एम सी आर
Uncategorized

भारतीय गायन क्षेत्रातील तेजस्वी तारा…आशा भोसले*

भारतीय चित्रपट संगीताच्या क्षेत्रात आपल्या चिरतरुण अशा जादुई आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या महान गायिका आशा भोसले यांचे निधन झाले असून ही संपूर्ण भारतीय चित्रपट क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी होय.त्यांच्या जाण्याने एक युग संपले, एक स्वर थांबला, पण त्यांनी गायलेली अजरामर गाणी सदैव जिवंत राहतील.
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये गायन क्षेत्रात जी काही अजरामर व्यक्तिमत्व होऊन गेले त्यामध्ये स्वर कोकिळा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, किशोर कुमार, मुकेश,मोहम्मद रफी, आशा भोसले,महेंद्र कपूर, येसूदास, मन्नाडे यांचा उल्लेख करावा लागतो. या सर्व दिग्गज गायकांमध्ये एक जिंदादिल आवाज ज्यांचा होता ते व्यक्तिमत्व म्हणजे आशा भोसले.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची लहान बहिण असलेल्या आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला . त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे प्रख्यात शास्त्रीय गायक आणि नाट्य संगीतकार होते. त्यामुळे घरातच संगीताचे वातावरण व संस्कार मिळाल्यामुळे लहान पनापासूनच त्यांना सुरांची ओळख झाली. मंगेशकर कुटुंबातील लता, अशा उषा , मीना व हृदयनाथ मंगेशकर या भावंडांनी आयुष्यभर संगीताची साधना केली.वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी ‘माझा बाळ’ या चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण केले. त्या काळात चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त यांचा दबदबा होता. अशा परिस्थितीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे हे अत्यंत कठीण होते. पण आशाताईंनी कधीही हार मानली नाही व अतिशय जिद्दीने स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. आशा भोसले या स्वतःच संगीताची व गायनाची जणू काही एक शाळाच होत्या. गायनामध्ये वेगवेगळे प्रयोग करणे हा त्यांचा स्वभाव होता.

आशा भोसले यांच्या जीवनात अनेक चढता आली. आयुष्यात येणाऱ्या अडचणी, वैयक्तिक संकटे, जबाबदाऱ्या या सर्वांशी संघर्ष करत त्यांनी एक स्वतःचा मार्ग तयार केला. संघर्ष हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता, पण त्यातूनच त्यांची जिद्द आणि आत्मविश्वास अधिक बळकट झाला. लता मंगेशकर व आशा भोसले या दोघीही अतिशय महान गायिका पण दोघांच्याही गायनामध्ये खूप फरक दिसतो. अतिशय परखड व स्पष्ट वक्त्या असणाऱ्या आशा भोसले अतिशय मिश्किल तथा हजर जबाबी होत्या.त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली. मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू,असामी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या 20 भाषांमधून 900 पेक्षा जास्त चित्रपटातून जवळपास 15000 गाणी त्यांनी गायलेली आहेत. त्यांनी एक दोन चित्रपटांमध्ये काम सुद्धा केलेले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील मीनाकुमारी, मधुबाला, नूतन पासून ते उर्मिला मार्तोंडकर पर्यंत त्यांनी आपला स्वर दिलेला आहे. वयाच्या 90 व्या वर्षी दुबई येथे जाऊनही त्यांनी गायनाचा कार्यक्रम उभ राहून पूर्ण केला हे त्यांचं वैशिष्ट्य होय.
1957-58 च्या सुमारास त्यांना एस डी बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी मिळाली आणि तेथून त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले. चलती का नाम गाडी, सुजाता, कालाबाजार, नौ दो ग्यारह यांसारख्या चित्रपटांमधील गाण्यांनी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण लवचिकता होती. त्यांचा आवाज बहुरंगी होता.शास्त्रीय गायनापासून गझल, लावणी, भजन, पॉप, कॅबरे, डिस्को सर्व प्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांनी स्वतःची छाप सोडली.ओ पी नय्यर यांच्यासोबतची त्यांची जोडी अफलातून ठरली. “आइये मेहरबाँ”, “जाइये आप कहाँ”, “वो हसीन दर्द दे ” यांसारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यानंतर आर डी बर्मन यांच्यासोबत त्यांनी नव्या संगीतशैलीचा प्रयोग केला. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “जाने जा” यांसारख्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावले.1981 साली उमराव जान या चित्रपटातून त्यांच्या गझल गायकीचा नवा पैलू समोर आला. “इन आखो की मस्ती के,“दिल चीज क्या है” ही गाणी आजही सर्वत्र ऐकली व गायली जातात.

