्ञानिक संकल्पना समजून घेऊन त्यांचा सर्जनशील पद्धतीने अभ्यास करावा, असेही त्यांनी अधोरेखित केले.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ मोहिमा, चांद्रयान-२, गगनयान, मंगळ संशोधन, अंतराळ पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्पेसएक्सचे अंतराळ तंत्रज्ञानातील योगदान आणि अंतराळातील कचऱ्याचे व्यवस्थापन अशा समकालीन विषयांचा समावेश होता. स्पर्धेत एकूण २२ पोस्टर्स सादर करण्यात आली.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.अर्जुन गुरखुदे, डॉ. योगेश नकाते, डॉ. संदीप राठोड यांनी सहकार्य केले तसेच डॉ.अजय गव्हाणे, संदीप पाटील, गजानन पाटील, प्रकाश शिंदे, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.
