तुका आकाशा एव्हढा” नांदेडमध्ये बरसल्या भक्ती, विचार आणि सुरांच्या अभंग सरी

नांदेड, ७ जुलै (डॉ. प्रवीणकुमार सेलूकर)
“तुका आकाशा एव्हढा…” या शीर्षकाच्या सुरेल आणि वैचारिक कार्यक्रमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने नांदेडमध्ये वारकरी भावविश्वाचा नवा नाद रुजवला. संत तुकाराम महाराजांच्या अभंगसाहित्याचा गूढार्थ, त्यामागील सामाजिक भान आणि भक्तिरसाची सुरेल अनुभूती या त्रिसूत्रीने सजलेल्या या भव्य सांस्कृतिक पर्वणीस हजारोंच्या संख्येने रसिकांनी उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला. या सोहळ्याचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया चव्हाण, नामदार हेमंत पाटील, सौ.राजश्री पाटील व अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा रवींद्र चव्हाण यांनी केले, यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायात असलेल्या भक्तीची शक्ती मोठी असल्याचे आणि आणि त्याच शक्तीने आजवर महाराष्ट्र एकसंघ ठेवल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई चव्हाण यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रबोधनकार तथा व्याख्याते गणेश शिंदे यांनी संतविचारांच्या सामाजिक परिघावर भाष्य करत, “तुकोबांचे विचार म्हणजे महाराष्ट्राचा वैचारिक अधिष्ठान आहे, १७ वे शतक जगद्गुरु तुकोबारायांच्या युगप्रवर्तक वाणीने दुमदुमले आणि महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षानंतर सुद्धा तीच विचारधारा आजही ठायी ठायी आपणास दिसते आहे. सामाजिक आणि आत्मिक उन्नतीसाठी तुकोबांचे अभंग साहित्य काय मार्गदर्शक आहे. महाराष्ट्राचे लोक दैवत असलेल्या पांडुरंगाला समोर ठेवून त्यांनी आपले अभंग साहित्य निर्मिले आणि त्यातून त्यांनी प्रतिगामी विचारांचा विरोध करत खऱ्या मानव्याचा अर्थ सांगितला’, असे स्पष्टपणे नमूद केले.
अत्यंत नेटकेपणाने आणि विचारशीलतेने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षीपासून नांदेडमध्ये संतसाहित्य, भक्तिसंगीत आणि अभंगपरंपरेचा व्यापक विचार आषाढी महोत्सवाच्या निमित्ताने संयोजक विठ्ठल पावडे यांनी घडवून आणला आहे. यंदाही महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, प्रबोधनकार गणेश शिंदे आणि सन्मिता शिंदे आणि सुरेल प्रतिभेचे संमेलन घडवले.
त्यांनी संत तुकारामांच्या अभंगांचे केवळ निरूपणच केले नाही, तर त्यांचे भक्तीरसात ओतप्रोत असलेले मानवी मूल्य, अंधश्रद्धेवरचे प्रहार, समतेचा आग्रह आणि सामाजिक समरसतेचे सौंदर्यशास्त्र रसिकांसमोर अत्यंत ओघवत्या शैलीत उलगडले. त्यांच्या भाष्याने तुकारामांचे युगपुरुषत्व आणि त्यांच्या गाथेतील युगस्पंदने जिवंत झाली. सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांनी व संचाने त्यांच्या सादरीकरणात एकापेक्षा एक सरस अभंग आणि भक्ती गीते सादर करून सभागृह मंत्रमुग्ध केले. त्यांच्या संपूर्ण संगीतसंचाने वातावरण भक्तिरसात न्हाले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शेकडो रसिकांसह साहित्य, अध्यात्म, पत्रकारिता, राजकारण, शिक्षण, सेवा, वारकरी परंपरेशी नाते असलेल्या मान्यवरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. सतरावं शतक तुकोबांच्या वाणीने दुमदुमलं, आणि आज २१व्या शतकातही त्यांच्या शब्दांनीच विचारांचा उजेड देतो, हे या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.
विठ्ठल पावडे यांच्या प्रयत्नातून नांदेडमध्ये घडणारा हा वैचारिक संगीत महोत्सव म्हणजे भक्ती, तत्त्वज्ञान आणि लोकशिक्षण यांचा अद्वितीय संगम ठरला.