ताज्या घडामोडी

नायक की खलनायक?

नायक की खलनायक?

चित्रपट हिंदी असो किंवा मराठी त्यात एखाद्या तरी बड्या खलनायकाची भुमिका प्रेक्षकांना शेवट पर्यंत खिळवून ठेवते. प्रत्येक चित्रपटांमध्ये नायकापेक्षा सशक्त खलनायक पाहायला मिळत आहेत.
असंख्य हिंदी व मराठी चित्रपटांत नायकापेक्षा खलनायकाच्या भूमिका प्रेक्षकांच्या अधिक लक्षात राहिल्यात. प्रत्येक सिनेमा नायकाच्या अवतीभवती फिरणारा असतो, खलनायक कितीही शक्तिशाली, चतुर असला तरी चित्रपटाच्या शेवटी नायक जिंकत असतो. चित्रपटातील खलनायकामुळेच नायकाचे महत्त्व अधोरेखित होते. मात्र खलनायक नसेल तर नायकाचे अस्तित्व काय आहे? हे लक्षात येतं.
खलनायक जेवढा बदमाश, क्रूर तेवढाच नायक पडद्यावर सज्जन, चांगला दाखवला जातो. प्रत्येक चित्रपटात विचारपूर्वकच अश्या विविध कालखंडातील अजरामर झालेल्या खलनायकांच्या भूमिकेसाठी निवडल्या गेले आहेत. दिलेल्या प्रत्येक भुमिकेतील चेहर्याने खलनायकाच्या रूपात व्यवस्थितपणे आपल्या ठसा उमटवला आहे.
मग त्या भुमिका स्त्री पात्रातील असो वा पुरुष…
आता मुद्दा असा येतो की, खलनायक हा चित्रपटांच्या कथेत आलेला असला तरी, आपल्या वैयक्तिक जीवनातही खलनायक या भूमिकेत वावरणारे अनेक पात्र आपल्या आसपास वावरत असतात. कौटुंबिक,राजकीय, व्यावसायिक आणि इतर क्षेत्रात वावरणारे खलनायक आपण पाहत असाल.
अशाच खलनायकाची जास्त रेलचेल आपल्याला पाहिला मिळत आहेत, कारण असे असू शकते का?
समाजाच्या दुर्बल घटकांवर जेव्हा अत्याचार व्हायला लागतो तेव्हा त्या अत्याचाराचा बळी ठरलेल्या काहींनी स्वत:ला समाजापासून दूर करत स्वत:तून क्रूरपणे प्रतिशोध घेणारा माणूस
म्हणजे खलनायक. किंवा पैसाच्या जोरावर दादागिरी व वर्चस्व गाजवण्यासाठी खलनायक ह्या भूमिकेत व्यक्ति येतो का?
आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध किंवा स्वत:ला न्याय मिळवून घेण्यासाठी केलेल्या खुरापाती मार्ग पत्कारतात का? आणि त्यातून स्वत:ची दहशत निर्माण करतात आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवला जावा किंवा आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वत:चा दबदबा निर्माण करण्यासाठी म्हणून या समाजावर वचक ठेवण्यासाठी पुढे आयुष्यभर त्याच भूमिकेत कायम राहतो का?त्यामुळे त्यांचा प्रवास तसाच झालेला असतो का? एवढ्यावरच न थांबता नंतर स्वत:च लुटपाट, हिंसा, अत्याचार करू लागतात का? या समाजात स्वत:चा चेहरा किती ही क्रूरकर्मा असला तरी दुसरी कडे एक मसीहा म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न करू लागलेत का?. पुन्हा या खलनायकाच्या टोळीत स्वत:च्या वर्चस्वासाठी लढाया होत आहेत का?
ह्याच समाजाचे बदलते रूप चित्रपटात खलनायक घेऊन प्रकट होतात का? म्हणजे लोकांनी ठरवायचे चित्रपटात दाखवलेला तो चेहरा नायक की खलनायक आहे म्हणून…
पण, मूळ मुद्दा हा की, समाजाचा चेहरा हाच खलनायकाचा चेहरा असतो. समाजातील खलनायक बदलत जातात तसे चित्रपटातल्या खलनायकाचा चेहरा बदलत जातो. हे थोडक्‍यात म्हणजे समाजाचा चेहरा हा चित्रपटाचा बदलता चेहरा असतो. त्यात सगळेच आले. चित्रपटात खलनायिका पण रंगवल्या आहेत. मात्र, त्या खूप प्रमाणात नाही. काही होत्या त्या साधारण सासू-सून या प्रकारच्या घरगुती हिंसाचाराच्या प्रतीक होत्या.
खरे तर आपल्या संस्कृतीत डोकावल्यास घरगुती हिंसाचारामुळे किंवा कान भरणे या कृतीमुळे सगळे रामायण घडले.
स्वत:ला श्रेष्ठ, बलवान, धनवान करण्यासाठी काही तरी विचीत्र कृत्य बिंबवण्याचा प्रयत्न करतात. स्व वर्चस्वाची स्पर्धा म्हणून खलनायक वृत्तीचा समाज निर्माण झालाय.
आपल्या चित्रपटात खलनायिका या सुंदर आणि मादक असलेल्या दाखवल्या जातात.आपल्या मोहजालात अडकवून स्वार्थ साध्य करणे हा समाजातील चेहरा आहे. थोड्या मादक आणि क्रूर अशा मिश्रणात चित्रपटात खलनायिका म्हणून स्थापित झालेल्या स्त्रीने स्त्रीवर अत्याचार केल्याच्या कथा चित्रपटात खूप आल्या.स्त्रियांवरील अत्याचार आपण नित्य बघतो. याला पुरुषप्रधान संस्कृती हे एक कारण असले, तरीही स्त्रियाच स्त्रियांना त्रास देतात, आधी खास करून सासू-सून असा प्रवास होता, आता सुना-सासू असा प्रवास चालू झाला आहे.
या नात्याला इतके कंगोरे आहेत की, विचारू नका. हे कंगोरे कुणाला पूर्णपणे अजूनही समजलेले नाही. पुरुषांना स्त्री कळायला बरेच जन्म घ्यावे लागतील. कदाचित त्यासाठीच वटपौर्णिमा असावी. विवाहित पुरुषाला सात जन्मात तरी बायको स्त्री म्हणून कळावी. त्यासाठीच स्त्रियांचा हा आटापिटा असावा… पण, स्त्री-पुरुष सुधारेल, असे वाटत नाही. तो त्यांच्यातला खलनायक सूक्ष्म रूपात दाखवत असतोच. हा प्रत्येकात दडलेला खलनायक कसा बाहेर येतो, हे त्याचे कर्म आणि समाज ठरवतो. म्हणून समाज सुधारणे गरजेचे आहे. समाज सुधारला,तर खलनायक आपोआप सुधारतील.खऱ्या अर्थाने आयुष्याचे नायक बनतील. आता हे आपण आपलेच ठरवूया की आपल्याला नायक बनायचे आहे की खलनायक?

रूचिरा बेटकर, नांदेड

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.