रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणारे AEDP अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध
नांदेड :प्रतिनिधी
बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित, उद्योगाभिमुख आणि रोजगारक्षम शिक्षणाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या शोधात वर्षानुवर्षे भटकंती करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योगक्षेत्राच्या गरजांशी सुसंगत कौशल्ये आत्मसात करावीत, या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे माननीय कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि माननीय प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) अंतर्गत अनेक अभिनव आणि रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
या अभ्यासक्रमांची विशेषता म्हणजे विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणाबरोबरच उद्योग, प्रयोगशाळा, बँका, संशोधन संस्था आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी पदवीधर होताच रोजगारासाठी सक्षम बनतील तसेच अनेक क्षेत्रांत स्वयंरोजगाराच्या संधीही निर्माण करू शकतील.
*आरोग्य क्षेत्रातील करिअरसाठी बी.एससी. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी*
आरोग्यसेवा क्षेत्रात प्रशिक्षित मेडिकल लॅबोरेटरी तज्ज्ञांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन जैविक शास्त्र संकुलामार्फत बी.एससी. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (MLT) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्र, रोगप्रतिकारशास्त्र, क्लिनिकल बायोकेमिस्ट्री, हिमॅटोलॉजी, पॅथॉलॉजी, आण्विक रोगनिदान, रक्तपेढी व्यवस्थापन आणि प्रयोगशाळा गुणवत्ता नियंत्रण यांचे सखोल ज्ञान दिले जाते.
विद्यार्थ्यांना अत्याधुनिक निदान उपकरणांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. विविध नमुन्यांचे परीक्षण, रोगनिदानासाठी आवश्यक चाचण्या, अहवालांचे विश्लेषण आणि गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी व खासगी रुग्णालये, निदान प्रयोगशाळा, संशोधन संस्था, रक्तपेढ्या, औषधनिर्मिती कंपन्या, सार्वजनिक आरोग्य संस्था तसेच आरोग्यविषयक संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. स्वतःची निदान प्रयोगशाळा सुरू करण्याची क्षमता देखील या अभ्यासक्रमातून विकसित होते.
*डेटा सायन्स : डिजिटल युगातील अमर्याद संधी*
आजच्या माहितीप्रधान युगात डेटा हे नवे इंधन मानले जाते. डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि निर्णय प्रक्रियेमध्ये डेटा सायन्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमार्फत सुरू करण्यात आलेला बी.एससी. डेटा सायन्स अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील आधुनिक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करतो.
या अभ्यासक्रमात पायथन प्रोग्रामिंग, सांख्यिकी, मशीन लर्निंग, जनरेटिव्ह एआय, डीप लर्निंग, डेटा व्हिज्युअलायझेशन, एमएलऑप्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग यांसारख्या विषयांचा समावेश आहे. उद्योगतज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा आणि पगारी अप्रेंटिसशिप यामुळे विद्यार्थ्यांना वास्तव उद्योगविश्वाचा अनुभव मिळतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डेटा अॅनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, एआय इंजिनिअर, बिझनेस अॅनालिस्ट, मशीन लर्निंग तज्ज्ञ अशा अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज : भविष्यातील तंत्रज्ञानाचे शिक्षण
जगभरातील उद्योग, आरोग्यसेवा, कृषी, वाहतूक आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) या तंत्रज्ञानांचा वेगाने वापर वाढत आहे. बी.एससी. AI आणि IoT अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देतो.
अभ्यासक्रमामध्ये मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स, स्मार्ट सेन्सर्स, क्लाउड नेटवर्किंग, एम्बेडेड सिस्टीम्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशन यांसारख्या विषयांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्पांद्वारे अनुभव दिला जातो. स्मार्ट उपकरणे, रोबोटिक्स आणि स्वयंचलित प्रणाली विकसित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये या अभ्यासक्रमातून विकसित होतात.
*डिजिटल कंटेंट आणि क्रिएटिव्ह रायटिंग : सर्जनशीलतेला व्यावसायिक दिशा*
डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे दर्जेदार कंटेंट निर्मितीला मोठी मागणी निर्माण झाली आहे. बी.ए. डिजिटल कंटेंट अँड क्रिएटिव्ह रायटिंग हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला आधुनिक डिजिटल जगाशी जोडतो.
कथा, कविता, ब्लॉग लेखन, पटकथा, जाहिरात लेखन, पत्रकारिता, सोशल मीडिया कंटेंट, पॉडकास्ट स्क्रिप्टिंग, वेब कंटेंट निर्मिती आणि डिजिटल स्टोरीटेलिंग यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी कंटेंट रायटर, कॉपीरायटर, डिजिटल मीडिया तज्ज्ञ, पत्रकार, सोशल मीडिया व्यवस्थापक किंवा स्वतंत्र लेखक म्हणून करिअर घडवू शकतात.
*बी.कॉम. बँकिंग अँड टॅक्सेशन : वित्तीय क्षेत्रातील करिअरची हमी*
भारतातील बँकिंग, वित्तीय सेवा आणि करप्रणाली क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी सातत्याने वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन बी.कॉम. बँकिंग अँड टॅक्सेशन हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमामध्ये बँकिंग व्यवहार, वित्तीय व्यवस्थापन, गुंतवणूक, विमा, जीएसटी, प्रत्यक्ष करप्रणाली, आर्थिक कायदे आणि लेखांकन यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये प्रशिक्षण मिळते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बँका, वित्तीय संस्था, करसल्लागार कार्यालये, लेखापरीक्षण संस्था तसेच स्वतःचे करसल्ला केंद्र सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होतात.
*औषधी वनस्पती तंत्रज्ञान : आरोग्य, संशोधन आणि उद्योजकतेचे संगम*
औषधी वनस्पतींवर आधारित उत्पादने, आयुर्वेद आणि नैसर्गिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व जागतिक स्तरावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर औषधी वनस्पती तंत्रज्ञान हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी निर्माण करणारा ठरत आहे.
या अभ्यासक्रमात औषधी वनस्पतींचे संवर्धन, वनस्पती जैवरसायनशास्त्र, वनस्पती चयापचय, आयुर्वेदिक तत्त्वे, औषधनिर्मिती, वनस्पतीजन्य सौंदर्यप्रसाधने, न्यूट्रास्युटिकल्स, औषधी उत्पादन विकास, गुणवत्ता नियंत्रण आणि उद्योजकता विकास यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना औषधी वनस्पती लागवड, प्रक्रिया उद्योग, हर्बल उत्पादन निर्मिती, संशोधन संस्था आणि आयुर्वेद उद्योगांमध्ये रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
*साखर आणि अल्कोहोल तंत्रज्ञान : उद्योगविश्वातील विशेष संधी*
मराठवाडा आणि महाराष्ट्रातील साखर उद्योगाची मजबूत पार्श्वभूमी लक्षात घेऊन बी.एससी. शुगर अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि अभियांत्रिकीशास्त्र यांचा समन्वय साधणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना साखर, इथेनॉल आणि जैवइंधन उद्योगांसाठी तयार करतो.
अभ्यासक्रमात साखर उत्पादन प्रक्रिया, अल्कोहोल निर्मिती, इथेनॉल उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक सुरक्षा, पर्यावरण व्यवस्थापन आणि जैवइंधन तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना साखर कारखाने, डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्प, अन्न व पेय उद्योग, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा, संशोधन संस्था तसेच देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचा लाभ घेऊन कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल करिअरची वाट निवडावी, असे आवाहन डॉ बी एस सुरवसे समन्वयक AEDP Programs यांनी केले आहे.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर :
“राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना केवळ पदवी देणे हे विद्यापीठाचे अंतिम उद्दिष्ट नसून त्यांना रोजगारक्षम, कौशल्यसंपन्न आणि आत्मनिर्भर नागरिक म्हणून घडविणे हे आमचे ध्येय आहे. याच विचारातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने AEDP अंतर्गत विविध उद्योगाभिमुख आणि रोजगारनिर्मिती करणारे पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्योग प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि उद्योजकतेची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः मराठवाड्यासारख्या प्रदेशातील युवकांना स्थानिक तसेच जागतिक रोजगार बाजारपेठेत स्पर्धात्मक बनविण्यासाठी हे अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. पदवीधर होताच विद्यार्थ्यांच्या हातात कौशल्य, रोजगार आणि आत्मविश्वास असावा, हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे.”
प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन :
“AEDP अभ्यासक्रम ही शिक्षण आणि उद्योग यांची प्रभावी सांगड घालणारी संकल्पना आहे. आज उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करणे ही उच्च शिक्षण संस्थांसमोरील मोठी जबाबदारी आहे. विद्यापीठाने सुरू केलेले एमएलटी, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बँकिंग अँड टॅक्सेशन, औषधी वनस्पती तंत्रज्ञान आणि शुगर अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव, अप्रेंटिसशिप आणि उद्योगक्षेत्रातील संपर्क उपलब्ध करून देतील. या माध्यमातून विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनतील. भविष्यातील रोजगार बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणारे ठरतील.”
——————————–
