नांदेड, दि. १३ : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सकल मातंग समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने रविवारी शहरात विराट आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. हजारो समाजबांधवांच्या सहभागामुळे नांदेड शहर घोषणांनी दणाणून गेले. शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चाला संबोधित करताना वक्त्यांनी नांदेड जिल्ह्याने मातंग समाजाच्या आंदोलनांना सातत्याने मोठे बळ दिल्याचे सांगितले. आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील सर्व घटकांना समानपणे मिळावा, यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याची भूमिका मांडण्यात आली. मातंग समाज गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून या मागणीसाठी संघर्ष करीत असून, आता शासनाने विलंब न करता निर्णय घ्यावा, असा इशाराही देण्यात आला. येत्या २९ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोर्चात अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीबाई साठे,कैलास भालेराव, अजिंक्य चांदणे,ॲड.मिलिंद आव्हाड, माजी आमदार ससाणे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार अविनाश घाटे, सचिन साठे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार सुनील कांबळे ,पंडित वाघमारे, कैलास कंधारे, सुकुमार कांबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, गणपत भिसे, राजेश घोडे आणि विष्णू कसबे यांनी उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या.हा महामोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल मातंग समाज नांदेड जिल्हा नियोजन समितीतील मारोती वाडेकर, उमेश पवळे, गणेश तादलापुरकर,लालबाजी घाटे,सतीश कावडे,परमेश्वर बंडेवार,सूर्यकांत तादलापूरकर, भारत सरोदे, माधव डोंपले, नवनाथ वाकोडे, सोनू वाघमारे, दयानंद बसवंते,ईश्वर जाधव,नामदेव कांबळे,रामराव सूर्यवंशी, केशव शेकापूरकर, ॲड. प्रसाद रानवळकर, प्रीतम गवाले, आदींनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक मारोती वाडेकर यांनी केले. आभार गंगाधर कावडे यांनी मानले.
मोर्चामुळे मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला नांदेडमध्ये व्यापक जनसमर्थन मिळाल्याचे चित्र दिसून आले. आता शासन या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