आशाताईंनी किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश यांसारख्या महान गायकांसोबत अनेक अजरामर गाणी दिली. त्या काळातील “लता-आशा-किशोर-रफी-मुकेश”म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील सुवर्णयुग होते .हिंदी प्रमाणेच मराठी संगीत विश्वातही त्यांचे योगदान अनमोल आहे. “सांज ये गोकुळी”, “जिवलगा राहिले रे दूर”, “फुलले रे क्षण माझे”, “केव्हा तरी पहाटे””सांज ये गोकुळी”,” उषःकाल होता होता”,” नाच रे मोरा”,” रुपेरी वाळूत”,”मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश”,”गोम संगतीने”, “मी कात टाकली”, मी मज हरपून बसले ग”, यांसारखी गाणी आजही मनाला स्पर्श करतात.
त्यांनी सुरेश वाडकर, सुधीर फडके यांसारख्या अनेक गायकांसोबत काम केले.

आशा भोसले यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली ओळख निर्माण केली. कॅनडा, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांत त्यांनी कार्यक्रम केले. विविध परदेशी संगीतकारांसोबतही त्यांनी प्रयोग केले.त्यांचा “आशा अँड फ्रेंड्स” हा अल्बम प्रसिद्ध झाला ज्यात ब्रेट ली आणि संजय दत्त यांच्यासोबत त्यांनी गाणे गायले आहे, हा त्यांच्या प्रयोगशीलतेचा उत्कृष्ट नमुना आहे. किशोर कुमार हे त्यांचे अतिशय आवडते गायक होते. त्यांची मोठी बहीण असलेल्या लता मंगेशकर यांना त्या जगातील सर्वोत्कृष्ट गायिका मानत.

त्यांच्या संगीत क्षेत्रातील अलौकिक अशा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये पद्मविभूषण, अनेक राष्ट्रीय पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार,फिल्मफेअर पुरस्कार आणि चित्रपट क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा सन्मान त्यांना मिळाला.
एक बहुआयामी व्यक्तित्व असलेल्या
आशाताई केवळ गायिका नव्हत्या, तर त्या एक जिंदादिल, हसतमुख आणि जमिनीवर पाय असलेली व्यक्ती होत्या. गाणं सोबतच खाण्याची व खाऊ घालण्याची त्यांना खूप आवड होती.स्वयंपाकाची त्यांना विशेष आवड होती.
त्यांच्या आयुष्यात दुःखाचे अनेक प्रसंगही आले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्या नेहमी म्हणत,“संगीत माझा श्वास आहे, संगीत माझं दैवत आहे.” माझ्या नावातच आशा असून मी सदैव आशावादी आहे व माणसाने नेहमी आशावादी राहिले पाहिजे असं त्या नेहमी सांगत.

अशा या महान गायिकेने वयाच्या 92 व्या वर्षी 12 एप्रिल 2026 रोजी हृदयविकाराने अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने भारतीय संगीतसृष्टी पोरकी झाली आहे. आशा भोसले यांचे आयुष्य म्हणजे संघर्ष, जिद्द, प्रयोगशीलता आणि प्रतिभेचा अद्भुत संगम होता. त्यांनी हजारो गाण्यांमधून प्रत्येक भावनेला आवाज दिला आहे.प्रेम, विरह, आनंद, वेदना, भक्ती, उत्साह त्यांच्या आवाजात होता.त्यांच्या आवाजात एक जादू होती जी पिढ्यानपिढ्या लोकांना भुरळ घालत राहील.आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचे गाणे प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहे. अशा ह्या जगप्रसिद्ध महान गायिकेला विनम्र अभिवादन .🙏🙏🙏प्रा डॉ विजय नागोराव भोसले, रसायनशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड, मोबाईल क्र 9403067252

Share

Related posts

यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचे उत्साह आणि थाटात उद्घाटन संपन्न

Chief Editor

जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा : सुभाष ढगे

Chief Editor

सामाजिक चळवळी जातीवर नव्हे महापुरुषांच्या विचारावर मोठया होतात.: सचिन साठे

Chief Editor

माँसाहेब जिजाऊ म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ -डॉ. सुरेखा भोसले

Chief Editor

माय मराठीचा समृद्ध वारसा जपण्यासाठी ज्ञानवन प्री स्कूलची स्थापना

Chief Editor

पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आवश्यक – डॉ. गीता लाठकर

Chief Editor

Leave a Comment