एम सी आर
Uncategorized

मितभाषी, संयमी व भाषिक अहिंसामय: डॉ.अशोक सिद्धेवाड (लेखक:डॉ. अजय गव्हाणे)

पीपल्स कॉलेज, नांदेडचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.अशोक सिद्धेवाड दि.३१ मार्च रोजी नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाले आहे. विषयबंधू या नात्याने त्यांच्यासोबत व्यतीत केलेले क्षण व प्रसंगाचा संक्षिप्त ऊहापोह……
डॉ. अशोक सिद्धेवाड राज्यशास्त्रातील एक पोक्त, संयमी, मीतभाषी व्यक्तिमत्व. गत २८ वर्षांचा त्यांचा सहवास व संपर्क. त्यांचा परिचय झाला तत्कालीन विभागप्रमुख प्राचार्य डॉ.व्ही.एन. इंगोले यांच्या समवेत. निमित्त होते राष्ट्र सेवा दलाचे कॅलेंडर. या प्रथम भेटीत राष्ट्र सेवा दलाची उद्दिष्टे, विचारप्रणाली व कार्यावर सविस्तर चर्चा झाली तसेच राष्ट्र सेवा दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यातील फरक स्पष्ट केला गेला.
डॉ.अशोक सिद्धेवाड यांचा स्वभाव श्रावकाचा आहे; म्हणजे ऐकणाऱ्याचा. आज थोड्या प्रमाणात जरी शिक्षित व त्यातही उच्चविद्याविभूषित व्यक्ती असेल; तो तर तो इतरांना ज्ञानी करण्याची मूलभूत जबाबदारी आपल्यावरच असल्याचा भ्रम बाळगून सतत बोलतच असतो. चार माणसे एकत्र आली आणि शांतपणे आपण निरीक्षण केले; तर चौघे फक्त बोलण्यासाठी इच्छुक असतात;ऐकण्यासाठी कोणीही तयार नसते; मात्र डॉ.अशोक सिद्धेवाड ऐकून घेण्याच्या मानसिकतेचे आणि पक्षाचे आहेत.
पीपल्स कॉलेज येथील तज्ञांच्या मांदियाळीत डॉ.अशोक सिद्धेवाड हे एक प्रभावी नाव. संशोधकीय आणि वैचारिक मार्गदर्शन डॉ. व्ही. एन इंगोले यांच्याकडून लाभल्यामुळे विश्लेषणाला, लेखनाला एक विशिष्ट पुरोगामी, आधुनिक, लोकशाही समाजवादी विचारांची धार. तसं सरांचा स्वभाव मितभाषी व संयमी. सरांची वाणी व वक्तव्य म्हणजे भाषिक अहिंसेचा उत्कृष्ट नमुना. सर्वांना सोबत घेऊन जाणारा; आधुनिक काळातील अत्यंत दुर्मिळ असा; स्वभाव. महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या मनात, विचारात, दृष्टिकोनात कुणाकडेही शत्रुत्वाच्या भावनेने न पाहण्याचे हमखास रसायन असलेले अजातशत्रू व्यक्तिमत्व. विचारांचा विरोध विचारांनी करणारे. विरोध करणे, टीका करणे; हा मूलभूत अधिकार मानणारे अभ्यासक व तज्ञ. वैचारिक विरोधकाकडे द्वेष व घृणा भावनेने न पाहणारे सज्जन.
एनसीसीचे लेफ्टनंट म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली असल्यामुळे सर्वांगीण शिस्त जणू आचरणाचा एक अविभाज्य भाग. शैक्षणिक क्षेत्रामध्ये पीपल्स कॉलेजला वैचारिक चळवळीचे क्षेत्र म्हणून गणले जाते. या वैचारिक चळवळीतील महत्त्वपूर्ण आंदोलक म्हणजे डॉ.अशोक सिद्धेवाड. नांदेड शहरात कुठेही व्याख्यान, परिसंवाद, ग्रंथ प्रकाशन सोहळा असल्यास अशोक सिद्धेवाड यांची उपस्थिती अनिवार्य. आज मोबाईल, सोशल मीडिया, चंगळवादाच्या युगात, विचारसरणीचा खरंच ऱ्हास झालाय का, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. अमुक कार्य केले किंवा अमुक ठिकाणी उपस्थित राहिलो तर आर्थिक व भौतिक फायदा काय मिळणार, असा विचार मानगुटीवर बसलेल्या युगात चांगल्या श्रोत्यांची, निस्वार्थी माणसांची वानवा दिसते. विचार घेऊन जगणाऱ्यांचा अभाव जाणवतो; तेव्हा आधुनिक, मानवतावादी विचार जिवंत ठेवणाऱ्यांच्या यादीत डॉ अशोक सिद्धेवाड या नावाचा आपसूकच समावेश होणार.
त्यांची विनोद शैलीही उच्च दर्जाची व वैचारिक. एकदा चर्चेत त्यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनातील प्रसंग सांगितला. एकदा महात्मा गांधीजींकडे एक कार्यकर्ता धावत पळत आला व म्हणाला, बापूजी, मागे तुम्ही असं म्हणाला होतात व आत्ता असं सांगत आहात. आम्ही कोणतं खरं समजावं? महात्मा गांधीजींनी विनम्रपणे व शांतपणे त्या व्यक्तीस उत्तर दिले, जेव्हा जेव्हा दोन विधानांमध्ये परस्पर विरोध जाणवेल किंवा आढळून येईल; तेव्हा माझे नंतर बोललेले वाक्य प्रमाण समजावे. गांधीजींच्या जीवनातील हा सहज व कार्य करताना निर्माण होणारा संभ्रम दूर करणारा प्रसंगही समजला तो अशोक सिद्धेवाड यांच्या गांधीवादावरील वाचन व चिंतनामुळे. त्यांना ना पदाचा हव्यास न सत्तेची लालसा. सत्ता व पदासाठी ना हिंसक भूमिका ना अति आग्रह.
थोडक्यात शांत, सुस्वभावी, साधी राहणी व उच्च विचारसरणी मानणारे डॉ.अशोक सिद्धेवाड यांना सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, समाधानी, आरोग्यदायी व अधिक सेवामय जावो, ही सदिच्छा!
-डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड

Share

Related posts

यशवंत ‘मध्ये ग्रंथालय सुविधांवर कार्यशाळा संपन्न*

Chief Editor

पीपल्स मध्ये आज परिसंवाद व पुस्तक लोकार्पण सोहळा

Chief Editor

लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला नवी दिशा

Chief Editor

अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांचा समृद्ध वारसा पुढे चालू ठेवणारे खंबीर नेतृत्व : सचिन भाऊ साठे..

Chief Editor

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ मनोहर चासकर

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये आरोग्यविषयक जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor