ताज्या घडामोडी

फुले-आंबेडकर जयंती निमित्त स्वा.रा.ती.म. विद्यापीठात रंगले कविसंमेलन *प्रेम, विद्रोह आणि समतेच्या सूरांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध

*

नांदेड (प्रतिनिधी) –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी , कर्मचारी व विद्यार्थी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विशेष कविसंमेलनाने विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात एक सुंदर सृजनशीलतेची आणि उत्कट भावनांची लहर निर्माण केली. या संमेलनात अनेक कवींनी त्यांच्या शब्दांतून श्रोत्यांच्या मनात समतेची, प्रेमाची, विद्रोहाची आणि प्रेमपूर्ण सहअस्तित्वाची जाणीव निर्माण केली. कवी संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी सुप्रसिध्द कवी व चित्रपट गीतकार प्रकाश घोडके (पुणे) हे होते.
कवी प्रकाश घोडके त्यांच्या शब्दांच्या गंधाने संमेलनाला एक गोड रंग दिला. ‘किती शिवावं सपान आरं पापण्या फाटल्या / माझ्या आडूश्यानं उभ्या/ तुझ्या दिसती साउल्या’ अशा काळजाला साद घालणाऱ्या ओळींनी रसिकांना हळवे केले. ‘असा बावळा सावळा / पक्षी रानचा पाळला’ या कवितेतून त्यांनी प्रेमामधील सामाजिक अडथळ्यांचा जाच कथन केला. तर तब्बल चाळीस वर्षांपासून मराठी रसिकांवर आपला ठसा उमटविणाऱ्या ‘तुझ्या दाराहून जाता’ या कवितेला रसिकांनी अगदी डोक्यावर घेतले.
कवी आणि गजलकार डॉ. मुकुंद राजपंखे(अंबाजोगाई) यांनी आपल्या कविता सादर करून श्रोत्यांची मनं खूप खोलवर हलवली. ‘घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे / जळमटाना पुन्हा जाळले पाहिजे’ ह्या शब्दांनी नवीन आरंभाची प्रतिमा उभी केली. त्याचप्रमाणे ‘माया पातळ करू नकोस गावाकडे येत जा / कधी-मधी माय बापाला तुझ्या घरी नेत जा’ ह्या गजलच्या माध्यमातून त्यांनी नात्यामधील हरवत चाललेल्या माणुसकीची आणि आटत चाललेल्या प्रेमाची दु:खद वस्तुस्थिती कवितेतून व्यक्त केली.
ज्येष्ठ कवी डॉ. आदिनाथ इंगोले(नांदेड) यांच्या ‘बोल भिमाचाच बोल तू, घडा धडधडा / तू तरी शिक खरा / शिक भीमाचा धडा’ ह्या प्रेरणादायी ओळींनी विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले. ‘बाई भीम मव्हा देवाहून भारी देव, मंग कहाल्ये मी घेऊव दुज्याच नाव’ ह्या कवितेत त्यांनी बाबासाहेबांच्या प्रती असलेली कृतार्थेच्या भावनेला कलात्म अभिव्यक्ती दिली. ‘कबूल मी बदललो / माझी कविता बदलली / आता तू ही बदलायला हवं’ अशा एका परिवर्तनाच्या शपथेने सभागृहात उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मनाला परिवर्तनाचा मंत्र दिला.
कवी डॉ. विकास कदम(नांदेड) यांच्या गजलांनी कार्यक्रमाच्या रोमांचकतेला एक नवीन दिशा दिली. ‘वाद हा कशाचा कसे लोक भडकले गेले / उद्ध्वस्त मन मंदिरात माझे श्वास दडपले गेले / त्यांचा लपाछपीचा हा खेळ सुरूच आहे / कटात कुणाकुणाचे, या हात अडकले गेले’ या ओळींमध्ये त्यांच्या शब्दांचा ठासून भरलेला सामाजिक विद्रोह प्रकटला. ‘बाबा, पुढे पुढे जातांना रस्ते तुमचेच पाय मागे ओढतांना पाहतोय / पाखंडी तुम्हाला इथल्या मठात कोंडतांना आणि तुमचीच शिदोरी चौकाचौकात मांडताना पाहतोय’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विचारपूर्ण कवितेत समतेचा आणि तत्त्वज्ञानाचा गोड मिलाफ रसिकांनी अनुभवला.

अक्षय जाधव( छ. संभाजीनगर) यांच्या कवितेचे सादरीकरण अत्यंत भावपूर्ण होते. त्यांच्या आवाजात एक गोडवा आणि शब्दाच्या संगीतातून जीवनाचा सखोल शोध घेत, त्यांनी उपस्थितांसमोर कविता प्रस्तुत केली आणि रसिकांनी त्यास भरभरून दाद दिली.
तरुण कवियत्री वनश्री वनकर(वर्धा) यांच्या कवितेत ‘आता केवळ व केवळ बुद्धाचीच पालवी इथं उमलणार आहे … मी सलीमला सोबत घेऊन येतेय .. तोवर तू वाट बघ … मी येतेय’ ह्या ओळींतून एक हळवी आणि तरीही सामाजिक जाणीवेसकट प्रेमभावना प्रकटली. वनकर यांच्या कवितेतील आंबेडकरी स्त्री जाणीवा, चळवळीतील अनुभव आणि ते सादर करण्याची अनोखी शैली याने सर्व उपस्थितांच्या मनात घर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. त्यांनी ‘बाबासाहेब मला नाहीत हजार डोळे हे जग वाचण्यासाठी, म्हणून मी समजून घेत आलोय हे जग तुमच्यातून, पुस्तकांची पाने आणि अक्षरांतून’ ह्या विचार कवितेने उपस्थितांना वर्तमान चळवळीचा खरा अर्थ समजावला. कविसंमेलनास डॉ. मल्लिकार्जुन करजगी, डॉ. अविनाश कदम, डॉ. रमेश ढगे, डॉ. संतोष देवसरकर, डॉ. सूर्यप्रकाश जाधव. डॉ. पी. विठ्ठल, डॉ. रवी सरोदे, डॉ. हर्षवर्धन दवणे, सतीश वागरे अनुपम सोनाळे, प्रकाश तारू, स्वप्नील नरबाग यांच्यासह प्राध्यापक , कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.