नांदेड: दिनांक10 सप्टेंबर2026 (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना, तांत्रिक कौशल्ये आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारे प्रकल्प प्रदर्शन (Project Exhibition) विद्यापीठ परिसरात उत्साहात आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेसचे संचालक डॉ. निलेश के. देशमुख यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्प प्रदर्शनामध्ये स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांनी संगणकीय तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सॉफ्टवेअर विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुमारे ३८ सॉफ्टवेअर प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांची संकल्पना, कार्यपद्धती, तांत्रिक वैशिष्ट्ये तसेच त्यांचा प्रत्यक्ष जीवनातील उपयोग यांचे सादरीकरण केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानासोबतच समस्या सोडविण्याची क्षमता, टीमवर्क, संवादकौशल्य आणि प्रकल्प व्यवस्थापन कौशल्यांना चालना मिळत आहे. शैक्षणिक ज्ञानाला प्रत्यक्ष औद्योगिक गरजा आणि वास्तविक समस्यांशी जोडणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे.
विद्यार्थ्यांनी विकसित केलेले प्रकल्प संभाव्य उद्योग, विक्रेते (Vendors) आणि ग्राहक (Clients) यांच्यापर्यंत पोहोचवून भविष्यात विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्रत्यक्ष प्रकल्प, औद्योगिक अनुभव, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्याचा स्कूलचा प्रयत्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक प्रकल्प न करता “Real-world problem to real-world solution” या दृष्टिकोनातून काम करण्याची संधी मिळत आहे.
उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच उद्योगांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यानुसार उपयुक्त तांत्रिक उपाय विकसित करण्याची संधी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेसचे संचालक डॉ. निलेश के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी डॉ. गिरीश चौधरी, डॉ. पराग भालचंद्र, डॉ. सखाराम लोखंडे, डॉ. हणमंत फडेवार, डॉ. अर्चना साबळे, डॉ. सतीश मेकेवाड, डॉ. मकरंद वांगीकर, डॉ. महेश दारक, डॉ. मोहिनिश महामुने, शिवप्रसाद महाजन, माणिक मोरे आणि वैभव शिंदे यांच्यासह स्कूलमधील सर्व प्राध्यापकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
————————
